End of Life Dreams file photo
ज्योतिष आणि धार्मिक

End of Life Dreams: मृत्यूच्या आधी कोणती स्वप्ने पडतात? नेण्यासाठी खरंच कोणी येतं का? शास्त्रज्ञांचा नवा अहवाल

संशोधकांनी मृत्यूच्या उंबरठ्यावर असताना पडणाऱ्या स्वप्नांचा, ज्याला शास्त्रीय भाषेत 'एंड ऑफ लाइफ ड्रीम्स' म्हणतात, त्याचा उलगडा केला आहे.

मोहन कारंडे

End of Life Dreams

नवी दिल्ली: 'मृत्यू' हे मानवी जीवनातील सर्वात मोठे आणि अटळ सत्य आहे. जीवनाच्या शेवटच्या क्षणी माणूस नेमका काय विचार करत असेल किंवा त्याच्या बंद पापण्यांमागे नेमकी कोणती हालचाल सुरू असेल, यावर जगभरात अनेक संशोधनं झाली आहेत. नुकत्याच इटलीतील 'आयआरसीसीएस' येथील संशोधकांनी २३९ तज्ज्ञांच्या अभ्यासातून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात मृत्यूच्या उंबरठ्यावर असताना पडणाऱ्या स्वप्नांचा, ज्याला शास्त्रीय भाषेत 'एंड ऑफ लाइफ ड्रीम्स' म्हणतात, त्याचा उलगडा करण्यात आला आहे.

प्रियजनांची सोबत आणि तो प्रकाशमय प्रवास

या संशोधनानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीला अनेकदा असे लोक दिसतात जे आधीच हे जग सोडून गेले आहेत. यामध्ये आई-वडील, जुने मित्र किंवा जवळचे नातेवाईक यांचा समावेश असतो. एका रुग्णाच्या अनुभवानुसार, तिला तिचा मेलेला पती हाक मारत असल्याचे जाणवले. विशेष म्हणजे, ही स्वप्ने भीतीदायक नसून मनाला शांतता देणारी असतात. मृत्यूच्या वाटेवर आपण एकटे नाही आहोत, ही भावना या स्वप्नांमुळे निर्माण होते. काही रुग्णांना लख्ख प्रकाश, उंच शिड्या किंवा उघडलेली दारे दिसतात, जणू काही पुढील प्रवासासाठी एखादी नवीन सृष्टी त्यांचे स्वागत करत आहे.

पांढरा घोडा आणि भयानक दृश्ये

संशोधनात असेही दिसून आले की, काही रुग्णांना निसर्गरम्य दृश्ये दिसतात; जसे की समुद्राकिनारी धावणारा पांढरा घोडा किंवा मखमली दऱ्या. मात्र, या अनुभवाचा दुसरा पैलू थोडा चिंताजनकही आहे. काही रुग्णांना भयानक सावल्या किंवा राक्षसी आकृत्या दिसल्याचेही समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, ही स्वप्ने म्हणजे मानवाच्या मनातील सुप्त भीती किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छांचे प्रतिबिंब असू शकतात, जे शेवटच्या क्षणी समोर येतात.

विज्ञान आणि अध्यात्म काय सांगते?

अनेक लोक अशा अनुभवांबद्दल बोलत नाहीत, कारण त्यांना समाज वेड्यात काढेल अशी भीती वाटते. मात्र, ही स्वप्न माणूस मृत्यूला किती प्रमाणात स्वीकारत आहे, हे दर्शवतात. जर स्वप्ने सुखद असतील, तर ती व्यक्ती शांतपणे जगाचा निरोप घेते, असे मानले जाते.

विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, हा तणाव, औषधोपचार आणि जुन्या स्मृतींचा एक 'कॉकटेल' असतो. मात्र, आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहणारे याला 'आत्म्याचा शेवटचा प्रवास' मानतात. मृत्यूचे रहस्य आजही कायम असले, तरी ही स्वप्ने त्या गूढ वाटेवरचे महत्त्वाचे संकेत मानले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT