Exam Pressure On Children (Pudhari File Photo)
बहार

Exam Pressure On Children | गुणांच्या शर्यतीत लेकरांचाही बळी?

केवळ सराव परीक्षेमध्ये कमी गुण पडल्याच्या रागातून संतापलेल्या एका पित्याने स्वतःच्या मुलीलाच जात्याच्या लाकडी खुंट्याने जबर मारहाण केली.

पुढारी वृत्तसेवा

संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

केवळ सराव परीक्षेमध्ये कमी गुण पडल्याच्या रागातून संतापलेल्या एका पित्याने स्वतःच्या मुलीलाच जात्याच्या लाकडी खुंट्याने जबर मारहाण केली. बापाच्या या नृशंस आणि विकृत कृत्याने त्या तिचा अंत झाला. विशेष म्हणजे, मारहाण करणारी व्यक्ती शिक्षक आहे. अर्थात, ही पहिली घटना नाही. अधिकाधिक गुण मिळायलाच हवेत, यासाठी बालमनांवर सतत दबाव आणणारे आणि त्यांना तणावग्रस्त बनवणारे असंख्य पालक आज समाजात आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे.

काल-परवापर्यंत पाश्चात्त्य देशांत जे घडत होते, ते आता आपल्याही देशात घडू लागले आहे. त्यावेळी आपण फार चिंता केली नाही. आता त्या गोष्टी आपल्या दारावर येऊन घडताहेत. अलीकडेच सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे घडलेली घटना समाज म्हणून आपली मान शरमेनं खाली घालणारी आहे. शिक्षणामुळे कालपर्यंत विद्यार्थी आत्महत्या करत होते. आता मार्कांच्या तीव्र स्पर्धेमुळे पालकच मुलांना ठार करू लागले आहेत. आपली मुलं आपली आहेत. अपेक्षांच्या ओझ्याखाली ठेवून त्यांच्याकडून जे काही अपेक्षित करतो आहोत, ते त्यांच्या मर्यादेच्या पलीकडील आहे का, याचा विचार करायला हवा. माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले धोंडिराम भगवान भोसले यांची मुलगी साधना ही बारावीत शिकत होती. धोंडिराम यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलीला नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खासगी शिकवणी लावली होती. खासगी शिकवणी वर्गात घेतलेल्या सराव परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले. त्यानंतर चिडलेल्या जन्मदात्या बापाने आपल्या लेकीला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला. खरे तर साधना अभ्यासात हुशार होती. तिला दहावीला 92.60 टक्के गुण मिळाले होते. शाळेत तिला पहिला क्रमांक मिळाला होता.

बारावीनंतर तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. त्यासाठी तिला शिकवणी लावून स्वप्नाचा मार्ग सुलभ केला जात होता. सराव चाचणीत कमी गुण मिळाल्याने माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असलेले वडील धोंडिराम भोसले चिडले. त्यांनी साधनाला कमी गुण का मिळाले? याचा जाब विचारत मारहाण केली. घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण झाली. साधनाच्या डोक्याला जबर मार लागला, संपूर्ण शरीराला इजा झाली. तिला दवाखान्यात नेले असता, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. आपण नेमके काय करत आहोत? याचे भान संतापाचा राक्षस मस्तकात गेला की राहत नाही, तेच येथे घडले. आपले पाल्य म्हणजे आपला गुलाम आहे, या भूमिकेतले हे पालक निष्ठूर मालकासारखे वर्तन का करतात? यामागचे कारण गुणांसाठीच्या जीवघेण्या स्पर्धेत आपला पाल्य सदोदित चमकला पाहिजे, ही मानसिकता. यासाठी मुलांची आवड, बुद्धिमत्ता, क्षमता या मूलभूत गोष्टींचा विचार पायदळी तुडवला जात आहे, याचा विचार कोण करणार?

समाजातील शिकलेला घटकही शिक्षणाचा विचार नेमका काय करतो? याचा हा पुरावा आहे. शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास, समग्र विकास, माणूस घडवणे, शिक्षण म्हणजे सुप्त गुणांचा विकास, शिक्षण म्हणजे चारित्र्याचा विकास, शिक्षण म्हणजे मस्तकातील बाहेर काढणे आहे. शिक्षण म्हणजे पैलू पाडणे आहे हा सारा विचार वर्तमानात खोटा ठरू लागला आहे. शिक्षणाचा संबंध केवळ नोकरी, पैसा, पॅकेज, प्रतिष्ठा एवढ्यापुरताच मर्यादित झाला आहे. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुलांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची मानसिकता वाढते आहे. त्यासाठी हवा तितका पैसा खर्च करण्याची पालकांची तयारी आहे. पैसे खर्च करतो आहोत, तर त्याचे फलित मिळायला हवे. ते फलित म्हणजे केवळ मार्क. पैसा खर्च केला की, आम्हाला मार्क हवे आहेत, अशी अपेक्षा पालक ठेवून आहेत. त्यामुळे पैसा खर्च करूनही अपेक्षित मार्क मिळत नसतील, तर पालकांचा संतापाचा आगडोंब उठतो आहे. तो संताप मार्क कमी मिळाले म्हणून जरूर आहे. मात्र, त्यापेक्षा मुलांचे कमी मार्क म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला धक्का आहे.

आपला पेशा, आपली समाजातील पत, आर्थिक स्थितीनुसार स्वतःच्या प्रतिष्ठेची प्रतिमा मनपटलावर पालक निर्माण करतात. असे मार्क कमी मिळाले की, प्रतिमेला धक्का बसतो. मुलांच्या शिकण्यापेक्षा पालकांची प्रतिष्ठा अधिक वरचढ होताना दिसते आहे. त्यातून संतापाची भावना तीव्र बनते आहे. पण, पालकांनो, आता तरी शिक्षणातील मार्कांसाठी अतिरेकी भूमिका घेऊ नका. मार्क म्हणजे शिक्षण असे समजता; पण ते शिक्षण नाही. आपली मुलं म्हणजे आपले गुलाम नाहीत. मुलं म्हणजे स्वतंत्र व्यक्ती आहेत हे समजून घ्यायला शिका. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना स्वतःची स्वप्नं पाहत उंच भरारी घेण्याचे स्वातंत्र्य आहे. मुलं आपली आहेत म्हणजे आपण त्यांचे मालक नाही. दुर्दैवाने, आपले पाल्य म्हणजे आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणारी व्यवस्था आहे, असे समजून त्यांच्याशी व्यवहार केला जातो आहे. त्यांच्याकडे चुकूनही अशा द़ृष्टीने पाहू नका आणि तसे समजून त्यांच्याशी वागूदेखील नका.

मुलांचे मार्क म्हणजे त्यांच्या जीवनाच्या यशाचा अथवा जीवन समृद्धतेचा मार्ग आहे, असे अजिबात नाही. जगात ज्या लोकांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे, ते सारेच शालेय परीक्षेत प्रथम क्रमांकावर होते, असेही नाही. शिक्षणाचा विचार आणि शाळेत मिळणारे मार्क हे तुमच्या मुलांचे भविष्य नाही, हे लक्षात घ्या. शाळेतील मार्कांपेक्षा त्यांना फुलू द्या, वाढू द्या, बहरू द्या. तुम्ही त्यांना शिक्षणाच्या मूलभूत हेतूचा प्रवास करू द्यायला हवा. मुलांच्या वाटा समजून घेत, त्यांचे बोट धरून तुम्ही चालला, तर मुलं तुमचे नाव उज्ज्वल करतील. चांगला माणूस बनतील. त्यांच्या जीवनाचा प्रवास अधिकाधिक आनंदमय होईल. त्यांना समजून घेतल्याने ते तुमच्यावर आई-बाप म्हणून नितांत प्रेम करतील. आज पालक म्हणून मुलांवर प्रेमवर्षावाची गरज आहे. छोट्याशा अपयशात पालक म्हणून तुम्ही आधार बनण्याची गरज आहे. त्यांनी धीर देत ‘लढ’ म्हणण्याची आवश्यकता आहे; पण आजचे आई-बाप संतापाचे भूत मस्तकी घेऊन मुलांचे जीवन संपवताहेत. पालक विश्वासाने हात हातात घेण्याऐवजी, हात उगारून जिवंत मारताहेत. हा पालकत्वाचा पराभव आहे.

शिक्षणाचा परिणाम म्हणून हे घडत असेल, तर तो शिक्षणाचादेखील पराभव आहे. पालक या नात्याची काही जबाबदारी असते, याचे भान आपण कमविण्यात अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाइतकेच पालकत्वाच्या शिक्षणाची निंतात गरज आहे. मुळात मुलांची अभिरूची, कल, आवड, बौद्धिक क्षमता यांचा विचार सर्वात महत्त्वाचा आहे. जगप्रसिद्ध बुद्धिशास्त्रज्ञ हॉर्वर्ड गार्डनर यांनी प्रत्येक मुलामध्ये दहा प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात, अशी मांडणी केली आहे. राज्यातील शिक्षक प्रशिक्षणातही त्यासंदर्भाने विचार प्रतिपादन केला जात आहे. आटपाडीतील घटनेतील पालक शिक्षक असल्याने किमान या गोष्टी तरी त्यांनी समजून घ्यायला हव्या होत्या; पण आज सुशिक्षित पालकच मार्ककेंद्री झाले आहेत. शिकल्यानंतर मार्क मिळतात; पण विचार प्रक्रियेत परिवर्तन घडत नाही, हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे.

जगप्रसिद्ध विचारवंत खलील जिब्रान यांनी मुलांच्या संदर्भाने केलेला विचार अधिक महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, पालक म्हणून आपण केवळ आपल्या मुलांच्या जन्माचे माध्यम आहोत; त्यांच्या अस्तित्वाचे पूर्ण स्वामित्व आपल्याला नाही. त्यांनी आपली वाट स्वतः निवडावी, आपलं जीवन जगावं, ही जीवनाची नैसर्गिक मागणी आहे. आज जेव्हा पालक मुलांवर आपल्या अपेक्षा लादतात तेव्हा ते जणू त्यांना मालकी हक्काच्या वस्तूसारखे वागवतात. ही प्रवृत्ती जिब्रान यांच्या द़ृष्टीने जीवनाच्या गाभ्याशीच विसंगत आहे. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान देणं नव्हे; तर विचार करण्याची क्षमता निर्माण करणं; पण आपल्याकडे शिक्षण ‘गुण’ आणि ‘गोष्टी पाठ करणे’ या कल्पनांभोवती फिरते. जिब्रान यांच्या मतानुसार, ही मानसिक गुलामीची सुरुवात असते. तेव्हा आजच्या काळात मुलांच्या क्षमतांचा विचार करत त्यांना समजून घेण्याची गरज आहे.

कोणताही एक अभ्यासक्रम म्हणजे अत्यंत चांगला, असे नसते. हे पालकांनी समजून घ्यायला हवे. क्षमतेनुसार प्रत्येक मूल स्वतः घडत असते. त्याला जगण्याचे स्वातंत्र्य दिले, तर ते अधिक समृद्धतेने स्वतःला घडवत जाईल. पालकांनी आपल्या अपेक्षा किती ठेवायच्या याचे भान ठेवतानाच आपल्या प्रतिष्ठेच्या खुळचट कल्पनांना आवर घालायला हवा. मुले तणावाखाली आहेत, म्हणून समुपदेशनाचा विचार पुढे येतो आहे; पण वर्तमानातील घटना पाहिल्या, तर पालकांसाठी समुपदेशनाची गरज अधोरेखित होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT