विधिसंघर्षित बालकांच्या संख्येत वर्षागणिक वाढ Pudhari News Network
क्राईम डायरी

Child Crime Nashik | बालगुन्हेगारीचा वाढता आलेख चिंताजनक

juvenile Crime | विधिसंघर्षित बालकांच्या संख्येत वर्षागणिक वाढ, निरीक्षणगृहात गर्दीचा महापूर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक रोड : महिला व बालविकास विभागामार्फत विविध पुनर्वसन योजना राबवूनही जिल्ह्यात बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. बालकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यामुळे प्रशासन आणि पालकवर्ग यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी हसतखेळत अन् उपक्रमशील, मूल्यशिक्षण देणे, सुरक्षित सामाजिक वातावरण मिळवून देणे, अतिशय गरजेचे असल्याचा मुद्दा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सर्वात महत्त्वाचे वय नव्हे, तर वर्तन अपराधाचे खरे कारण ठरते. गुंडगिरी करणे, चुकीच्या संगतीत राहणे, अश्लील भाषा वापरणे, रात्री- अपरात्री दुचाकी फिरवणे, मुलींची छेड काढणे, मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे, पालकांचे न ऐकणे, शाळेतून पळून जाणे अशा गोष्टी मुलांना गुन्हेगारीच्या वाटेवर नेतात. काही वेळा शाळा टाळणे वा घरातून पळून जाणे, हे गुन्हेगारी प्रकारात मोडत नसले, तर अशा वर्तणुकीने मुलांची वाटचाल गंभीर गुन्ह्यांकडे होते.

सध्या काही ठिकाणी लहान वयाच्या मुलांकडून हेतुपुरस्सर गुन्हे करवून घेण्याचे प्रकार उघड होत आहेत. अशा बालकांना बालसुधारगृहात पाठवले जाते. दोन - तीन महिन्यांत ते सोडले जातात आणि पुन्हा त्यांच्याकडून गुन्हे घडवून घेतले जातात, ही चिंतेची बाब असून, प्रशासनाला बाल गुन्हेगारी रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसते.

प्रशासन स्तरावर बऱ्याच उपायोजना सुरू आहेत. पण त्या उपाययोजना उपयुक्त ठरत नसल्याने त्या उपाययोजनांवर प्रशासनाने पुनर्विचार करणे गरजेचे आहे. कारण बालकांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी ठरत नाही. त्यांच्यासाठी प्रभावी मार्गदर्शन, समुपदेशन, शिक्षणाची गोडी निर्माण करणे आणि सुरक्षित सामाजिक वातावरण मिळवून देणे आवश्यक आहे. तेव्हाच बालगुन्हेगारीला कुठेतरी आळा बसेल, असे मत व्यक्त होत आहे.

जानेवारी २०२४ ते मे २०२५ दरम्यान जिल्ह्यातील निरीक्षणगृहांतील संख्या

  • विधिसंघर्षित दाखल बालके : 218

  • बालगृहातील मुलांची संख्या : ५४८

  • सुधारगृहातून मुक्त झालेल्या बालकांची संख्या : १९०

  • पालकांकडे स्वाधीन मुलांची संख्या : ३४१

पालक - प्रशासनाने करावयाच्या उपाययोजना

  • घरातून पालकांचे संस्कार अन् मार्गदर्शन

  • मुलांच्या संगतीकडे काटेकोर लक्ष देणे

  • अतिचिडखोर, हिंसक बालकांचे प्रभावी समुपदेशन

  • सामाजिक बुद्ध्यांक, भावनांक वाढीस प्रयत्न करणे

पालकांकडून येणारा वांशिक गुण, कौटुंबिक कलह, आई- वडिलांचे भांडण, हिंसक ऑनलाइन गेम, टीव्हीवर सतत चित्रपट पाहणे, अमली पदार्थांचा मेंदूवर परिणाम होऊन विचारशक्ती क्षीण होते तसेच मानसिक आजार अशा महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात.
डॉ. महेश भारूड, मानसोपचार तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT