August 15 India Independence Day History: भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र, सुरुवातीला ब्रिटनने भारताला सत्तांतरित करण्यासाठी जून १९४८ ची अंतिम मुदत निश्चित केली होती. मग १० महिने आधीच, म्हणजेच १५ ऑगस्टलाच भारताला स्वातंत्र्य का देण्यात आले? यामागे दुसऱ्या महायुद्धातील एक ऐतिहासिक घटना आणि भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांचा एक वैयक्तिक निर्णय कारणीभूत होता.
१९४७ च्या सुरुवातीला भारतातील जातीय दंगली आणि राजकीय अनिश्चितता वाढली होती. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी ब्रिटनने लवकरात लवकर सत्तांतर करण्याचा निर्णय घेतला. माऊंटबॅटन यांनी ३ जून १९४७ रोजी फाळणी आणि स्वातंत्र्याची योजना जाहीर केली.
'फ्रीडम एट मिडनाईट' या पुस्तकातील नोंदींनुसार, एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी जेव्हा माऊंटबॅटन यांना स्वातंत्र्याच्या अचूक तारखेबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी कसलाही विचार न करता अचानक '१५ ऑगस्ट' या तारखेची घोषणा केली. १५ ऑगस्ट १९४५ रोजी दुसऱ्या महायुद्धात जपानच्या सैन्याने मित्रराष्ट्रांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यावेळी माऊंटबॅटन हे 'साउथ ईस्ट एशिया कमांड'चे सर्वोच्च कमांडर होते. आपल्या लष्करी विजयाचा तो दिवस अजरामर करण्यासाठी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्टची निवड केली.
माऊंटबॅटन यांनी तारीख जाहीर केली खरी, परंतु भारतीय ज्योतिषांनी आणि काही राजकीय नेत्यांनी १५ ऑगस्ट या तारखेला तीव्र विरोध दर्शवला. हिंदू पंचांगानुसार १५ ऑगस्ट हा दिवस 'अशुभ' मानला गेला होता. एका ज्योतिषाने माऊंटबॅटन यांना पत्र लिहून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य न देण्याची विनंती केली होती आणि या दिवशी स्वातंत्र्य दिल्यास देशात संकट येईल असा इशाराही दिला होता. मात्र माऊंटबॅटन यांच्याशी संबंधित कागदपत्रांमध्ये ज्योतिषाचे या पत्राबाबत कोणता संदर्भ आढळून आलेला नाही.
माऊंटबॅटन यांना तारीख बदलायची नव्हती, तर दुसरीकडे भारतीय नेत्यांना अशुभ मुहूर्तावर देशाचा प्रवास सुरू करायचा नव्हता. अखेर यावर एक सुवर्णमध्य काढण्यात आला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री (१२ वाजता) स्वातंत्र्य घोषित करण्याचा तोडगा निघाला, कारण हिंदू शास्त्रानुसार सूर्योदयानंतर नवीन दिवस सुरू होतो, तर इंग्रजी कॅलेंडरनुसार मध्यरात्री १२ वाजता नवी तारीख लागते. याच तोडग्यामुळे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपले ऐतिहासिक 'ट्रिस्ट विथ डेस्टिनी' (नियतीशी करार) हे भाषण केले आणि भारत स्वतंत्र झाला.