

नागपूर - विक्रमी विदेशी गुंतवणूक आली असल्याने अभिनंदन महाराष्ट्र असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे. मुख्यमंत्री म्हणतात, मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, 2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च 2025) आकडेवारी सुद्धा आता जाहीर झाली असून, आता या संपूर्ण वर्षांत मिळून महाराष्ट्राने 1,64,875 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. जी यावर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या 40 टक्के इतकी आहे. यावर्षी देशात आलेली गुंतवणूक ही 4,21,929 कोटी रुपये इतकी आहे.
महाराष्ट्रात गेल्यावर्षीचा विचार केला तर यावर्षी त्यापेक्षा 32 टक्के गुंतवणूक अधिक आली आहे. शेवटच्या तिमाहीत 25,441 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या 10 वर्षांतील रेकॉर्ड स्थापित करणारे वर्ष ठरले. अर्थात हा रेकॉर्ड आपण पहिल्या 9 महिन्यातच मोडला होता. मी महाराष्ट्रातील जनतेचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील.
2015-16 : 61,482 कोटी
2016-17 : 1,31,980 कोटी
2017-18 : 86,244 कोटी
2018-19 : 57,139 कोटी
एप्रिल ते ऑक्टोबर 2019 : 25,316 कोटी
2020-21 : 1,19,734 कोटी
2021-22 : 1,14,964 कोटी
2022-23 : 1,18,422 कोटी
2023-24 : 1,25,101 कोटी
2024-25 : 1,64,875 कोटी