बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  (छाया : गणेश बोडके)
क्राईम डायरी

Children Death : हृदयद्रावक ! बांधकामासाठी खोदलेला खड्डा ठरला मृत्यूचा सापळा; तीन चिमुकल्यांचा मृत्यू

विडी कामगार नगर येथील घटना; बांधकाम व्यावसायिकवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिकांकडून रस्ता रोको

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी (नाशिक): विडी कामगार नगर येथील रविवार, ( दि. २९) सकाळपासून बेपत्ता असलेल्या तीन मुलांचा शोध लागला असून पाटालगत एका रहिवासी संकुलासाठी खोदण्यात येत असलेल्या खड्ड्यातील पावसाचे पाणी साचलेले असून यात बुडून तिन मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. साई गोरक्ष गरड (१४), साई केदारनाथ उगले (१३) आणि साई हिलाल जाधव (१४) असे खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. बांधकाम व्यावसायिकवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी विडी कामगार नगर येथे नागरिकांकडून रस्ता रोको करण्यात आला असून पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.

बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विडी कामगार नगर येथे घडली. बांधकाम व्यावसायिकवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिकांकडून रस्ता रोको करण्यात आला आहे.

रविवारी (दि.29) बेपत्ता असलेल्या तिन मुलांच्या नातेवाईकांकडून दुपारपासून या मुलांचा शोध सुरू होता. मात्र ते कुठे आढळून आले नाही. अखेर सोमवार, (दि ३०) रोजी सकाळी विडी कामगार नगर येथील पाटालगत असलेला एका खाजगी इमारत बांधकामासाठी खोदलेला खड्ड्याच्या बाजूला या तीनही मुलांचे कपडे आणि चपला आढळून आल्याने हे तीन मुलं याच खड्ड्यात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या घटनेची माहिती कळताच आडगाव पोलीस आणि नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दलांकडून तीनही मुलांचा शोध घेण्यात येऊन त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शव विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

विडी कामगार नगर येथील बांधकाम साईटवरील खड्ड्यात बुडालेल्या मुलांचा शोध घेतांना अग्निशामक दलाचे कर्मचारी व नागरिक

पाटालगत एक खाजगी बांधकाम व्यवसायाने इमारत उभारणीच्या निमित्ताने मोठा खड्डा खोदलेला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने हे तीनही मुलं रविवार (दि.29) रोजी दुपारी आंघोळीच्या निमित्ताने या ठिकाणी आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शहरात सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले आहे. खाली गाळ असल्याने या गाळात पाय फसल्याने मुलांचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

बांधकाम साईटवर कुठल्याही उपाय योजना नाहीत. साईटवरील मुख्य प्रवेशद्वार तुटलेल्या अवस्थेत असून या ठिकाणी सुरक्षारक्षक देखील नियुक्त केलेला नाही, बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले असून येथे कुठल्याही उपाय योजना केलेल्या नाही. त्यामुळे या मुलांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
पूनम सोनवणे, माजी नगरसेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT