सीए परीक्षेतील ‘मराठी’ मुसंडी (Pudhari File Photo)
बहार

Marathi Students Success CA Exam | सीए परीक्षेतील ‘मराठी’ मुसंडी

भारतामध्ये राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणार्‍या सनदी लेखापाल अर्थात सीएच्या यंदा झालेल्या परीक्षेमध्ये मराठी मुला-मुलींनी धवल यश संपादित केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

शुभांगी कुलकर्णी

भारतामध्ये राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणार्‍या सनदी लेखापाल अर्थात सीएच्या यंदा झालेल्या परीक्षेमध्ये मराठी मुला-मुलींनी धवल यश संपादित केले आहे. त्यामध्ये संभाजीनगरच्या तरुणाने देशात अव्वल क्रमांक पटकावणे, ही बाब प्रेरणादायी ठरणारी आहे. कोल्हापूर विभागात 44, तर सांगलीतील 20 तरुण यशाचे मानकरी ठरले आहेत. विशेष म्हणजे, एकूण निकालात उत्तीर्णांचा टक्का घसरत असताना मराठी तरुणांनी मारलेली बाजी विशेष कौतुकास्पद आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये देशपातळीवर घेतल्या जाणार्‍या आणि महत्तम काठिण्य पातळी असणार्‍या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठीचा झेंडा दिमाखात फडकताना दिसत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये केल्या गेलेल्या प्रयत्नांना चांगले यश लाभत असल्याचे यूपीएससी, एमपीएससीच्या निकालांमधून पाहायला मिळाले आहे. राज्यात अलीकडील काळात वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणार्‍या ‘नीट’च्या परीक्षेला बसणार्‍यांची संख्याही वाढत असून अनेक जण यामध्येही लक्षवेधी यश मिळवत आहेत. वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचे लक्ष्य असणार्‍या सीए अर्थात चार्टर्ड अकाऊंटंट या परीक्षेतही मराठी तरुण लक्षणीय यश मिळवत आहेत.

भारतीय चार्टर्ड अकाऊंटंटस् संस्थेने (भारतीय सनदी लेखापाल संस्था) मे 2025 सत्रासाठीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. त्यांचे आकलन केले असता यावेळचा निकाल अत्यंत ऐतिहासिकरीत्या नीचांकी ठरला आहे. विशेषतः फाऊंडेशन व इंटरमिजिएट परीक्षांमध्ये उत्तीर्णतेचा टक्का अत्यंत कमी आहे. फाऊंडेशन परीक्षेत प्रथम गटात केवळ 14.17 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले. ही टक्केवारी गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी मानली जात आहे. द्वितीय गटात हीच टक्केवारी 22.16 टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे, दोन्ही गट एकत्रित देणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये फक्त 14 .05 टक्केच विद्यार्थ्यांनी दोन्ही गट उत्तीर्ण केले. एकूण तीन लाखांच्या घरात परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांपैकी फक्त काही हजार जणांनी ही पातळी गाठली आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

इंटरमिजिएट परीक्षेचा विचार केला असता प्रथम गटाचा यशाचा टक्का 14 .67 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे, तर द्वितीय गटात तो 21.51 टक्क्यांवर स्थिरावला. याचा अर्थ असा की, ही परीक्षा केवळ अभ्यासावर नव्हे, तर मानसिक तयारीवरही अवलंबून आहे.

सीएच्या अंतिम परीक्षेत थोडा सकारात्मक कल दिसून येतो. प्रथम गटात 22.38 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर द्वितीय गटात ही टक्केवारी 26.43 इतकी आहे. देशभरातून एकूण 14,247 नवीन सनदी लेखापाल या सत्रात तयार झाले असून, ही संख्याही मागील काही सत्रांच्या तुलनेत कमी आहे. ही आकडेवारी पाहता असे लक्षात येते की, चार्टर्ड अकाऊंटंट होण्यासाठीच्या परीक्षेची काठीण्य पातळी अधिक आव्हानात्मक होत आहे.

अभ्यासक्रमात झालेले बदल, उत्तरपत्रिकेचे कठोर मूल्यमापन, विद्यार्थ्यांची मानसिक तयारी, कोव्हिडनंतरचे बदललेले अभ्यास सत्र, आत्मविश्वासात झालेली घसरण या सार्‍या घटकांचा एकत्रित विचार केल्यास या यशाचे मोल अधिक ठळकपणाने लक्षात येते. गतवर्षी भिवंडीच्या कुशाग्र रॉय याने इंटरमिजिएट एक्झाममध्ये 89.67 टक्के गुण मिळून त्याने ऑल इंडिया रँक पहिली पटकावली होती. अंतिम परीक्षेत मुंबईच्या किरण सिंग आणि घिलमान अन्सारी या दोघांनी अनुक्रमे 79.50 टक्के गुण मिळवत देशात तिसरा क्रमांक पटकावला होता.

सनदी लेखापाल ही पदवी मिळवणे केवळ बौद्धिक क्षमतेचा नाही, तर सातत्य, चिकाटी आणि मानसिक संतुलनाचा कस लावणारी कसोटी आहे. या परीक्षेचे स्वरूप अत्यंत व्यावसायिक, तांत्रिक आणि सैद्धांतिक असते. अभ्यासक्रमात झालेले अलीकडचे बदल हे विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी अनपेक्षित होते. अशा स्थितीतही यशस्वी होणार्‍या विद्यार्थ्यांच्या लक्षात येते की, केवळ कोरडे पाठांतर किंवा प्रश्नसंचावर आधारित सराव आता पुरेसा राहिलेला नाही. त्यांनी वेळेचे योग्य नियोजन, वास्तविक प्रात्यक्षिक, उदाहरणांसह उत्तरांची मांडणी, अभ्यासाच्या मनोवैज्ञानिक तंत्रांचा वापर आणि एकाग्रतेसाठी डिजिटल साधनांचे नियंत्रण यावर भर दिला आहे. काही विद्यार्थ्यांनी आत्मकथनातून स्पष्ट केले आहे की, दररोज सात ते आठ तास नियमित अध्ययन, आठवड्यातून एक वेळ ‘फूल पेपर प्रॅक्टिस’ व त्यानंतर स्वतःच मूल्यांकन करण्याची सवय हे त्यांचे यशाचे प्रमुख कारण ठरले.

सीए परीक्षेमध्ये बहुतांश यशस्वी विद्यार्थी शहरी भागातील असल्याचे मागील काळात दिसून आले आहे. याचे कारण, त्यांना दर्जेदार मार्गदर्शन, मॉक टेस्ट आणि प्रोफेशनल अभ्यासवर्गांची उपलब्धता होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही साधने मिळवणे अजूनही फार मोठे आव्हान आहे. परिणामी, ग्रामीण भागात या परीक्षांसाठी तयारी करताना विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेही सीए परीक्षांमधील यशाचा ग्रामीण टक्का शहरांच्या तुलनेत अर्ध्याहूनही कमी आहे. धोरणकर्त्यांनी याबाबत विचार करायला हवा. तसेच विद्यार्थ्यांमधील मानसिक आरोग्याच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या एका शैक्षणिक अभ्यासानुसार, सीए विद्यार्थ्यांपैकी 65 टक्के विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करत होते.

