Honda City Facelift 2026 File Photo
ऑटोमोबाईल

Honda City Facelift: २७ किमीहून अधिक मायलेज; नव्या लुकसह होंडा सिटी कार भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

'होंडा कार्स इंडिया'ने अखेर 'होंडा सिटी'चे २०२६ फेस्लिफ्ट व्हर्जन भारतीय बाजारात सादर केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Honda City Facelift 2026

नवी दिल्ली: होंडाने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन 'होंडा सिटी फेसलिफ्ट' लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि नवीन फीचर्ससह आलेल्या या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे १२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. २०२३ नंतर या सेडान कारमधील हा दुसरा मोठा बदल आहे.

मध्यम आकाराच्या सेडान सेगमेंटमध्ये व्होक्सवॅगन व्हर्टस, स्कोडा स्लाव्हिया आणि ह्युंदाई व्हर्ना यांसारख्या तगड्या स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी होंडाने हे नवे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, होंडाने आपली बहुप्रतीक्षित ZR-V SUV देखील सोबतच भारतीय बाजारात पहिल्यांदाच सादर केली आहे.

आकर्षक लूक आणि नवा लोगो

नवीन होंडा सिटीच्या बाह्य रचनेत कंपनीने बदल केले आहेत. कारचा पुढचा भाग पूर्णपणे बदलण्यात आला असून, यामध्ये हनिकॉम्ब पॅटर्नची नवी ग्रिल, नवीन डिझाइनचे हेडलाइट्स आणि त्यांना जोडणारी एक आकर्षक लाईट स्ट्रिप देण्यात आली आहे. याशिवाय कारच्या बोनेट आणि ग्रिलच्या मध्ये होंडाचा नवा लोगो आहे. बाजूच्या ट्रायअँगल ट्रिम्ससह नवा फ्रंट कारला अधिक स्पोर्टी लूक देतो.

कारच्या बाजूच्या रचनेचा विचार केल्यास, यात पुल-स्टाईल डोअर हँडल्स आणि नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स पाहायला मिळतात. कारच्या मागील भागात 'स्मोक्ड टेललाइट्स' आणि व्हर्टिकल रिफ्लेक्टर देण्यात आले आहेत. इंटिग्रेटेड स्पॉयलरमुळे बूट लिड अधिक आकर्षक दिसते. ही कार क्रिस्टल ब्लॅक पर्ल, रेडियंट रेड मेटॅलिक, ऑब्सिडियन ब्लू पर्ल, प्लॅटिनम व्हाईट पर्ल, लूनर सिल्व्हर मेटॅलिक आणि मेटेरॉईड ग्रे मेटॅलिक अशा ६ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

नवीन फीचर्स कोणती?

नव्या होंडा सिटीची आतील रचना आधीसारखीच असली, तरी त्यात अनेक आधुनिक फीचर्सची भर घालण्यात आली आहे. कारमध्ये आता अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार-प्लेला सपोर्ट करणारी मोठी १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. स्टीअरिंग व्हील आणि बटनांची जागा पूर्वीसारखीच आहे. सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ८-स्पीकर ऑडिओ सिस्टम, अ‍ॅम्बियंट लाइटिंग आणि फूटवेल लाइटिंग यांसारखे इतर प्रीमियम फीचर्स मिळतात. सुरक्षेच्या दृष्टीने यात ३६०-डिग्री कॅमेरा, ६ एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट आणि प्रगत ADAS फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

२७.२६ किमी/लिटर मायलेज

Honda City च्या 'फेसलिफ्ट' मॉडेलमध्ये १.५ लिटरचे 'नॅचरली ॲस्पिरेटेड' इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. हे इंजिन १२१ अश्वशक्ती इतकी शक्ती आणि १४५ Nm इतका कमाल टॉर्क निर्माण करण्यासाठी विशेषरित्या ट्यून करण्यात आले आहे. या इंजिनसोबत सहा स्पीड मॅन्युअल किंवा CVT गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. दुसरीकडे, या कारच्या हायब्रिड आवृत्तीमध्ये १.५ लिटरचे इंजिन असून, त्याला इलेक्ट्रिक मोटरचा आधार दिला आहे; हे इंजिन १२६ अश्वशक्ती आणि २५३ Nm इतका कमाल टॉर्क निर्माण करते. ही हायब्रिड पॉवरट्रेन २७.२६ किमी/लिटर मायलेज देते.

किंमत किती आहे?

होंडाने 'सिटी फेसलिफ्ट' ११,९९,९०० रूपये या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत सादर केली आहे. ही कार SV, V, ZX आणि ZX Plus अशा चार ट्रिम्समध्ये उपलब्ध असेल. तुम्ही ही गाडी पेट्रोल मॅन्युअल, पेट्रोल ऑटोमॅटिक किंवा हायब्रिड पॉवरट्रेन पर्यायांसह खरेदी करू शकता. 'स्ट्रॉंग हायब्रिड' पर्याय केवळ सर्वात वरच्या श्रेणीतील ZX Plus व्हेरिएंटमध्येच उपलब्ध आहे, ज्याची किंमत २१ लाख रूपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. दरम्यान, या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंट्सची किंमत १४.३० लाख ते १७.१५ लाख रूपये या दरम्यान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT