ज्योतिष आणि धार्मिक

Mahashivratri 2026 | ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र! जाणून घ्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची अनोखी रचना

भारतातील भगवान शिवाची १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर

पुढारी वृत्तसेवा

भारतातील भगवान शिवाची १२ ज्योतिर्लिंगे आहेत. ही भगवान शंकराच्या प्रकाशाची (ज्योतीची) बारा रूपे आहेत. असे मानले जाते की ही स्थाने वैश्विक ऊर्जेची केंद्रे आहेत.

Maha Shivratri Trimbakeshwar Jyotirling Temple |

नाशिक : महाशिवरात्र हा केवळ उपवास किंवा धार्मिक विधींचा दिवस नसून, प्रत्येकाच्या अंतःकरणात नित्य वास करणाऱ्या ‘शिव’ तत्त्वाची आत्मचैतन्याची जाणीव जागृत करण्याचा पवित्र काल आहे. पुराणांनुसार, या काळात शिवाचे मनोभावे घेतलेले दर्शन मनातील विकार दूर करून आत्म्याला शुद्ध करते. भारतातील १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी ३ ज्योतिर्लिंगांची मंदिरे महाराष्ट्रात आहेत. यातील नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराविषयी जाणून घेऊया...

जुन्या मंदिराच्या जागीच नानासाहेब पेशवांनी केले मंदिराचे पुनर्निर्माण

"त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग" हे मंदिर नाशिक शहरापासून २८ किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर या गावात स्थित आहे. सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बालाजी अर्थात नानासाहेब पेशवे यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे. या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात १७५५ मध्ये झाली. १७८६ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जुन्या मंदिराच्या जागीच नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले. त्र्यंबकेश्वर मंदिराचे व्यवस्थापन त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून केले जाते.

शिवलिंगाची वास्तविक रचना इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी

त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे. येथील शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. यामध्ये त्रिमूर्ती म्हणजेच "ब्रह्मा-विष्णू-महेश" विद्यमान आहेत. गोदावरी नदीचा उगमही येथेच झाला आहे. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. या स्वरूपाचे हे जगातील एकमेव शिवलिंग आहे. येथेच निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतभरातून हजेरी लावतात. त्याचबरोबर अनेक धार्मिक संस्था येथे कार्यरत आहेत. वेदशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था येथे आहेत. स्थानिक माहितीनुसार, येथे ज्योतिर्लिंगावर "त्रिकाल पूजा" केली जाते, जी ३५० वर्षांपासून सुरू आहे, जी द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते.

ब्रह्मगिरी पर्वताला पौराणिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व

येथील ब्रह्मगिरी पर्वताला पौराणिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व आहे. पौराणिक संदर्भानुसार ब्रह्मदेवांनी श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी याच पर्वतावर तप केले. या पर्वतावर एके काळी गौतम ऋषींचा आश्रम होता. गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. भगवान शंकरांनी या ठिकाणी गुडघ्यावर बसून कातळावर जटा आपटल्या आणि गंगेचा इथे उगम झाला, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीवर शंकराच्या जटा पाहण्यासाठी आवर्जून भाविक येत असतात.

महाशिवरात्रीला पंचमुखी मुकुट प्रमुख आकर्षण

या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक महाशिवरात्रीला भाविक भक्त येथे अलोट गर्दी करत असतात. या उत्सवात त्र्यंबकेश्वर महाराजांचा पंचमुखी सोन्याचा मुखवटा पालखीमध्ये बसवून फिरवला जातो. हा मुकुट म्हणजे या उत्सवाचे प्रमुख आकर्षणच असते. पालखीमध्ये बसवून फिरवून झाल्यानंतर कुशावर्त तीर्थ येथे घाटावर स्नान केले जाते व त्यानंतर मुखवटा परत मंदिरात आणला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT