सायबर बुलिंग! (Pudhari File Photo)
क्राईम डायरी

Cyber Bullying | सायबर बुलिंग!

मोबाईल, कॉम्प्युटर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा छळ.

पुढारी वृत्तसेवा

आशीष शिंदे, कोल्हापूर

मोबाईल, कॉम्प्युटर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा छळ. एक साधा वाटणारा मेसेज हळूहळू मानसिक त्रास देतो, नैराश्य आणतो आणि कधी कधी व्यक्तीला आत्महत्येपर्यंत नेतो. यालाच सायबर बुलिंग म्हणतात.

कोल्हापुरातील प्रतीक हा सोन्याचा व्यापारी. काही दिवसांपूर्वीपासून त्याला अनोळखी नंबरवरून धमक्या येऊ लागल्या. पहिला मेसेज त्याला साधाच वाटला. माझ्या बायकोला का तू फोन करतोस? तुला जिवंत सोडणार नाही. प्रतीकने त्याकडे दुर्लक्ष केले. पण दुसर्‍याच दिवशी त्याच्या ऑफिसच्या व्हॉटस्अप ग्रुपवर त्याचे बनावट मॉर्फ केलेले फोटो टाकले गेले आणि बदनामी करणारे मेसेज पसरले. अचानक सहकार्‍यांमध्ये कुजबुज सुरू झाली. घरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आणि त्याचा मानसिक तोल ढासळू लागला.

यालाच सायबर बुलिंग म्हणतात. मोबाईल, कॉम्प्युटर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा छळ. एक साधा वाटणारा मेसेज हळूहळू मानसिक त्रास देतो, नैराश्य आणतो आणि कधी कधी व्यक्तीला आत्महत्येपर्यंत नेतो. प्रतीकला केवळ धमक्या मिळाल्या नाहीत तर त्याला पैशांची मागणीही केली गेली. प्रकरण मिटवायचे असेल तर पन्नास हजार रुपये द्या. नाहीतर तुझ्या सगळ्या कॉन्टॅक्टला मेसेज करून सांगतो की, तू माझ्या बायकोची छेड काढतोस, असा थेट इशारा देण्यात आला. आणखी बदनामी नको म्हणून प्रतीक पैसे देण्यास तयार झाला. देशभरात सध्या अशा प्रकारे अनेकांना गंडा घालण्यात येत आहे.

सायबर बुलिंगचे बळी बनवण्यासाठी सायबर चोरटी सर्वात आधी बनावट ओळख तयार करतात. फेक आयडी, इंटरनेट नंबर किंवा अनामिक मेसेजिंग अ‍ॅप्सच्या मदतीने ते समोरच्या व्यक्तीवर दबाव आणतात. नंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर डाग आणणारे फोटो, व्हिडीओ एआयच्या मदतीने तयार करून ते पसरवले जातात. अशा हल्ल्यांमध्ये मानसिक छळ, धमकी, ब्लॅकमेलिंग आणि खंडणी मागणे हे टप्प्याटप्प्याने केले जाते.

या जाळ्यातून वाचण्यासाठी काही सोपी पण महत्त्वाची खबरदारी घ्यावी लागते. अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजेसला उत्तर देऊ नये, अशा चॅटस् किंवा पोस्टस्चे स्क्रीनशॉटस् पुरावा म्हणून ठेवावेत आणि त्वरित सायबर क्राईम पोर्टलवर (लूलशीलीळाश.र्सेीं.ळप) किंवा 1930 या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी. वैयक्तिक माहिती आणि फोटो सोशल मीडियावर कमी प्रमाणात शेअर करणेही सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे.

सायबर बुलिंग हा केवळ खोडसाळपणा किंवा थट्टा नाही, तर गंभीर गुन्हा आहे. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अशा गुन्ह्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. प्रतीकसारख्या अनेकजणांचा छळ होत असतो. पण वेळेत तक्रार दिल्यास पोलिस तपास करून आरोपीला पकडतात. शेवटी लक्षात ठेवण्यासारखे एवढेच, इंटरनेटवरून होणारा प्रत्येक छळ हा कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरतो आणि त्याविरुद्ध वेळीच सावध होऊन आवाज उठवणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT