बाल- आणि तरूण वयातले सायबर गुन्हेगार आपल्या 'करिअर' ची सुरूवात साधारणतः 'सेक्स्टिंग' (सेक्शुअल टेक्स्टिंग) ने करतात. कारण लैंगिक विषयांचे आकर्षण आणि उत्सुकता हा या वयाचा अविभाज्य, मूलभूत आणि अगदी नैसर्गिक घटक असतो. समवयस्क परिचित / अपरिचित मुलामुलींचे फोटो अपलोड केले जातात किंवा 'फोटोशॉप' वापरून मूळ फोटो बदलला जातो आणि त्यातून कधीकधी ब्लॅकमेलिंगसारखे प्रकार घडतात.
सन 2000 नंतर आपल्याकडे (आणि प्रगत देशांमध्ये त्याआधीच्या दशकापासून) इंटरनेट आणि वर्ल्डवाइड वेबने मूळ धरण्यास सुरुवात केली आणि बघताबघता त्याने सर्वांच्याच आयुष्यात शिरकाव केला. तो इतका की, प्रथम फक्त संवाद माध्यमांतील बदलापुरता मर्यादित असलेला नेटचा आवाका आता थेट सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यास कारण ठरू लागला आहे. चॅट, ऑनलाइन शॉपिंग, फेसबुकसारख्या सोशल मीडिया यासारख्या संकल्पना सर्वत्र पोहोचल्या आणि रुजल्या; मात्र खेडोपाडीदेखील 'नेट' पोहोचवण्याचे काम खर्या अर्थाने बजावले ते स्मार्टफोनने! यामुळे जगभरच्या घडामोडींचे, ज्ञानाचे आणि माहितीचे भांडार खुले झाले. आता तर अन्य रूपांत मिळू शकणार्या माहितीमधील 98 टक्के बाबी नेटवर उपलब्ध असतात, तर काही बाबी फक्त नेटवरच प्रकाशित आणि प्रसारित केल्या जातात. या सर्व बदलांदरम्यानच म्हणजे 1990 नंतर जन्मलेल्या जगभरच्या मुलामुलींनी (जे आज म्हणजे 2015 मध्ये तरुण आहेत.) नेटचा स्वीकार फार सहजपणे आणि चटकन केला आहे. नेट नसलेल्या (फक्त 20-25 वर्षांपूर्वीच्या) जगाची ते अक्षरशः कल्पनाही करू शकत नाहीत आणि ते दिवस त्यांना ज्युरासिक युगाइतकेच दूरचे वाटतात, हे सत्य आहे आणि हा बदल गुन्हेगारीच्या व्याख्येचेच पुनर्परीक्षण करण्यास सर्वांना भाग पाडत आहे. अलीकडच्या आकडेवारीनुसार 18 वर्षांखालील अल्पवयीन सायबर गुन्हेगारांचाही सहभाग वाढत आहे.
जगभरातील माहिती आणि जगाशी संवाद या दोन्ही बाबी एकत्रितपणे आणि त्याही घरबसल्या सर्वांनाच मिळू लागल्याने सायबर क्राइम किंवा सायबर-सुविधा वापरून केलेल्या अन्य स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत आहे. या नव्या गुन्हेगारांमध्ये 18 वर्षांखालील मुलामुलींचे प्रमाण धक्कादायक आहे. ते म्हणजे, गुन्हेगारांचे आणि गुन्ह्यांची शिकार झालेल्यांचेही!! उदा. एकट्या अमेरिकेतील गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता यामध्ये दरवर्षी सुमारे 20 टक्के वाढ होत आहे.
हल्ली आपल्या सर्वच आर्थिक व्यवहारांची माहिती ऑनलाईन उपलब्ध असते. बॅँकेच्या संगणकीय प्रणालीत घुसलेले चोर (हॅकर्स) ही माहिती सहज मिळवून तिचा स्वतःच गैरवापर करतात किंवा ही माहिती इतरांना विकून मोकळे होतात. जून 2014 मध्ये यूकेमध्ये असे एक रॅकेट उघडकीला आले. बॅँकांच्या संगणकांत बनावट सॉफ्टवेअर (मालवेअर) घुसवून चोरट्यांनी तब्बल 65000 बॅँक खात्यांमधील माहिती गोळा केली आणि ती इतर गुन्हेगारांना अमेरिकन बॅँकेसाठी प्रत्येक नोंदीला 3 डॉलर, युरोपीय महासंघामधील खात्यांसाठी 5 तर यूकेमधील खात्यांसाठी 7 डॉलर प्रत्येकी याप्रमाणे विकलीदेखील! यादरम्यान, संबंधित खातेदारांना ऑनलाईन खरेदी आणि सेवासुविधांसंबंधीच्या बनावट ई-मेल पाठवून सुमारे 80 लाख पौंडांचा गंडा घालण्यात आला होता, तो वेगळाच. निक वेबर आणि रायन थॉमस हे यामागील गुन्हेगार म्हणजे अनुक्रमे 18 आणि 17 वर्षे वयाची 'ज्युनिअर कॉलेज' मधील मुले होती. बरे, यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अद्वितीय किंवा महागड्या सॉफ्टवेअरचा उपयोग केला नव्हता. त्यांनी वापरला होता साधा घरातला पीसी आणि मुख्य म्हणजे स्वतःची बुद्धी !! होय, आता गुन्हेगारीचे स्वरूप ह्या दृष्टीनेही बदलत आहे. चोर, गुन्हेगार अशांसारख्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तराबद्दलच्या पारंपरिक कल्पना सायबर गुन्हेगारांना बिलकूल लागू पडत नाहीत. त्यांचे वय कमी असले तरी बुद्धिमत्ता चांगली असते (आणि बरेचदा आर्थिक स्तरही) आणि ही प्रकरणे हजारात एखादे अशी नाहीत. त्यांची संख्या वाढत आहे.
सर्वप्रथम एक लक्षात घेतले पाहिजे की, अगदी आदिम काळापासून देखील कोणताही समाज किंवा संस्कृती गुन्हेगारीपासून पूर्णतः मुक्त कधीच नव्हती आणि यापुढेही नसेल. त्यामुळे (कोणत्याही प्रकारच्या) गुन्ह्यांचे स्वरूप आणि ते मुळात का केले जातात, याचा विचार (प्रतिबंधक उपायांबरोबर) करावाच लागेल. मुळात सळसळत्या तरुण रक्ताला आखलेल्या, रुळलेल्या पारंपरिक आचार-विचारांच्या चौकटीतून बाहेर पडून काहीतरी करावेसे वाटते, हे उघड सत्य आहे. अशा वेळी आजच्या तरुणवर्गाला नेटसारखे अमर्याद विश्व लहानपणापासूनच खुले झाले आहे आणि नेटचे सर्वांत मोठे (आणि अद्वितीय) वैशिष्ट्य म्हणजे येथे स्वतःचे खरे वय आणि स्थान लपवणे अगदी सहजशक्य आहे. कोणत्याही पारंपरिक गुन्हेगारी मार्गांवर ही सुविधा आतापर्यंत कधीच मिळू शकलेली नाही. त्यामुळे तरुणाईला सर्वांत भावणारी गोष्ट म्हणजे 'थ्रिल'. पारंपरिक स्वरूपाचे गुन्हे न करता आणि कोणताही थेट धोका न पत्करताही घरबसल्या मिळते. सहजपणे काहीतरी वेगळे करून 'हिरो' बनता येते. शिवाय 'हॅकर्स हे नव्या जगाचे हिरो आहेत' असे अनेक चित्रपटांतून दाखवले गेले आहे आणि जात आहे.
बाल आणि तरुण वयातील सायबर गुन्हेगार आपल्या 'करिअर'ची सुरुवात साधारणतः 'सेक्स्टिंग'ने (सेक्शुअल टेक्स्टिंग) करतात. कारण, लैंगिक विषयांचे आकर्षण आणि उत्सुकता हा या वयाचा अविभाज्य, मूलभूत आणि अगदी नैसर्गिक घटक असतो. समवयस्क परिचित/अपरिचित मुला-मुलींचे फोटो अपलोड केले जातात किंवा 'फोटोशॉप' वापरून मूळ फोटो बदलला जातो आणि त्यातून कधी कधी ब्लॅकमेलिंगसारखे प्रकार घडतात, तर कधी वैयक्तिक शत्रुत्वातून बदनामी करण्यासाठी इंटरनेट आणि सोशल नेटवर्कचा आधार घेतला जातो. दुसरी दिशा असते हॅकिंगची. ही घुसखोरी बरेचदा थ्रिलसाठी ऊर्फ जवानीच्या जोशातून, उत्सुकता किंवा गंमत म्हणून केली जाते. क्वचित पैशाच्या लालसेने किंवा गरजेनेही. याहून जास्त गंभीर (आणि काही बाबतीत धोकादायकइतरांना!) म्हणजे एखाद्या विचारसरणीने भारले जाणे. 'नेटवर वय, स्थान आणि बरेचदा खरी ओळखही लपवता येत असल्याने आर्थिक तसेच अर्ध-राजकीय मंचांवर प्रवेश मिळवणे सायबर गुन्हेगारांना सोपे जाते. नेटवरील व्यवहार क्षणार्धात पार पडत असल्याने त्यांचे परिणाम नंतर इतरांना निस्तरावे लागतात. सायबर गुन्ह्यांमधून होणार्या आर्थिक आणि सामाजिक वा राजकीय नुकसानीचे प्रमाण, पारंपरिक गुन्ह्यांच्या मानाने खूपच अधिक असते, हे आपण जाणतोच.
अल्पवयीन मुले-मुली फक्त सायबर गुन्हे करतात, असे नाही तर त्यामध्ये बळीही पडतात. खरे तर, अशा अल्पवयीन सायबर बकर्यांची संख्या याच वयोगटातील सायबर गुन्हेगारांपेक्षा जास्त आहे. आजच्या पिढीला (इतरांना गुंतागुंतीचे भासणारे) संवादमाध्यमी तंत्रज्ञान अगदी लहानपणापासूनच सुलभतेने हाताळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे प्रौढांच्या तुलनेमध्ये तरुणांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण खूपच जास्त असते. शिवाय, सोशल मीडियावर सतत चॅटिंग इ. चालू असतेच. बरेचदा निव्वळ उत्सुकतेपायी त्यांच्याकडून संशयास्पद साइट्स उघडल्या जातात (कधीकधी तर संगणकातील अँटिव्हायरसने धोक्याचा इशारा दिल्यानंतर देखील!). परिणामी, त्यांच्या वापरातील संगणकीय प्रणालींमध्ये विविध व्हायरस, मालवेअर, स्पायवेअर घुसवणे सोपे जाते. फेसबुकवरून बदनामी किंवा ऑनलाईन व्यवहारांतील फसवणूक इ. मध्ये अल्पवयीनांचे प्रमाण पुष्कळच आहे. इंटरनेटवर जसे गुन्हेगार वावरत असतात तसे अतिरेकी मनोप्रवृत्तीचे लोकही वावरत असतात. मात्र, हे लोक तुम्हाला फसवायचा प्रयत्न न करता आपलेसे करण्याचा प्रयत्न करत असल्याने या प्रकारच्या लोकांनी चालवलेल्या संकेत स्थळांची सफर करताना सावधपणा अंगी बाळगणे जरुरीचे असते.
पालकांची जबाबदारी
पालकांनी मुलांना संगणक, स्मार्टफोन किंवा तत्सम यंत्रणांपासून दूर ठेवावे, असे मला अजिबात म्हणायचे नाही.कारण, तितकी गरज नाही आणि मुळात ते शक्यच नाही. परंतु, अशा साधनांचा गरजेपुरता वापर करणे, त्यांचा करमणूक किंवा संवादासाठी उपयोग करणे, त्यांच्या आहारी जाऊन त्यांचे गुलाम बनणे या तीन संपूर्णतः वेगळ्या बाबी आहेत, हे सर्व वापरकर्त्यांना समजणे आवश्यक आहे. काही वेळा धावपळीच्या आयुष्यामुळे किंवा मनुष्यबळाअभावी पालकांचाही नाइलाज होतो आणि आपल्या अपत्यांशी प्रत्यक्षाऐवजी आभासी संवाद करण्यावर आणि दुरूनच संबंध ठेवण्यावर भर द्यावा लागतो. हे खरे असले तरी, एकंदरीत अशी थेट वा छुपी व्यसने लागण्यापासून तसेच वाईट संगतीत सापडण्यापासून मुला-मुलींना दूर ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. सध्याच्या न्युक्लिअर कुटुंबामध्ये बर्याचदा साधन-संपत्तीचा प्रभाव आणि परस्पर वैयक्तिक संबधांचा अभाव असतो. आपल्या मुला-मुलींच्या मनात काय चालले आहे, हे उमजून घेण्यासाठी बर्याच पालकांना वेळ नसतो. एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत असल्याने आजी-आजोबा ही संस्थाच हळूहळू मोडकळीस जात आहे. त्याच बरोबर चाळीशीच्या पुढच्या पिढीचे सायबर गुन्हे व गुन्हेगारी या विषयावरील ज्ञान ही बरेचदा तोकडे असते. गंमत किंवा उत्सुकता म्हणून इतरांच्या वैयक्तिक वा सामाजिक आयुष्यात एखादेवेळी डोकावणे आणि त्यामध्ये घुसखोरी करून तेथील माहितीचा आपल्या मतलबासाठी विकृत किंवा गुन्हेगारी वापर करणे, यामध्ये फरक आहे. हा फरक दाखवणारी सीमारेषा कधी ठळक असते तर कधी अगदी पुसट.प्रत्येकाने ती ओळखण्याचा प्रयत्न करून गमतीतून गुन्हेगारीकडे होणारा (स्वतःचा आणि इतरांचाही) प्रवास रोखणे गरजेचे आहे.
शाळा, शिक्षक, समुपदेशक, ज्येष्ठ नागरिक संघ, पोलिस, न्याय व्यवस्था, पालक या सर्वांनी एकत्र येऊन या विषयावर विचारमंथन करायची गरज आहे. यावर झटपट इलाज कुठलाच नसल्याने सर्व घटकांनी आपापली जबाबदारी जाणून त्यादृष्टीने पावले उचलली पहिजेत. नाहीतर 'घरोघरी मातीच्या चुली'च्या ऐवजी 'बालगुन्हेगार' निर्माण होतील.