8th Pay Commission Pudhari
अर्थभान

8th Pay Commission: महिन्याला फक्त 12 दिवस काम; मिळणार 90 हजार पगार, 8व्या वेतन आयोगात नोकरीची संधी

8th Pay Commission Jobs: 8व्या वेतन आयोगा अंतर्गत कन्सल्टंट आणि यंग प्रोफेशनल पदांसाठी भरती सुरू आहे. महिन्यात फक्त 12 दिवस काम करून 90 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

पुढारी वृत्तसेवा

8th Pay Commission Jobs: देशभरात सध्या 8व्या वेतन आयोगा बद्दल चर्चा सुरू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार, नवीन वेतन संरचना कशी असेल यावर सगळ्यांचे लक्ष आहे. पण या सगळ्यात एक वेगळी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता तुम्हालाच या वेतन आयोगाच्या टीममध्ये काम करण्याची संधी मिळू शकते आणि त्यासाठी आकर्षक पगारही मिळणार आहे.

नोकरी काय आहे?

8वा वेतन आयोग सध्या आपल्या रिसर्च टीमसाठी उमेदवार शोधत आहे. या टीमचं मुख्य काम म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन याबाबत अभ्यास करून शिफारसी तयार करणे. ही नोकरी नियमित ऑफिस कामासारखी नसून पूर्णपणे रिसर्च आणि अॅनालिसिसवर आधारित आहे. म्हणजेच डेटाचा अभ्यास, रिपोर्ट तयार करणे आणि धोरणात्मक शिफारसी देणे, हे मुख्य काम असेल.

कोणकोणत्या पदांसाठी भरती?

या भरतीमध्ये तीन प्रकारची पदे आहेत:

  • सीनियर कन्सल्टंट

  • कन्सल्टंट

  • यंग प्रोफेशनल

सीनियर कन्सल्टंटसाठी 5 जागा आहेत आणि यासाठी किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. वयाची मर्यादा 45 वर्षांपर्यंत आहे.

कन्सल्टंट पदासाठीही 5 जागा आहेत. यासाठी 6 वर्षांचा अनुभव आणि वय 40 वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे.

यंग प्रोफेशनलसाठी 10 जागा आहेत. यासाठी 4 वर्षांचा अनुभव पुरेसा आहे आणि वय मर्यादा 32 वर्षे ठेवण्यात आली आहे.

पगार किती मिळणार?

या नोकरीचं सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे पगार.

सीनियर कन्सल्टंट:

  • फुल टाइम: 1.80 लाख प्रति महिना

  • पार्ट टाइम (12 दिवस): ₹90,000

  • पार्ट टाइम (6 दिवस): ₹45,000

कन्सल्टंट:

  • फुल टाइम: 1.20 लाख

  • पार्ट टाइम: ₹60,000 / ₹30,000

यंग प्रोफेशनल:

  • फुल टाइम: ₹90,000

  • पार्ट टाइम: ₹45,000 / ₹22,500

म्हणजेच, महिन्यात फक्त 12 दिवस काम करूनही 90 हजार रुपयांपर्यंत कमाई करण्याची संधी आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड प्रक्रिया देखील महत्त्वाची आहे. सर्वप्रथम अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर निवडक उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. अंतिम निवड ही मुलाखतीनंतरच होईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवड समितीचा निर्णय अंतिम असेल आणि कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारण्याचा पूर्ण अधिकार आयोगाकडे असेल.

नोकरीचे स्वरूप कसे आहे?

ही नोकरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेल. म्हणजेच ठराविक कालावधीसाठीच नियुक्ती केली जाईल. कामाचे स्वरूप नियमित फाईलवर्कसारखे नसून अधिक बौद्धिक आणि विश्लेषणात्मक आहे. त्यामुळे ज्यांना रिसर्च, इकॉनॉमिक्स, पॉलिसी अॅनालिसिसमध्ये रस आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

कोण पात्र आहे?

8th Pay Commission अंतर्गत कन्सल्टंट पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर फक्त पदवी पुरेशी नाही. इथे पात्रता थोडी कडक ठेवण्यात आली आहे. उमेदवाराकडे फायनान्स, ह्युमन रिसोर्स, इंडस्ट्रियल रिलेशन्स या विषयांमध्ये मास्टर्स किंवा MBA असणे आवश्यक आहे. याशिवाय LLB केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात, पण त्यांच्याकडे कायदेशीर संशोधनाचा अनुभव असणे गरजेचे आहे. विशेषतः कोर्ट, ट्रिब्युनल किंवा सेवा विषयक प्रकरणांमध्ये वकिल म्हणून काम केलेला अनुभव असेल, तर त्याला प्राधान्य दिले जाईल.

नोकरीत नेमकं काम काय करावं लागणार?

निवड झालेल्या उमेदवाराला सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते, पेन्शन यांचा सखोल अभ्यास करावा लागेल. सध्याची वेतन रचना तपासून त्यात सुधारणा करण्यासाठी सूचना द्याव्या लागतील. यासोबतच विविध अहवाल, सर्वेक्षण आणि डेटा यांचा अभ्यास करून देशातील आर्थिक आणि लोकसंख्यात्मक ट्रेंड समजून घ्यावे लागतील. म्हणजेच, हे काम पूर्णपणे रिसर्च आणि डेटा अॅनालिसिसवर आधारित आहे.

काही महत्त्वाच्या अटी

या नोकरीत काही स्पष्ट नियमही आहेत. फुल-टाइम कन्सल्टंटना इतर कोणतेही काम किंवा असाइनमेंट घेण्याची परवानगी नाही. म्हणजेच, ही नोकरी करत असताना पूर्ण लक्ष या कामावरच द्यावं लागेल. आयोग बेसिक सुविधा देईल, पण लॅपटॉप, मोबाईल किंवा इंटरनेट सुविधा दिल्या जाणार नाहीत. उमेदवारांना हे स्वतःच मॅनेज करावं लागेल.

गोपनीयतेचे कडक नियम

या नोकरीत काम करणाऱ्यांना Official Secret Act, 1923 अंतर्गत बांधील राहावं लागेल. याचा अर्थ आयोगाशी संबंधित कोणतीही माहिती, डेटा किंवा दस्तऐवज सोशल मीडिया, वेबसाइट, अॅप्स किंवा AI टूल्सवर शेअर करता येणार नाही. गोपनीयता पाळणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असेल. निवड झालेल्या उमेदवाराला ऑफर लेटर ईमेलद्वारे मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत जॉइन होणे आवश्यक आहे.

8 व्या वेतन आयोगाच्या भरतीसाठी अर्ज कसा करावा?

  • केंद्रीय वेतन आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

  • वैयक्तिक, व्यावसायिक आणि नोकरीविषयक तपशील भरा.

  • घोषणापत्रावर स्वाक्षरी करा आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.

  • अर्ज सादर करा.

8वा वेतन आयोग फक्त पगार वाढवणार नाही, तर रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होत आहे. जर तुमच्याकडे अनुभव, विश्लेषणाची क्षमता आणि सरकारी धोरणांमध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर ही संधी तुमच्यासाठी खास आहे. कमी दिवस काम, चांगला पगार आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेचा भाग होण्याची संधी, हे सगळं एकाच नोकरीत मिळणं ही खरंच मोठी गोष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT