नादान प्रेमाचा शेवट  (Pudhari File Photo)
क्राईम डायरी

Honor Killing Case | जातिभेदाच्या विखारातून निर्व्याज प्रेमाचा रक्तरंजित अंत!

‘प्रेम आंधळं असतं’, असं म्हणतात; पण प्रेमाचा द्वेष त्याहूनही भयानक आणि क्रूर असू शकतो, याचा प्रत्यय नुकताच नांदेडकरांना आला.

पुढारी वृत्तसेवा

‘प्रेम आंधळं असतं’, असं म्हणतात; पण प्रेमाचा द्वेष त्याहूनही भयानक आणि क्रूर असू शकतो, याचा प्रत्यय नुकताच नांदेडकरांना आला. एका उमद्या प्रेमवीर तरुणाचा त्याच्याच प्रेयसीच्या बापाने आणि भावांनी निर्घृण खून केला. पण, खरी कहाणी इथे संपत नाही, तर तिथून सुरू होते... कारण नियतीलाही रडू येईल असा प्रसंग त्यानंतर घडला. प्रियकराचा श्वास थांबला होता; पण प्रेयसीने हार मानली नाही. अंत्यविधीपूर्वीच तिने मृतदेहासमोर कपाळात कुंकू भरले, हाताला हळद लावली आणि मृत प्रियकराशीच लग्नगाठ बांधून आपली इच्छा पूर्ण केली. हा प्रसंग पाहून उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले...

प्रमोद अडसुळे, छ. संभाजीनगर

नांदेडचा जुना गंज भाग त्या दिवशी रक्ताने न्हाऊन निघाला. सक्षम ताटे (वय 20) आणि आंचल मामीलवार... दोघेही वयात आलेले, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले! पण, हे प्रेम आंचलच्या घरच्यांच्या डोळ्यात खुपत होते. ज्या सक्षमला आंचलच्या भावांनी एकेकाळी मित्र मानले होते, तोच त्यांना आता वैरी वाटू लागला. गुरुवारी सायंकाळी आंचलचे वडील गजानन मामीलवार आणि भाऊ साहिल, हिमेश यांनी क्रूरतेची सीमा ओलांडली. आधी गोळी झाडली आणि नंतर डोक्यात फरशी घालून सक्षमचा जीव घेतला. सक्षम रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि एका प्रेमकहाणीचा अंत झाला. हत्येच्या घटनेने शहर हादरले होते; पण त्यानंतर जे घडले ते पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. सक्षमचा मृतदेह घरी आणताच आंचलने हंबरडा फोडला. तो गेला तरी मी त्याचीच आहे, म्हणत तिने थेट हळद आणि कुंकू मागवले. सक्षमच्या निस्तेज देहासमोर बसून तिने स्वतःला हळद लावली, कपाळात त्याच्या नावाचे कुंकू भरले. इतकेच नव्हे, तर सक्षमलाही हळद लावून ‘अमर’ प्रेमाची साक्ष दिली. चित्रपटालाही लाजवेल असा हा प्रसंग वास्तवात घडताना पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

पोलिसांनीच भावाला भडकवले!

आंचलने केवळ आपल्या प्रेमाची साक्षच दिली नाही, तर व्यवस्थेवरही गंभीर आरोप केले आहेत. माझ्या भावाला पोलिसांनीच सक्षमला मारायला भडकवले, असा धक्कादायक आरोप तिने केला. तू रोज मारामार्‍या करतोस, तुझ्या बहिणीच्या लफडेबाजाला मारून ये, असे पोलिसांनी म्हटल्याचे आंचलचे म्हणणे आहे. वडिलांनी आणि भावांनी वर्षभर छळ केला, मारहाण केली, तरीही सक्षमने माझ्यावर वेड्यासारखे प्रेम केल्याचे सांगताना तिचा कंठ दाटून आला.

आंचलला नेले आजोळी!

