Mobile Cyber Crime  (Pudhari File Photo)
क्राईम डायरी

Call Forwarding Fraud | कॉल फॉरवर्डिंग स्कॅमपासून सतर्क राहा

Phone Scam Alert | सध्या देशभरात सायबर चोरटे या कॉल फॉरवर्डिंग स्कॅमचा वापर करून अनेकांना गंडा घालत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Call Forwarding Fraud

‘अरे आदित्य, तुझा फोन लागत नाहीये. तू ठीक आहेस ना?’ मित्राच्या फोनवर आलेली ही काळजीने भरलेली आपल्या आईची वाक्ये ऐकताच आदित्यच्या पायाखालची वाळू सरकली.

आदित्य एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारा, अत्यंत सतर्क आणि डिजिटल सेफ्टीबाबत जागरूक असलेला व्यक्ती; पण एक दिवस सकाळी त्याच्या मोबाईलवर एक कॉल आला, ज्यात समोरचा व्यक्ती म्हणाला, तुमचे बँक अकाऊंट अलर्ट मोडवर आहे. तुमचा नंबर आमच्या सिक्युरिटी सिस्टीमला रजिस्टर करायचा आहे. कृपया हा नंबर डायल करा *401.

ऑफिसच्या कामात व्यस्त असल्याने घाईगडबडीत आदित्यने तो कोड डायल केला. फोनमध्ये हा कोड डायल करतातच तो सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकला होता. फोनमध्ये हा कोड डायल केल्यानंतर त्याला कोणाचेही कॉल येत नव्हते. घरचे, मित्र, ऑफिसचे लोक सगळे सांगत होते की, फोन लागत नाही. बिझी टोन येते आहे.

त्यावेळी आदित्य घाबरला आणि चटकन त्याने अ‍ॅप उघडून मोबाईलचे बिल पाहिले. मोबाईल बिलात त्याला अनेक आंतरराष्ट्रीय कॉल्स दिसले. बँकेच्या ट्रांजेक्शनचे मेसेज दिसले. त्याने चटकन कस्टमर केअरला फोन केला. तेव्हा कळले त्याच्या नंबरवर कॉल फॉरवर्डिंग स्कॅम झाला आहे.

सध्या देशभरात सायबर चोरटे या कॉल फॉरवर्डिंग स्कॅमचा वापर करून अनेकांना गंडा घालत आहेत. आता हा कॉल फॉरवर्डिंग स्कॅम म्हणजे काय तर, काही सायबर चोरटे फोनवरून कॉल फॉरवर्डिंग अ‍ॅक्टिव्ह करणारा यूएसएसडी कोड डायल करायला लावतात, तर काही चोरटे जाता जाता वाटेत भेटतात आणि सांगतात माझ्या फोनची बॅटरी संपली आहे. मला एक फोन करायचा आहे. ते फोन घेतात आणि फोनमध्ये हळूच हा कोड डायल करतात. एकदा का हा कॉल यूएसएसडी कोड डायल केला की, तुमच्या फोनवर येणारे सर्व कॉल्स आणि एसएमएस त्यांच्या फोन मध्ये जातात आणि तुम्हाला काही समजण्याआधी तुमचे बँक खाते रिकामे होते.

अशा कॉल फॉरवर्डिंग स्कॅमपासून वाचण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणीही सांगितले तरी *401, *21 किंवा इतर कोणताही यूएसएसडी कोड आपल्या मोबाईलमध्ये डायल करणे टाळा. फोन आणि व्हिवोआयपीसाठी नेहमी मजबूत पासवर्ड ठेवा. अनोळखी कॉलवर कधीच वैयक्तिक माहिती देऊ नका. कॉल लॉग, बँक व्यवहार, मोबाईल बिल नियमित तपासा. कोणताही संशयास्पद फोन किंवा मेसेज असल्यास सायबर हेल्पलाईन 1930 वर त्वरित कळवा. कारण, एक छोटीशी चूक क्षणार्धात आपले खाते रिकामे करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT