Ducati Desmo450 MX India launch
नवी दिल्ली: लक्झरी आणि सुपर बाईक्ससाठी प्रसिद्ध असलेली इटालियन दुचाकी निर्माता कंपनी डुकाटीने भारतात आपली पहिली डर्ट बाईक Desmo450 MX लॉन्च केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत १७.२४ लाख रुपये आहे. प्रामुख्याने ऑफ-रोड रेसिंगसाठी ही बाईक तयार करण्यात आली असून ताकद आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
डुकाटी Desmo450 MX मध्ये नव्याने विकसित केलेले ४४९.६ सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ६३.५ बीएचपी पॉवर आणि ५३.५ एनएम टॉर्क निर्माण करते. स्मूथ रायडिंगसाठी यामध्ये ५-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे, ज्यामुळे कठीण रस्त्यांवरही ही बाईक उत्तम नियंत्रण राखते. तसेच इंधनाशिवाय या बाईकचे वजन केवळ १०४.८ किलोग्रॅम आहे, ज्यामुळे ती अत्यंत चपळ आणि रेसिंगसाठी उपयुक्त ठरते.
रायडर्सचा अनुभव अधिक सुरक्षित आणि थरारक करण्यासाठी कंपनीने यात अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत.
विविध रस्ते आणि परिस्थितीनुसार रायडिंग मोड्सची निवड करण्याची सोय.
दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स, डीटीसी, ईबीसी आणि फॉल डिटेक्शन सिस्टीम.
क्विक शिफ्ट अप, पॉवर लाँच, लिथियम आयन बॅटरी आणि ॲडजस्टेबल हँडल बार.
आरामदायी सिंगल सीट.
ही दुचाकी ऑफ-रोडिंग आणि मोटोक्रॉस शौकिनांसाठी डिझाइन करण्यात आली असल्यामुळे यात लाईट्स, मिरर किंवा रोड-लीगल उपकरणे दिलेली नाहीत.
ही पूर्णपणे रेसिंगसाठी बनवलेली मशीन असल्यामुळे तिच्या देखभालीसाठीही रेसिंग स्टाईल शेड्यूल ठेवण्यात आले आहे. यात दर १५ तासांनी इंजिन ऑइल बदलणे आणि ४५ तासांनी पिस्टन बदल व व्हॉल्व क्लिअरन्स तपासणी करणे आवश्यक आहे.
भारतीय बाजारपेठेत या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १७,२३,६०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक सध्या केवळ निवडक शहरांमधील ४ डीलरशिप्सवर उपलब्ध असेल. यामध्ये पुणे, नवी दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई यांचा समावेश आहे.