आंचलने सांगितले की, घटनेच्या दिवशी संध्याकाळी मला सांगितलं देव दर्शनालां जायचं आहे; पण माझ्या कुटुंबीयांनी मला परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आईच्या माहेरी नेले. त्यावेळी वडील आणि दोन भाऊ सोबत नव्हते. आई आणि काका-काकू होते. आम्ही मानवतला थांबलो. तेव्हा तिथे पोलिस आले. त्यांच्यासोबत तिथे दोन्ही भाऊ आणि वडील पण होते. मला आश्चर्य वाटलं, दोन्ही भाऊ आणि वडील का आले. तेव्हा मला सांगितलं की, सक्षमला दोन-तीन टाके पडले आहेत. तो रुग्णालयात आहे. तिथून पोलिसांनी मला नांदेडला आणलं. पोलिसांनी देखील काहीच सांगितलं नाही. पण, पोलिस ठाण्यात सकाळी सक्षमचा मयत असलेला फोटो पाहिला. तेव्हा मला सक्षमच्या हत्येबाबत कळालं.

सक्षम आणि हिमेश दोघेही गुन्हेगार!

सक्षम ताटे आणि हिमेश मामीलवार हे दोघेही मित्र असून दोघेही गुन्हेगार आहेत. दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. दीड महिन्यापूर्वीच सक्षम ताटे जामिनावर सुटला होता. दोघांवर देखील एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली होती. सायंकाळी सक्षम ताटे ‘पहेलवान टी’ हाऊसच्या पाठीमागे गल्लीत बसला होता. तिथे हिमेश मामीलवार आपल्या सहकार्‍यांसोबत आला. सक्षमच्या छातीत त्याने गोळी झाडली. त्यानंतर त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.

मी सासर सोडणार नाही!

सक्षम गेला असला, तरी मी आता विधवा म्हणून त्याच्याच घरी राहीन, हेच माझे सासर आणि हेच आई-वडील, असा ठाम निर्धार आचलने व्यक्त केला आहे. आपल्याच जन्मदात्या बापाला आणि सख्ख्या भावांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी तिने केली आहे. सक्षमच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे, त्यांना सुरक्षा द्या. माझा अल्पवयीन भाऊ सुटून येईल आणि पुन्हा घात करेल, अशी भीतीही तिने व्यक्त केली. सक्षम आणि आंचल हे वयाने लहान असल्याने त्यांचे प्रेमप्रकरण, त्यांची समज आणि आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करण्याचा निर्णय याविषयी अनेक वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत. परंतु, या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील जातिभेदाचा विखार अजूनही किती भयंकर आहे, याची प्रचितीच या घटनेवरून येते.

मान्य नव्हती सक्षमची जात!

सक्षम हा दुसर्‍या जातीचा असल्यामुळे आंचलच्या कुटुंबीयांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. ते आंचलला म्हणायचे, ‘तू दुसर्‍या कोणत्याही मुलासोबत लग्न कर; पण सक्षमसोबत करू नको. त्याची जात आम्हाला मान्य नाही.’ जेलमधून सुटून आल्यावर आंचलच्या घरचे त्याचा गेम करणार होते, असं आंचलचे वडील बोलले होते, आम्ही त्याला मारून टाकणार, गोड बोलून संपवणार, अशा धमक्याही ते देत होते.

दोन्ही कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी

स्वतः अट्टल गुन्हेगार असलेल्या मामीलवार कुटुंबाचा सक्षम या गुन्हेगाराशी आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. याच विरोधातून मामीलवार कुटुंबाने सक्षमला संपवल्याची माहिती आता समोर आली आहे. मृत सक्षम ताटे याचे वडील हे दिव्यांग असून, मुलाचा खून झाल्यानंतर त्याची आई संगीता ताटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला. आपल्या मुलाचा खून करण्यापूर्वी आरोपींनी घरी येऊन धमकावले होते, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT