आज म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण लागणार आहे. रात्री 9.58 ते पहाटे 1.26 या वेळेत भारतातून हे पूर्णपणे दिसणार आहे. आपल्या संस्कृतीत आणि परंपरेत ग्रहणाबाबत अनेक समजुती प्रचलित आहेत. विशेषत: गर्भवती महिलांना या काळात बाहेर न जाणे, धारदार वस्तू न वापरणे आणि अन्न न खाण्याची सूचना केली जाते. पण खरोखरच चंद्रग्रहणाचा गर्भवती स्त्री आणि गर्भातील बाळावर परिणाम होतो का? याबाबत जाणून घेऊया.
परंपरेतील समज ज्योतिष आणि जुन्या मान्यतानुसार, ग्रहणाच्या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. त्यामुळे गर्भवती महिला काही काम केल्यास बाळावर वाईट परिणाम होतो, बाळ विकलांग जन्माला येऊ शकते अशा समजुती प्रचलित आहेत.
मात्र, या गोष्टी धार्मिक श्रद्धांवर आधारित असून वैज्ञानिक आधार नाही, डॉक्टरांचे मत आहे. सर गंगाराम हॉस्पिटल, दिल्ली येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. साक्षी नायर यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगीतलं आहे की ग्रहणामुळे गर्भवती महिलांवर किंवा त्यांच्या बाळावर कोणताही थेट परिणाम होत नाही.
गर्भवती महिला ग्रहणावेळी बाहेर गेल्या तरी बाळावर काहीही विपरीत परिणाम होत नाही. होय, मात्र उपवास केल्यास किंवा जास्त वेळ न खाल्ल्यास महिलांच्या आरोग्यावर आणि अप्रत्यक्षपणे बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आरोग्य आणि काळजी ग्रहणाच्या काळात महिलांनी शक्यतो आराम करावा. जास्त वेळ उपाशी राहणे टाळावे. हलका, पौष्टिक आहार घ्यावा. श्रद्धा आणि परंपरा पाळायच्या असतील तर त्या मानसिक शांतीसाठी पाळाव्यात, पण आरोग्याविषयी निर्णय नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेऊन घ्यावा. थोडक्यात सांगायचं झालं तर चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. त्याचा गर्भवती महिला किंवा गर्भातील बाळावर कोणताही वैज्ञानिक परिणाम होत नाही. परंपरेतल्या गोष्टी या श्रद्धेवर आधारित आहेत.