Premanand Maharaj
वृंदावन: वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांच्या दरबारात देशभरातून भाविक आपल्या आयुष्यातील कठीण प्रश्न घेऊन येत असतात. नुकतीच एका शिवभक्ताने महाराजांकडे 'भगवान शंकराच्या चरणांजवळ जाण्यासाठी भक्ताची दिनचर्या कशी असावी?' अशी विचारणा केली. यावर प्रेमानंद महाराजांनी अत्यंत सोप्या भाषेत शिवभक्तीचा मार्ग कसा असावा, याचे मार्गदर्शन केले आहे.
प्रेमानंद महाराजांनी सांगितले की, एका खऱ्या शिवभक्ताची दिनचर्या सूर्योदयापूर्वीच सुरू व्हायला हवी. प्रात:काळी उठल्यानंतर सर्वात आधी शिवस्वरूप असलेल्या आपल्या गुरुदेवांचे स्मरण करावे आणि त्यांनी दिलेल्या नाममंत्राचा जप करावा. त्यानंतर स्नान उरकून शंकराच्या पूजेची तयारी करावी. भगवान शिव हे अत्यंत कृपाळू आणि भोळे आहेत. त्यांच्यासारखा तात्काळ प्रसन्न होणारा देव शोधूनही सापडणार नाही. केवळ ओंजळभर पाणी, एक धोत्र्याचे फळ, एक रुईचे फूल किंवा एक बेलाचे पान अर्पण केल्यानेही ते प्रसन्न होतात. ज्या वस्तूंचा स्वीकार तिन्ही लोकांतला अन्य कोणताही देव करत नाही, त्याच वस्तू भगवान शंकराच्या पूजेसाठी पवित्र ठरतात.
महादेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्यांचे नामस्मरण आणि अभिषेक करणे होय. महाराजांनी सांगितले की, भक्तांनी नेहमी शिवभक्तांच्या संगतीत राहावे. शक्य असल्यास दररोज जवळच्या शिवालयात जाऊन शंकराचे दर्शन घ्यावे, कारण दर्शनामुळे मनात ईश्वराबद्दलचे प्रेम अधिक दृढ होते. याशिवाय, वेळ मिळेल तेव्हा 'द्वादश ज्योतिर्लिंगांचे' स्मरण करावे. रोज केवळ बारा ज्योतिर्लिंगांचे नाव घेतल्यानेही शेकडो जन्मांची पापे नष्ट होतात, असही महाराजांनी सांगितले.
कोणता मंत्र जपावा?
"आम्ही कोणता मंत्र जपावा?" या भक्ताच्या प्रश्नावर महाराजांनी गुरुमंत्राचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "मंत्र कोणता जपावा, हे तुमच्या गुरुंकडूनच जाणून घेतले पाहिजे. आधी योग्य गुरूंचा आश्रय घ्या आणि त्यांनी दिलेला आदेश पाळा. गुरुमंत्र हा जाहीर सभेत सांगण्याचा विषय नाही. त्यामुळे जर तुम्हाला शिवाची खरी उपासना करायची असेल, तर तपोनिष्ठ दंडी संन्याशांचा आश्रय घ्या, त्यांच्याकडून दीक्षा घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करा. यामुळे महादेवाची कृपा नक्कीच प्राप्त होईल."