आमदार गणपत गायकवाड यांचं पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरण: वैभव विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळले नसल्याचं पोलिसांकडून स्पष्ट Pudhari News Network
क्राईम डायरी

मोठी बातमी! आमदारांचा मुलगा वैभव गायकवाडचं नाव चार्जशीट मधून वगळलं

गोळीबार प्रकरण : वैभव विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळले नसल्याचं पोलिसांकडून स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी (ठाणे) : शुभम साळुंके

कल्याण पूर्वेचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदेसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या पुरवणी चार्जशीटमधून आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड याचं नाव पोलिसांकडून वगळण्यात आलं आहे. वैभव याच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

जवळपास वर्षभरापूर्वी गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये शिंदेसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी गणपत गायकवाड हे अजूनही जेलमध्ये आहेत. त्यांच्यासह अन्य काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात आरोपी म्हणून आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड याचंही नाव सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलं होतं. मात्र या प्रकरणाची पुरवणी चार्जशीट नुकतीच उल्हासनगरच्या न्यायालयात सादर करण्यात आली असून त्यातून वैभव गायकवाड याचं नाव वगळण्यात आल्याचं समोर आलंय. याबाबत पोलिसांना विचारलं असता, वैभव गायकवाड यांचा या गोळीबारात सहभाग असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळून आलेले नाहीत. इतकंच नव्हे, तर गोळीबार होण्यापूर्वीच ते पोलीस ठाण्याच्या ही बाहेर पडले होते हे सीसीटीव्हीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे चार्जशीटमधून त्यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यापासून वैभव गायकवाड फरार असून आता मात्र चार्जशीटमध्ये त्याचं नावच नसल्यामुळे पोलिसांनी त्याला एकप्रकारे क्लीनचीट दिल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT