नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक रविवारी रात्री पार पडली. या बैठकीनंतर सोमवारी बिहार विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. २४३ जागा असलेल्या बिहार विधानसभेत भाजप १०१ जागा लढवत आहे. पहिल्याच यादीत भाजप बहुतांश उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. एकूण दोन याद्यांमध्ये भाजप आपले सर्व उमेदवार जाहीर करू शकते.
दिवाळीच्या पूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून देशभरात बिहार निवडणुकीची चर्चाही सुरू झाली. भाजपने जागा वाटपासह उमेदवार निवडीतही आघाडी घेतली. उमेदवार निवडीसाठी रविवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली. केंद्रीय निवडणूक समितीतील सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर सोमवारी भाजप उमेदवारांची पहिली यादी येऊ शकते. पहिल्या यादीमध्ये भाजप लढत असलेल्या अर्ध्यापेक्षा अधिक उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अनेक विद्यमान आमदारांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी आणि सरकार विरोधी भावना कमी करावी, हा यामागचा उद्देश असणार आहे. पहिल्या यादीमध्ये नव्या उमेदवारांसह काही महिला उमेदवार आणि काही कलाकारही उमेदवार असू शकतात.