यामध्ये अपयशाची भीती, समाजिक दबाव, आर्थिक अस्थिरता आणि सततच्या तुलनांमुळे निर्माण होणारी न्यूनगंड भावना यांचा समावेश होता. विशेषतः सोशल मीडियावर यशस्वी विद्यार्थ्यांचे ‘हायलाईटस्’ बघून इतरांमध्ये अपयशाची भावना बळावते. अशा विद्यार्थ्यांनी उत्तीर्णांचे दडपण घेण्याऐवजी त्यांच्या यशाची सूत्रे आत्मसात करून जिद्दीने आणि प्रयत्नपूर्वक या परीक्षांना सामोरे जायला हवे. सीए परीक्षा पद्धतीतील बदलही लक्षात घेण्यासारखे आहेत. भारतीय सनदी लेखापाल संस्थेने आता पारंपरिक परीक्षेऐवजी अधिक कौशल्याधारित व ‘अ‍ॅप्लिकेशन बेस्ड’ प्रश्न विचारण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच आता एकसंध उत्तर, सुसंगत लेखन आणि लॉजिकल स्पष्टता ही यशाची पूर्वअट बनली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केवळ ‘परीक्षा’ न पाहता ‘प्रक्रिया’ म्हणून या अभ्यासाकडे पाहणे गरजेचे ठरते.

सीए हे सन्मानजनक आणि उत्तम मोबदला देणारे क्षेत्र असले, तरी यासाठी फक्त परीक्षा पास करणे पुरेसे नसते. विद्यार्थ्यांना ‘आर्टिकलशिप’ नावाचे तीन वर्षांचे प्रशिक्षणही अनिवार्य असते. यात अनुभवी लेखापालांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कामाचे शिक्षण दिले जाते. या कालावधीत विविध प्रकारच्या क्लायंटस्ची प्रकरणे हाताळावी लागतात, वेळेचे नियोजन शिकावे लागते. अनेकदा अल्प मोबदल्यावर कठोर श्रम करावे लागतात; पण हाच अनुभव त्यांच्या कारकिर्दीसाठी भक्कम पाया ठरतो. एकदा सनदी लेखापालाची पदवी मिळाल्यावर, त्या व्यावसायिकांसाठी अनेक क्षेत्रांमध्ये काम करण्याचे दारे खुली होतात.

स्वतःची प्रॅक्टिस सुरू करणे, बहुराष्ट्रीय कंपन्यांत वरिष्ठ वित्त सल्लागार होणे, नवीन व्यवसायांना कर सल्ला देणे, बँक व एनबीएफसी क्षेत्रात जोखीम विश्लेषक म्हणून कार्य करणे अशा विविध संधी उपलब्ध असतात. तसेच अनेक सनदी लेखापाल यशस्वी उद्योजक, सीईओ किंवा सार्वजनिक धोरणतज्ज्ञ म्हणूनही पुढे येतात. त्यांची व्यावसायिक नैतिकता, गोपनीयतेचे भान आणि वित्तीय शिस्त यामुळे त्यांना कोणत्याही उद्योग समूहात विशेष स्थान मिळते. यासाठी सतत बदलणारे कर कायदे, जीएसटीसारख्या नव्या प्रणाली, आंतरराष्ट्रीय मानके, माहिती-तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता हस्तक्षेप यांसारख्या अनेक गोष्टींबाबत त्यांना अद्ययावत राहावे लागते. देशाच्या अर्थकारणात, अर्थव्यवस्थेत सनदी लेखापालांचे योगदान मोठे आहे. या क्षेत्रात आज मराठी तरुण-तरुणी यश संपादित करत असले, तरी त्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. यासाठी शैक्षणिक संस्थांनीही पुढाकार घ्यायला हवा.

वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक, आयआयटी या क्षेत्रांबरोबरच सीए बनण्यासाठी विद्यार्थ्यांना उधृक्त करणे, प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. कुठलीही अर्थव्यवस्था अधिकाधिक औपचारिक व पारदर्शक बनत जाते, तसा सीएचा सहभाग अधिक निर्णायक बनतो. भ्रष्टाचार, करचोरी, बनावट आर्थिक कागदपत्रे व मनी लाँडरिंग यांना पायबंद बसून कर संकलन वाढवण्याची जबाबदारी सनदी लेखापालांनी काटेकोरपणाने निभावल्याने अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. तेव्हा ताज्या निकालांमधील मराठी तरुणांचे अभिनंदन करताना येणार्‍या काळात महाराष्ट्राने उत्तीर्णांच्या यादीत अव्वल राज्य बनण्याचा संकल्प करून पुढे जायला हवे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT