Mahabharata curses File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Mahabharata curses: महाभारतातील ५ भयानक शाप, ज्यांचे परिणाम आज कलियुगातही जाणवतात

महाभारतात क्रोध किंवा न्यायाच्या भूमिकेतून अनेक शाप दिले गेले. धार्मिक मान्यतेनुसार, यांतील काही शापांचे परिणाम आजही कलियुगात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाहायला मिळतात.

पुढारी वृत्तसेवा

Mahabharata curses

महाभारत केवळ एका युद्धाची कथा नसून, मानवी जीवन जगण्याचा एक मार्गदर्शक ग्रंथ आहे. कौरव आणि पांडवांमधील संघर्ष केवळ सत्तेसाठी नव्हता, तर तो धर्म आणि अधर्म यांमधील लढा होता. या महाग्रंथात कर्म, सत्य, मानवी नातेसंबंध आणि आपल्या निर्णयांचे परिणाम याविषयी मोलाची शिकवण मिळते. महाभारतात अशा अनेक प्रसंगांचा उल्लेख आहे, जिथे क्रोध किंवा न्यायाच्या भूमिकेतून शाप दिले गेले. धार्मिक मान्यतेनुसार, यांतील काही शापांचे परिणाम आजही कलियुगात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाहायला मिळतात. लोक या घटनांकडे कर्माचे फळ आणि मानवी जीवनासाठी एक इशारा म्हणून पाहतात.

महाभारतातील ५ भयानक शाप

१. उर्वशीचा अर्जुनाला शाप

दिव्य अस्त्रे प्राप्त करण्यासाठी अर्जुन एकदा स्वर्गलोकात गेला होता. तिथे अप्सरा उर्वशी त्याच्यावर मोहित झाली. मात्र, अर्जुनाने तिला मातासमान मानून तिचा प्रस्ताव नाकारला. या अपमानामुळे संतप्त झालेल्या उर्वशीने अर्जुनला 'नपुंसक' होण्याचा शाप दिला. चिंतेत असलेल्या अर्जुनाला देवराज इंद्राने धीर दिला आणि हा शाप अज्ञातवासात वरदान ठरेल असे सांगितले. पुढे याच शापामुळे अर्जुनाला अज्ञातवासात 'बृहन्नला'चे रूप धारण करून राजा विराटाच्या दरबारात सुरक्षित राहता आले.

२. युधिष्ठिराचा स्त्री जातीला शाप

महाभारत युद्ध संपल्यानंतर माता कुंतीने पांडवांना एक अत्यंत धक्कादायक गुपित सांगितले. सूर्यपुत्र कर्ण हा त्यांचाच थोरला भाऊ होता, हे सत्य समोर आल्यावर पांडवांना अतीव दुःख झाले. आपल्याच हाताने ज्येष्ठ बंधूचा वध झाल्याच्या क्रोधात येऊन धर्मराज युधिष्ठिराने समस्त स्त्री जातीला शाप दिला की, "यापुढे कोणतीही स्त्री मनात कोणतेही गुपित किंवा रहस्य लपवून ठेवू शकणार नाही."

३. राजा परीक्षितला मिळालेला मृत्यूदंड आणि कलियुगाची सुरुवात

पांडव जेव्हा स्वर्गाकडे निघाले, तेव्हा त्यांनी राज्याची धुरा अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षित याच्याकडे सोपवली. एकदा शिकारी दरम्यान राजा परीक्षित जंगलात ध्यानस्थ बसलेल्या शमीक ऋषींच्या आश्रमात पोहोचला. राजाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ऋषी ध्यानात असल्याने त्यांनी उत्तर दिले नाही. याने क्रोधित होऊन राजाने एका मृत सापाला ऋषींच्या गळ्यात टाकले. ऋषीपुत्राला हे समजताच त्याने परीक्षितला शाप दिला की, "आजपासून सातव्या दिवशी तक्षक नागाच्या दंशाने तुझा मृत्यू होईल." मानले जाते की, राजा परीक्षितच्या मृत्यूनंतरच पृथ्वीवर कलियुगाचा प्रभाव वाढला.

४. अश्वत्थामाला श्रीकृष्णानं दिलेला कठोर शाप

महाभारत युद्धाच्या अंतिम टप्प्यात अश्वत्थामाने कपटाने पांडवांच्या पुत्रांची हत्या केली. यानंतर जेव्हा अर्जुन आणि अश्वत्थामा यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडले. अर्जुनानेही प्रत्युत्तरादाखल ब्रह्मास्त्र चालवले, पण महर्षी व्यास यांनी दोघांना अस्त्रे मागे घेण्यास सांगितले. अर्जुनाने अस्त्र मागे घेतले, परंतु अश्वत्थामाला ते जमेनासे झाल्याने त्याने अस्त्राची दिशा उत्तराच्या गर्भाकडे वळवली. या क्रूर कृत्यामुळे संतप्त होऊन भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाच्या कपाळावरील मणी काढून घेतला आणि त्याला "तू हजारो वर्षे रोगाने ग्रस्त होऊन या पृथ्वीवर भटकत राहशील आणि कोणाशीही संवाद साधू शकणार नाहीस," असा शाप दिला.

५. ऋषी मांडव्य यांचा यमराजाला शाप; 'विदुराचा' जन्म

एका चुकीच्या न्यायनिवाड्यामुळे राजाने निरपराध ऋषी मांडव्य यांना सुळावर चढवण्याची शिक्षा दिली. प्रदीर्घ काळ सुळावर राहूनही ऋषींचे प्राण गेले नाहीत, तेव्हा राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने क्षमा मागितली. पुढे ऋषी मांडव्य यांनी यमराजाला विचारले की, मला ही शिक्षा कोणत्या गुन्ह्यासाठी मिळाली? यमराजाने सांगितले की, "तुम्ही बालपणी एका लहान कीटकाला सुई टोचून त्रास दिला होता, त्याचेच हे फळ आहे." यावर ऋषींनी आक्षेप घेतला की, बालपणी अज्ञानात केलेल्या कर्माची एवढी कठोर शिक्षा असू शकत नाही. त्यांनी संतप्त होऊन यमराजाला शाप दिला की, "तुला मनुष्य रूपात जन्म घ्यावा लागेल." याच शापामुळे कलियुगाच्या आधी यमराजाला पृथ्वीवर 'विदुर' म्हणून जन्म घ्यावा लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT