अशोक मोराळे, पुणे
यवतजवळील भुलेश्वर मंदिराच्या घाट परिसरात त्या दिवशी भल्या सकाळी झाडीत एका व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. डोक्यात धारदार शस्त्राने वार करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतून तो मृतदेह पेटवून देण्यात आला होता. पण अखेर पोलिसांनी सत्य चव्हाट्यावर आणलेच...
पहाटेची वेळ असल्याने तांबडं फुटू लागलं होतं. अंधार कमी होऊन थोडा थोडा उजेड पडू लागला होता. हातातून वेळ निसटत चालला होता. आहे त्या वेळेतच योगेशला लखनचं काम तमाम करायचं होत. विकास आणि योगेश लखनला भुलेश्वर मंदिराच्या घाट परिसरातील फॉरेस्टच्या झाडीत घेऊन गेले. विकास याने लखनचे हात धरले होते. त्याचवेळी योगेशने पिशवीतील कुर्हाड काढून त्याच्या डोक्यात पहिला घाव घातला. रक्ताच्या चिळकांड्या दोघांच्या अंगावर उडाल्या. दुसरा घाव घालताच लखन मोठ्याने ओरडला, ‘दाजी माझं चुकलं...’ त्याचवेळी योगेशने त्याच्या पाठीत तिसरा घाव घातला, तशी कुर्हाड त्याच्या पाठीत रुतून बसली. त्यानंतर योगेशने आपल्या खिशातील चाकू काढून त्याच्या पोटात भोसकले.
अर्धमेला लखन वेदनेने विव्हळत खाली कोसळला. दोघांनी त्याला ओढत एका खड्ड्यात टाकले. दोघांना सकाळ होण्याची भीती होती. कोणी आपल्याला पाहिले तर अवघड होईल म्हणून योगेशने सोबत कॅनमधून आनलेले पेट्रोल लखनच्या अंगावर शिंपडले. जखमांवर पेट्रोलचा शिडकाव होताच तो मोठ्याने किंचाळू लागला. क्षणाची देखील संधी न गमावता विकास याने पेटलेली काडी त्याच्या अंगावर टाकली. पेट घेताच लखन उठला आणि पळू लागला. परंतु त्याची धडपड काही सेकंदापुरतीच होती. काही वेळानंतर तो परत खाली पडला आणि कायमचा शांत झाला. त्यानंतर दोघांनी तेथून पळ काढला. तोपर्यंत राजश्री आणि इतर दोघे कासुर्डी टोल नाक्यावर थांबले होते. योगेशने त्यांना गावी जाण्यासाठी दोन हजार रुपये दिले. पुढे योगेश त्याच्या गावी गेला तर राजश्री, विकास हे ढोकीकडे निघून गेले. योगेशने घरी येताच अंगावरील कपडे आणि जॅकेट जाळून टाकले. कुर्हाड,चाकू लवपून ठेवला.
आता चांगलं उजाडलं होतं. गावकर्यांची लगबग सुरू होती. तेवढ्या सकाळी 9 च्या सुमारास भुलेश्वर घाटातील फॉरेस्टच्या झाडीत एकाला अर्धवट जळालेला मृतदेह दिसला. यवत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील दाखल झाले. पोलिसांना आता जळालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यापासून ते त्याच्या खुन्याला बेड्या ठोकण्यापर्यंत कामगिरी बजावायची होती. घटनास्थळी कोणताच पुरावा शिल्लक नव्हता. तांत्रिक विश्लेषणात पोलिसांच्या हाती सुरुवातीला फारसे काही लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी राज्यात बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
त्यावेळी ढोकी पोलिस ठाण्यात लखन बेपत्ता असल्याची तक्रार यवत पोलिसांच्या हाती लागली. तोपर्यंत 14 दिवसांचा कालावधी लोटला होता. लखनचे खुनी बिनधास्त होते. मृतदेहाचा चेहरा दाखवून पोलिसांनी लखनच्या नातेवाईकांकडून त्याची ओळख पटविली. पोलिसांनी आपले सर्व फासे टाकून तपासाला सुरुवात केली होती. लखनची ओळख पटल्यामुळे पोलिसांना काही प्रमाणात का होईना यश मिळाले होते. लखनच्या भावाला विश्वासात घेऊन विचारणा केली तेव्हा त्याच्या भावाने राजश्री आणि लखनच्या अनैतिक नात्याबद्दलची माहिती दिली. आता पोलिसांचे निम्मे काम झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे यांच्या पथकाने राजश्रीचा नवरा योगेशला त्याच्या पुरंदर तालुक्यातील गावातून ताब्यात घेतले. पोलिसांना पाहून आपल्या कृत्याची त्यालासुद्धा चाहूल लागली होती.
सुरुवातीला आढेवेढे घेणार्या योगेशने पोलिसी खाक्या दिसताच आपणच राजश्री, मेहुणा विकास यांच्यासोबत मिळून लखनचा काटा काढल्याची कबुली दिली. त्याचवेळी यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक महेश माने यांच्या पथकाने राजश्री, विकास, शुभम आणि काकासाहेब या चौघांना ढोकी गावातून ताब्यात घेतले. पोलिसांनी एका मिसिंग तक्रारीवरून कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना, तांत्रिक विश्लेषण आणि परिस्थितीजन्य तपासावर 17 दिवसांत एका खुनाच्या गुन्ह्याचा छाडा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कामगिरी केली.
(उत्तरार्ध)