अशोक मोराळे, पुणे
रात्री उशिरापर्यंत सौरभ घरी परतला नाही म्हणून इकडे त्याचे नातेवाईक आणि मित्र शोध घेत होते. शोधाशोध केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो मिळून आला नाही. शेवटी नातेवाईक आणि मित्रांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दुसर्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह शिंदेवाडी गावच्या हद्दीत जुन्या कात्रज बोगद्याच्या अलीकडील डोंगरावर मिळून आला. अंगावर धारदार शस्त्राचे वार होते. पोलिसांच्या तपासात अशा एका खुनाचा उलगडा झाला की, तो तुम्हा-आम्हाला विचार करण्यास भाग पाडणारा होता.
जेमतेम सोळाव्या वर्षात दुनियादारीची जाण नसलेल्या एका पोराने आपल्या साथीदारांसोबत मिळून एका उमद्या तरुणाचा निर्घृण खून केला होता. भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावचा डोंगर परिसर जुन्या कात्रज बोगद्याला लागूनच आहे. पुणे शहरापासून जवळ असल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार्या लोकांची येथे नेहमी वर्दळ असते. मंगळवारी (दि. 19) सकाळी डोंगरावर चालण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्याला देखील हा खुनाचा प्रकार असल्याचे लक्षात आलेे. त्याने भारती विद्यापीठ पोलिसांना फोन करून डोंगरातील झाडीत एका तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तातडीने डोंगराकडे धाव घेतली. लागूनच आंबेगाव पोलिस ठाण्याची देखील हद्द आहे. त्यामुळे त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांना दिली. तेसुद्धा डोंगराकडे रवाना झाले. तोपर्यंत सकाळचे नऊ - साडेनऊ वाजले असतील. खिलारे आणि झिने कसलेले अधिकारी. त्यांना परिसराची चांगलीच माहिती. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता असलेल्या तक्रारीची माहिती घेतली. त्याचबरोबर आपल्या खबर्यांना अलर्ट केले. आदल्या दिवशी, सोमवारी रात्री उशिरा एक मिसिंगची तक्रार दाखल असल्याचे खिलारे यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बेपत्ता झालेल्या व्यक्तीची माहिती घेतली. खून झालेल्या तरुणाची आणि तक्रारीतील माहिती थोडी जुळून येत होती. त्यांनी तरुणाचे नातेवाईक आणि मित्राला बोलावून खात्री केली. त्यावेळी तो मृतदेह बेपत्ता झालेल्या तरुणाचा असल्याचे समोर आले. खिलारेंचा संशय खरा ठरला. सौरभ स्वामी आठवले असे त्याचे नाव होते. जिथे हा खुनाचा प्रकार घडला होता, ती हद्द पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिसांची होती. त्यामुळे खिलारे आणि झिने यांनी ही माहिती त्यांना दिली. मृत तरुणाची ओळख पटवून देण्यापर्यंतचे काम पुणे शहर पोलिसांनी केले होते. मात्र खुनाचे कारण शोधून खुन्यांना बेड्या ठोकण्याची कामगिरी आता राजगड पोलिसांना करायची होती.
आता कुठं त्याला सोळावं लागलं होतं. अजून ओठावर मिसरुडसुद्धा फुटलं नव्हतं. मात्र या वयात त्याला प्रेमाची पालवी फुटू लागली होती. तो राहात असलेल्या इमारतीतील चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर त्याचा जीव जडला होता. ना त्याला वयाची समज होती, ना तो करत असलेल्या कृत्याचे गांभीर्य. परंतु नादान प्रेमाचं भूत त्याच्या डोक्यात संचारलं होतं. त्यामुळे तो काहीही करण्यास तयार झाला होता. तो सुडाने पेटून उठला होता. सौरभ मूळचा सोलापूर जिल्ह्यातील राहणारा. पुण्यातील एका आयटी कंपनीत तो काम करत होता. तो देखील याच इमारतीत राहात होता. अल्पवयीन मुलीला तो त्याची बहीण मानत होता. तो त्या मुलीला शाळेत सोडण्या-आणण्याचे काम करत असे. एकेदिवशी अल्पवयीन मुलाच्या प्रेमाचा हा प्रकार सौरभच्या कानावर आला. त्याने ही माहिती मुलीच्या घरी दिली. त्यांनी अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांना सांगितले. त्यामुळे त्याला आत्याचे घर सोडून वडगाव मावळ येथे आई-वडिलांकडे राहण्यास जावे लागले.
‘सौरभ आपल्या प्रेमात आडवा आला. त्याच्यामुळेच आपल्याला वडगावला यावे लागले ’ असे अल्पवयीन मुलाने समज केला. त्यातूनच त्याने आपल्या वाटेतून कायमचे सौरभला दूर करायचे ठरवले.