चंद्रकांत पांडुरंग सरगर करगणी. ता. आटपाडी. जि. सांगली. (पुणे)
अहिल्याबाई होळकर या मल्हारराव होळकर यांच्या सून आणि एकुलत्या एका मुलाची खंडेरावाची पत्नी
परिसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडासारख्या धातूचेही सुवर्णात रूपांतर होते असे म्हणतात. खाणीतून बाहेर पडलेला हिरा आपल्या नैसर्गिक तेजाने प्रत्यक्ष परमेश्वराच्या मुकुटावरही विराजमान होतो. होळकरांच्या घराण्याशी विवाहबंधनात एकरूप होताच अहिल्याबाईच्या अंगभूत सदगुणांना उजाळा मिळाला.
मल्हारराव आणि खंडेराव नेहमी स्वाऱ्यात मग्न असत त्यामुळे घरातला सारा कारभार अहिल्याबाईंना बघावा लागत असे. धनाचा हिशोब ठेवणे तसेच जमाखर्चाची बाजू सांभाळणे हे सारे काम अहिल्याबाई करू लागल्या. खंडेरावास राज्यकारभारात रस नव्हता त्यामुळे आपण उभारलेल्या दौलतीचा कारभार खंडेराव कसा काय पाहिल हीच मोठी काळजी मल्हाररावांना लागली होती. वयाच्या २० वर्षी त्या पुत्रवती झाल्या तीन वर्षांनी त्यांनी कन्येला जन्म दिला.
कुंभेरी किल्ल्याला वेढा पडला असताना तोफेचा गोळा खंडरावाच्या छातीवर आदळला व ते गतप्राण झाले अहिल्याबाई सती जाण्यास तयार झाल्या ते पाहून एवढा धीराचा पुरूष ढसढसा रडू लागला. मल्हाररावांच्या डोळयांतून वाहणारे अश्रू पाहून अहिल्याबाईनी सती जाणे रहित केले.
मल्हररावाचा मुलगा होवून त्या दौलतीचा कारभार बघू लागल्या. कारभारावर नजर ठेवून असलेले मल्हारराव मनी तृप्त झाला. सतत मोहिमेवर असल्याने ते थकले होते. डोक्याला तोफेचा गोळा लागल्याने त्यांना कानदुखीचा त्रास होत होता अमलपूर मुक्कामी असताना मल्हरराव वैभव सोडून गेले.
अहिल्याबाई समोर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. दौलतीचा कारभार कसा करावा ? पाठीशी डोंगरसारखे भक्कम मल्हरराव आजवर उभा होते त्यांचाही आधार नाहीसा झाला होता. आता त्या पूर्णपणे निराधार झाल्या होत्या.
अहिल्याबाई यांचा पुत्र मालेराव नव्हता का त्यांचा भार हलका करायला ? वीस वर्षाचा तरूण पुत्र म्हणजे आईचा केवढा आधार. मालेरावाच्या मृत्यूनंतर सुभेदारी कुणाला दयावी हा प्रश्न निर्माण झाला. राज्यकारभाराची सूत्रे जरी अहिल्याबाईच्या हाती होती तरी सुभेदार पद रिकामे होते. मल्हररावाने आपल्या कर्तृत्वात अमाप संपत्ती कमावली होती त्या संपत्तीवर अनेकांचा डोळा होता. गंगाधर यशवंत नावाच्या कारभा-याच्या मनाला घेरले. त्याने राघोबादादास निरोप पाठवला की अहिल्याबाई दुःखात आहेत या वेळी आपण दौलतीवर ताबा केल्यास चांगले होईल आणि राघोबादादास हि कल्पना पटली.
गंगाधर यशवंतने अहिल्याबाईवर स्वारी करायला राघोबादादाला चिथावणी दिली ते कळताच अहिल्याबाईनी त्यांना निरोप पाठवला, एका अबलेशी (विधवेशी) युध्द करणे तुमच्या लौकिकास शोभत नाही. या युध्दात माझा पराभव झाला तर मी बोलून चालून खीच आहे. पण जर तुमचा पराजय झाला तर जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही याचा विचार करून काय ते ठरवा.
अहिल्याबाईने तुकोजी होळकराला ताबडतोब पाचारण केले. मल्हररावास पोटच्या मुलासारखे संभाळणारे तुकोजीला आहिल्याबाईनी सुभेदारी दिली लष्करी बाजू तुकोजीने सांभाळावी आणि राज्यकारभार अहिल्याबाईने करावा असे ठरले.
तुकोजीचे व अहिल्याबाईचे मध्यतंरी वाकडे आले व या दोघांमध्ये पुन्हा चांगले संबंध निर्माण व्हावेत म्हणून तुकोजीने महादजी शिंदे यांना गळ घातली पण मुददयांवर येताच अहिल्याबाई टाळाटाळ करीत असे त्यामुळे चिडूनच महादजी शिंदे म्हणाले आम्ही पुरूष आहोत आम्ही तुमच्या विरूध्द दंड ठोकून उभे राहिलो तर तुम्ही काय कराल?
अहिल्याबाई तेवढ्याच चढत्या स्वरात जबाब दिला. पाटीलबुवा कुणाच्याही ओंजळीने पाणी पिणारी मी नव्हे आपण खुशाल तुकोजीसह फौज घेऊन या हत्तीच्या पायात साखळदंड घालून तुमच्याशी झुंज घेईन तेव्हाच मल्हरराव होळकरांची सुन म्हणवेन. शंका असल्यास खात्री करून घ्यावी. पाटीलबुवांनी विषयांतर करून गोष्ट टाळली.
पतीच्या निधनानंतर त्यांनी सारे आयुष्य एखादया तपस्विनीप्रमाणे काढले. पहाटेच स्नान आटोपून त्या पूजाविधी करायच्या, भोजननंतर त्या दरबारात येत असे व सायंकाळपर्यंत तिथे कामकाज करीत असे नंतर पूजापाठ आणि फराळ रात्री नऊपासून वारापर्यंत पुन्हा सरकारी कामकाज पाहून नंतर त्या झोप घेत असे.
अहिल्याबाईचे नांव त्यांच्या दानशूरत्वामुळे विशेष प्रसिध्द झालेले आहे. देऊळ उभारणे धर्मशाळा तळी बांधणे अन्नछत्र उघडणे पशुपक्ष्यांनाही अन्नपाणी मिळते की नाही यावरही त्यांची नजर असे अवघ्या मानवजातीची सेवा हाच त्यांचा जीवनहेतू होता व त्यामुळेच त्यांच्या विषयी सर्व लोकांना आदर वाटे.
७० वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी खूप दुःख सोसले. पती सासू सासरे पुत्र बंधू नातू तसेच जावई यशवंतराव फणसे या सर्वांचा मृत्यू डोळयासमारे झाले - मुलगी मुक्ताबाई सती गेली.
आता जगायचे कशासाठी ? आणि कोणासाठी ? प्रपंचात राहूनही उदास वृत्तीने त्या जगत होत्या.
सन १७९५ श्रावणाचा महिना उजाडला नित्यनियमानुसार नामस्मरण करता करताच त्यांची जीवनज्योत मालवली.
रामराज्यातली सारी सुखे आपल्या प्रजेला प्रत्यक्षात मिळवून देणा-या देवी अहिल्याबाईचे नाव घेताच आजही मस्तक नम्र होते.
(लेखातील मते वैयक्तिक आहेत)