Built to last Bridge- Choluteca Bridge Story
तुम्ही चोलुटेका ब्रिजबद्दल ऐकले आहे का? होंडुरास प्रजासत्ताक, हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. त्यातील चोलुटेका शहरात चोलुटेका (choluteca) नावाची नदी आहे. चोलुटेका पूल ब्रिज हा त्या शहराचे मानचिन्ह आहे. हा भाग मध्य अमेरिकेतील वादळे आणि चक्रीवादळांसाठी कुप्रसिद्ध आहे.
रोरावणारे वारे, विजांच्या कडकडाटा सह मुसळधार पाऊस, गारपीट हे नेहमीचेच. त्यामुळे अशा रौद्र चक्री वादळांचा सामना करून ब्रिजने अनेक वर्षे भक्कमपणे उभं राहणे अपेक्षित होते. 1990 च्या दशकात ह्या शहरासाठी कोणत्याही आपत्तीच्या कसोटीवर टिकेल असा नवीन बायपास रस्ता आणि दुसरा पूल करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी एका जपानी कंपनीला कंत्राट देऊन मजबूत पूल बांधण्यात आला. हा पूल आधुनिक काळातील डिझाईन आणि अभियांत्रिकीचा चमत्कार होता.
नवीन चोलुटेका ब्रिज, ज्याला “ब्रिज ऑफ राइजिंग सन” ( Bridge of rising sun ) म्हणूनही ओळखले जाते हा लॅटिन अमेरिकेतील जपानी कंपनीने 1996 आणि 1998 च्या दरम्यान बांधला. त्याची ही गोष्ट. १९९८ साली देशाला अभिमानास्पद अशा ह्या ब्रिजचे लोकार्पण करण्यात आले. परिसरातील एक सुंदर व अभियांत्रिकी चमत्कार म्हणून त्या ब्रिजची ख्याती सर्वदूर पोहोचली.
दुर्दैवाने त्या ठिकाणी त्याच वर्षी म्हणजे ऑक्टोबर 29, 1998 साली "मीच" नावाच्या कॅटेगरी 5 श्रेणीच्या प्रचंड चक्री वादळाचा तडाखा होंडुरासला व पर्यायाने चोलुटेका ह्या गावाला बसला. गुआनाजा बेटावरील खारफुटीचे जंगल त्याने जवळजवळ नष्ट केले. मुख्य भूभागावर, आणि पर्वतराजीत चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडला. डोंगराळ भागात अनेक दरडी कोसळल्या. लक्षावधी टन माती वाहून गेली. जंगल नष्ट झाले. परिसरातील पशुपक्षी उध्वस्त झाले. दक्षिण होंडुरास मधील चोलुटेका येथे ढगफुटी झाली. सर्वाधिक म्हणजे एकूण ९२८ मिमी (३६.५ इंच) पाऊस कोसळला.
तेथील वार्षिक पर्जन्यमानाच्या निम्म्याहून पाणी एका दिवसात पडले. पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आले. झाडे उन्मळून पडली. घरे, गुरे, गाड्या, माणसे वाहून गेली. पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुमारे सात हजार लोकांनी आपला जीव गमावला. होंडुरासचे तत्कालीन अध्यक्ष, कार्लोस रॉबर्टो फ्लोरेस यांनी अंदाज व्यक्त केला की, मिच चक्री वादळामुळे मुळे तो प्रदेश आर्थिक विकासाच्या दृष्टीने ५० वर्षे मागे गेला.
पण आता एक वेगळीच गडबड झाली होती. ब्रिजकडे जाणारे दोन्ही बाजूंचे रस्ते वादळात वाहून गेले होते. इतकंच नाही तर चक्रीवादळामुळे झालेल्या प्रचंड पुराच्या वेळी त्या ब्रिजखालून वाहणाऱ्या चोलुटेका नदीने आपला प्रवाह बदलला. आणि आता ती ब्रिजच्या खालून नाही तर त्याच्या बाजूने वाहत होती. परंतु नवीन चोलुटेका पूल किरकोळ नुकसानीसह वाचला. तो वादळाला तोंड देत भक्कमपणे उभा होता!
पण आता तो कुणालाही न जोडणारा पूल होता ! 'A bridge over nothing. A bridge to nowhere.' नदी आता पुलाखालून वाहत नाही. देशाचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून गौरवलेला, हौण्डुरासच्या मानचिन्ह असलेला तो ब्रिज आता कोरड्या जमिनीवर उभा आहे. पुल सहसा एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी बांधले जातात. आपल्या भूतकाळाला आपल्या वर्तमानाशी किंवा वर्तमानाला भविष्याशी जोडणारे पूल आपण आपल्या जीवनात सतत बांधत असतो.
चोलुटेका पुलाची गोष्ट केवळ एका पुलाची नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही नियोजनं असतात, जी आपण मोठ्या विश्वासाने उभी करतो. पण परिस्थिती बदलली की त्या नियोजनांचा संदर्भही बदलू शकतो. अनेकदा प्रश्न आपल्या तयारीचा नसतो, तर बदललेल्या वास्तवाचा असतो.
नव्या काळात जुन्या कौशल्याला वाव नाही. पर्यावरणातील बदलांमुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. जुन्या पारंपरिक शेती पद्धतीला धरून बसण्यापेक्षा त्यांनी संवर्धित शेतीचे नवे तंत्र ( SRT) शिकून आपले व पर्यायाने देशाचे भले केले पाहिजे.
चार्ल्स डार्विन सांगून गेला, “It is not the strongest species that survives, nor the most intelligent that survives, it is the one that is most adaptable to change that survive ” आपला गाभा 'Core' भक्कम ठेवून काळाप्रमाणे जो लवचिकता बदलत राहील तोच पुढील जगात यशस्वीपणे टिकेल. Built to Adapt - not Built to Last - is going to be the new normal !
- सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे.