Chongqing East Railway Station | चिनी रोबो क्रांतीचा अद्‌भुत नजारा 
बहार

Chongqing East Railway Station | चिनी रोबो क्रांतीचा अद्‌भुत नजारा

पुढारी वृत्तसेवा

डॉ. योगेश प्र. जाधव

21व्या शतकातील जागतिक विकासाच्या स्पर्धेत चीनने ज्या वेगाने स्वतःला उभे केले आहे, त्याचे सर्वांत प्रभावी उदाहरण म्हणजे चोंगकिंग पूर्व रेल्वे स्टेशन. अवघ्या 38 महिन्यांत उभारले गेलेले हे स्टेशन आज 12.20 लाख चौरस मीटर क्षेत्रफळासह जगातील सर्वांत मोठे रेल्वे स्टेशन म्हणून चर्चेत आले आहे. केवळ आकारमानामुळे नव्हे, तर त्याच्या उभारणीमागील तंत्रज्ञान, नियोजन आणि औद्योगिक द़ृष्टिकोनामुळेही या प्रकल्पाची जगभर चर्चा होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, 5जी नेटवर्क, लेसर प्रणाली आणि रोबो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चीनने आधुनिक पायाभूत सुविधांच्या नव्या युगाची झलक या स्टेशननिर्मितीतून जगासमोर ठेवली आहे.

गेल्या चार दशकांत चीनने जगातील सर्वांत मोठी पायाभूत क्रांती घडवून आणत आपला प्रचंड मोठा आर्थिक विकास केला आहे. 1980च्या दशकात आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर चीनने रस्ते, बंदरे, विमानतळ, ऊर्जा प्रकल्प, शहरे आणि उच्चगती रेल्वे यांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक केली. आज चीनकडे जगातील सर्वांत मोठे वेगवान रेल्वे जाळे असून त्याची लांबी सुमारे 45,000 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. बीजिंग-शांघाय, ग्वांगझू-शेन्झेन आणि चेंगडू-चोंगकिंगसारख्या औद्योगिक मार्गांनी चीनच्या अंतर्गत आणि किनारी भागांमधील आर्थिक दरी मोठ्या प्रमाणावर कमी केली. गेल्या 20 वर्षांत चीनने 1 लाख किलोमीटरहून अधिक द्रुतगती महामार्ग उभारले, तर शेकडो नवीन विमानतळ आणि बंदरे विकसित केली. शांघायचे यांगशान खोल समुद्री बंदर, हाँगकाँग-झुहाई-मकाओ समुद्र पूल आणि थ्री गॉर्जेस धरण यांसारखे प्रकल्प चीनच्या अभियांत्रिकी क्षमतेचे जागतिक प्रतीक बनले आहेत.

या विकासामागे चीनचे दीर्घकालीन राष्ट्रीय नियोजनही होते. माओ झेडोंग यांच्यापासून ते डेंग शियाओपिंग यांच्या आर्थिक सुधारणांपर्यंत चीनने औद्योगिक पाया मजबूत करण्यावर भर दिला. 2008 च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर चीनने जवळपास 4 ट्रिलियन युआनचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर करून पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली. त्यातून हजारो किलोमीटर रेल्वेमार्ग, मेट्रो नेटवर्क, औद्योगिक कॉरिडॉर आणि नवीन शहरे उभी राहिली. आज चीनमधील अनेक शहरांमध्ये बहुस्तरीय वाहतूक व्यवस्था, स्वयंचलित लॉजिस्टिक प्रणाली आणि डिजिटल प्रशासन यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे चीनचा विकास केवळ किनारी भागांपुरता मर्यादित न राहता अंतर्गत प्रदेशांपर्यंत पोहोचला.

आता चीनने पायाभूत विकासाच्या पुढच्या टप्प्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबो तंत्रज्ञान केंद्रस्थानी ठेवले आहे. बांधकाम, उत्पादन, वाहतूक, आरोग्य आणि सुरक्षाव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. चीनमध्ये आज लाखो औद्योगिक रोबो कार्यरत असून औद्योगिक रोबो वापराच्या बाबतीत चीन जगात अव्वल मानला जातो. बीजिंगने 2030पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जगातील अग्रगण्य राष्ट्र बनण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. यासाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक, संशोधन संस्था, तांत्रिक विद्यापीठे आणि खासगी तंत्रज्ञान कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे चीनची पायाभूत क्रांती आता केवळ काँक्रीट आणि पोलादापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती डेटा, अल्गोरिदम आणि स्वयंचलित यंत्रणांच्या नव्या युगात प्रवेश करत आहे.

21व्या शतकातील जागतिक विकासाच्या स्पर्धेत चीनने ज्या वेगाने स्वतःला उभे केले आहे, त्याचे सर्वांत प्रभावी उदाहरण म्हणजे, चोंगकिंग पूर्व रेल्वे स्टेशन. अवघ्या 38 महिन्यांत उभारले गेलेले हे स्टेशन आज 12.20 लाख चौरस मीटर क्षेत्रफळासह जगातील सर्वांत मोठे रेल्वे स्टेशन म्हणून चर्चेत आले आहे. केवळ आकारमानामुळे नव्हे, तर त्याच्या उभारणीमागील तंत्रज्ञान, नियोजन आणि औद्योगिक द़ृष्टिकोनामुळेही या प्रकल्पाची जगभर चर्चा होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, 5जी नेटवर्क, लेसर प्रणाली आणि रोबो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चीनने आधुनिक पायाभूत सुविधांच्या नव्या युगाची झलक या स्टेशननिर्मितीतून जगासमोर ठेवली आहे. चीनने डोंगराळ भूभाग, प्रचंड उष्णता आणि अवाढव्य बांधकाम क्षेत्र अशा कठीण स्थितीतही हा प्रकल्प विक्रमी कालावधीत पूर्ण केला. त्यामुळे चोंगकिंग पूर्व स्टेशन चीनच्या केंद्रीकृत विकास मॉडेलचे, औद्योगिक क्षमतेचे आणि तांत्रिक महत्त्वाकांक्षेचे प्रतीक बनले आहे. या स्टेशनच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर रोबोंचा वापर करण्यात आल्याने भविष्यातील बांधकाम उद्योगाची दिशा कशी असेल, याचेही संकेत या प्रकल्पातून मिळतात.

चीनच्या नैर्ऋत्य भागातील चोंगकिंग हे शहर गेल्या काही दशकांत प्रचंड वेगाने विकसित झाले आहे. एकेकाळी अंतर्गत आणि तुलनेने दुर्लक्षित मानला जाणारा हा प्रदेश आज चीनच्या सर्वांत महत्त्वाच्या औद्योगिक आणि आर्थिक केंद्रांपैकी एक बनला आहे. मोटार वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, अर्धसंवाहक उत्पादन आणि व्यापार साखळीतील महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून चोंगकिंगची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे या शहराला देशातील इतर आर्थिक केंद्रांशी वेगवान संपर्क देण्यासाठी चीनने चोंगकिंग पूर्व रेल्वे स्टेशनची उभारणी केली.

चोंगकिंग हे सुमारे 3000 वर्षांचा इतिहास लाभलेले शहर आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपानी सैन्याने नानकिंगवर कब्जा केल्यानंतर काही काळ चीनच्या राष्ट्रवादी सरकारने येथेच राजधानी स्थापन केली होती; मात्र या शहराचा खरा कायापालट 1960च्या दशकात सुरू झाला. त्यावेळी माओ झेडोंग यांनी ‘तिसरी आघाडी मोहीम’ राबवली. या मोहिमेअंतर्गत चीनच्या किनारी भागांवरील औद्योगिक अवलंबित्व कमी करून अंतर्गत प्रदेशांमध्ये संरक्षण उद्योग, पोलाद कारखाने, रेल्वे, ऊर्जा प्रकल्प आणि तांत्रिक सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात आला. चोंगकिंग, सिचुआन, गुइझोऊ, युन्नान आणि इतर अंतर्गत प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली. या मोहिमेमुळेच चोंगकिंगच्या औद्योगिक विकासाचा पाया घातला गेला.

पुढील काही दशकांत चोंगकिंग चीनच्या सर्वांत गतिमान औद्योगिक शहरांपैकी एक बनले. आज या शहराची अर्थव्यवस्था 440 अब्ज डॉलरपेक्षा अधिक मानली जाते. मोटार वाहन उत्पादन, दुचाकी उद्योग, संगणक उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, रासायनिक उत्पादन आणि अर्धसंवाहक उद्योगांमध्ये चोंगकिंगची मोठी भूमिका आहे. यांगत्से नदी आर्थिक पट्टा आणि ‘बेल्ट अँड रोड’ उपक्रमाच्या संगमावर असल्यामुळे हे शहर चीनच्या अंतर्गत भागासाठी व्यापार आणि वाहतुकीचे महत्त्वपूर्ण प्रवेशद्वार बनले आहे. या वाढत्या आर्थिक आणि औद्योगिक विस्तारामुळे चोंगकिंगमध्ये वाहतूक सुविधांवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. विद्यमान रेल्वे स्टेशनची क्षमता मर्यादित ठरत होती. त्यामुळे चीनने नवीन पिढीचे, बहुआयामी आणि अत्याधुनिक रेल्वे स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला. त्यातून चोंगकिंग पूर्व स्टेशनची निर्मिती झाली. या स्थानकात 15 फलाट आणि 29 रेल्वेमार्ग आहेत. उच्चगती रेल्वे, पारंपरिक रेल्वे, मोनोरेल, बस, टॅक्सी आणि लांब पल्ल्याच्या वाहतूक सेवांचा एकत्रित समावेश करण्यात आला आहे. एका तासात जवळपास 16,000 प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता या स्टेशनकमध्ये आहे.

या प्रकल्पाची सर्वाधिक चर्चा झाली ती त्याच्या बांधकाम प्रक्रियेची. अत्यंत उष्ण हवामान, डोंगराळ परिसर आणि प्रचंड बांधकाम क्षेत्र यांमुळे पारंपरिक पद्धतीने काम करणे कठीण होते. उन्हाळ्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने कामगारांसाठी सातत्याने काम करणे आव्हानात्मक ठरत होते. अशा परिस्थितीत चीनने रोबो तंत्रज्ञानाचा व्यापक वापर केला. लेसर मार्गदर्शन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 5जी नेटवर्कवर आधारित काँक्रीट समतलीकरण करणारे रोबो वापरण्यात आले. हे रोबो मानवी कामगारांच्या तुलनेत तीन पट वेगाने आणि मिलिमीटर अचूकतेने काम करत होते. त्यामुळे श्रम खर्चात जवळपास 40 टक्के बचत झाली. याशिवाय 800 किलो वजनाचे काचपटल बसवण्यासाठी स्वतंत्र रोबो प्रणाली वापरण्यात आली. या यंत्रणेमुळे कामाचा वेग तीन पट वाढला आणि अपघातांचे प्रमाण 90 टक्क्यांनी घटले.

वेल्डिंगसाठी बहुदिशात्मक रोबो वापरण्यात आले. हे रोबो 24 तास अखंडपणे काम करू शकत होते. निरीक्षण आणि सुरक्षेसाठी गस्त घालणारे स्वयंचलित रोबोही तैनात करण्यात आले होते. चीन रेल्वेच्या अधिकार्‍यांच्या मते या संपूर्ण तंत्रज्ञानामुळे श्रम खर्च जवळपास निम्म्यावर आला आणि कामाची कार्यक्षमता तिपटीने वाढली. चोंगकिंग पूर्व स्टेशन हे चीनच्या विशाल उच्चगती रेल्वे जाळ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या स्टेशनमुळे नैर्ऋत्य चीनमधील 14 प्रमुख शहरांशी जलद संपर्क निर्माण झाला आहे. चेंगडू अवघ्या 1 तासाच्या अंतरावर आले आहे, तर झांगजियाजे 2 ते 3 तासांत गाठता येते. वुहान, चांगशा, शीयान आणि कुनमिंगसारखी महत्त्वाची शहरे सुमारे 3 तासांत जोडली गेली आहेत. बीजिंग, शांघाय आणि ग्वांगझूसारख्या आर्थिक केंद्रांपर्यंत सुमारे 6 तासांत पोहोचणे शक्य झाले आहे.

या प्रकल्पाने पुन्हा एकदा चीनच्या विकास मॉडेलविषयी जागतिक चर्चेला चालना दिली आहे. केंद्रीकृत नियोजन, मोठ्या प्रमाणावर सरकारी गुंतवणूक, तांत्रिक नवकल्पना आणि वेगवान अंमलबजावणी यांच्या आधारे चीनने जगाला पायाभूत विकासाचा वेगळा नमुना दाखवला आहे. अनेक लोकशाही देशांमध्ये प्रशासकीय प्रक्रिया, पर्यावरणीय मंजुरी, निधीअभावी आणि राजकीय मतभेदांमुळे प्रकल्प वर्षानुवर्षे अडकून पडतात. त्याउलट चीनमध्ये मोठे निर्णय अत्यंत वेगाने घेतले जातात आणि त्यांची अंमलबजावणीही तितक्याच वेगाने केली जाते. चोंगकिंग पूर्व रेल्वे स्टेशन म्हणजे आधुनिक औद्योगिक राष्ट्र कशाप्रकारे तंत्रज्ञान, वेग आणि नियोजन यांच्या साहाय्याने स्वतःचे भविष्य घडवू शकते, याचे प्रभावी उदाहरण आहे.

रोबोंच्या वापरामुळे वेळेची बचत आणि अचूकता वाढण्याबराबेरच मानवी जीवाला असणारे मोठे धोकेही टळतात. अतिउष्ण तापमान, विषारी वायू आणि आगीच्या ठिणग्या अशा घातक वातावरणात मानवी कामगारांऐवजी 24 वेगवेगळ्या मॉडेल्सचे रोबो या प्रकल्पात प्रत्यक्ष काम करत आहेत. गुंतागुंतीच्या रचनेच्या खांबांचे वेल्डिंग असो किंवा उंचावरील दर्शनी भागाचे पटल बसवणे असो, रोबो हे काम लीलया करत आहेत. उंचावर करण्यात येणार्‍या कामांमध्ये रंगकाम, सजावट, काचेच्या भिंतींची पाण्याच्या फवार्‍यांद्वारे चाचणी (वॉटर स्प्रे टेस्टिंग) आणि देखभालीची कामे रोबोद्वारे सुरक्षितपणे केली जात आहेत. याशिवाय, सुरक्षेसाठी वापरण्यात येणारे विशेष इन्स्पेक्शन रोबो संपूर्ण साईटचे विहंगम (पॅनोरॅमिक) चित्रीकरण करून नियंत्रण कक्षाला रिअल टाईम माहिती पुरवतात, तर स्वयंचलित क्लिनिंग रोबो तासाला 500 चौरस मीटर भागातील धूळ आणि बारीक दगड साफ करण्याचे काम चोख बजावतात.

विशेष बाब म्हणजे, या प्रकल्पात वापरण्यात येणारे बहुतांश रोबो हे चीनमध्येच विकसित आणि उत्पादित करण्यात आलेले आहेत. शांघाय शहराने आगामी काळासाठी प्रगत उत्पादनाचा एक महत्त्वाचा त्रैवार्षिक कृती आराखडा जाहीर केला असून त्या अंतर्गत 2028 पर्यंत शहरात 10,00,000 कर्मचार्‍यांमागे 600 रोबो असे प्रमाण गाठण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या हे प्रमाण 500 इतके आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT