Zomato Gig Workers Strike: देशभरातील गिग वर्कर्सनी 31 डिसेंबर रोजी संप केला असतानाही झोमॅटो आणि ब्लिंकिटच्या डिलिव्हरी सेवांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही, असा दावा दीपिंदर गोयल यांनी केला आहे. 31 डिसेंबरला झोमॅटो आणि ब्लिंकिटकडून तब्बल 75 लाखांहून अधिक ऑर्डर्स पूर्ण झाल्याचं त्यांनी X वर सांगितलं. हा आजवरचा सर्वात मोठा आकडा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दीपिंदर गोयल यांच्या मते, भारतातील गिग इकॉनॉमी ही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणारी व्यवस्था आहे. “एखादी व्यवस्था मुळातच अन्यायकारक असती, तर इतक्या मोठ्या संख्येने लोक त्यात काम करण्यासाठी आले नसते,” असं त्यांनी स्पष्ट केलं. काही ‘हितसंबंधी लोक’ सोशल मीडियावर गिग इकॉनॉमीबाबत चुकीचं चित्र रंगवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
10 मिनिटांत डिलिव्हरी सेवा देण्यावर टीका होत असताना गोयल यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही सेवा डिलिव्हरी पार्टनर्सना वेगाने गाडी चालवा असं सांगत नाही, तर ग्राहकांच्या आसपास असलेल्या स्टोअर्समुळे हे शक्य होतं.
ब्लिंकिटवर ऑर्डर दिल्यानंतर साधारण अडीच मिनिटांत वस्तू पॅक होतात आणि डिलिव्हरी पार्टनर सरासरी दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतर आठ मिनिटांत पूर्ण करतो. म्हणजेच वेग साधारण 15 किमी प्रतितास असतो. यासाठी डिलिव्हरी पार्टनरच्या अॅपवर वेळेचं कोणतंही काऊंटडाऊन नसतं, असंही त्यांनी सांगितलं.
गोयल यांच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काहींनी गिग वर्कर्सना प्रत्यक्षात तासाला किती मोबदला मिळतो, यावर उत्तर मागितलं. तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियनने मात्र, डिलिव्हरी रेकॉर्डचे आकडे हे कामगारांच्या शोषणाचं लक्षण असल्याचा दावा केला.
मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी गिग वर्कर्सना भेट देत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. “नफा किंवा सोयीपेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे,” असं त्या म्हणाल्या.
या वादात काही उद्योजक आणि सोशल मीडिया युजर्सनी गोयल यांची बाजू घेतली. त्यांच्या मते, गिग इकॉनॉमी ही आधुनिक, तंत्रज्ञानावर आधारित सेवा आहे आणि इथे मागणी-पुरवठ्यावर वेतन ठरतं. काहींनी असंही मत व्यक्त केलं की गिग वर्कर्सनी स्थिर नोकरीऐवजी स्वतःहून ही नोकरी निवडली आहे.
40 हजार रुपये मासिक वेतनाच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना काहींनी ती अवास्तव असल्याचं म्हटलं. अशा वेतनामुळे खर्च ग्राहकांवर टाकला जाईल, ऑर्डर्स कमी होतील आणि अखेरीस कामगारांनाच फटका बसेल, असा युक्तिवादही करण्यात आला.
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने गोयल यांच्या स्पष्टीकरणावर शंका उपस्थित केली. त्याने थेट प्रश्न विचारला की, गेल्या वर्षभरात गिग वर्कर्सना प्रतितास नेमके किती पैसे मिळाले, याची स्पष्ट माहिती दिली जावी.
या वादात पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी डिलिव्हरी सेवा ही आधुनिक आहे. जवळची टॅक्सी दहा मिनिटांत येते, त्याचप्रमाणे जवळच्या स्टोअरमुळे लवकर डिलिव्हरी शक्य होते, असेही त्यांनी म्हटले.
एकूणच, झोमॅटो CEO दीपिंदर गोयल यांच्या पोस्टमुळे गिग वर्कर्स, त्यांच्या अटी-शर्ती, वेतन आणि गिग इकॉनॉमीचं भविष्य या मुद्द्यांवर देशभरात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा वाद लवकर मिटण्याची चिन्हं नसून, येत्या काळात यावर धोरणात्मक निर्णय होतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.