TCS layoffs (File photo)
अर्थभान

TCS layoffs | टीसीएस १२ हजार जणांना का देत आहे नारळ?; AI आणि नोकरी जाण्याचा काय संबंध?

अमेरिकेतील टेक क्षेत्रातील नोकरकपातीची लाट आता भारतातही सुरु झाली आहे

दीपक दि. भांदिगरे

TCS layoffs

अमेरिकेत AI मुळे टेक उद्योगातील हजारोंनी नोकऱ्या कमी केल्या जात आहेत. आता टेक क्षेत्रातील नोकरकपातीची ही लाट भारतातही सुरु झाली आहे. टाटा समुहातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) अर्थात टीसीएसने नुकतीच १२ हजार नोकरकपातीची घोषणा केली. दरम्यान, पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, टीसीएसच्या सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या घोषणेनंतर माहिती तंत्रज्ञान मंत्रालय याबाबतच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.

आयटी मंत्रालय कंपनीतील परिस्थितीवर जवळून लक्ष ठेवून आहे आणि ते टीसीएस कंपनीच्या संपर्कात आहे. आयटी मंत्रालय इतक्या मोठ्या प्रमाणातील नोकरकपातीचे मूळ कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

भारतातील आघाडीची आयटी सेवा देणारी कंपनी टीसीएसने यावर्षी १२,२६१ कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची योजना आखणे, ही आयटी क्षेत्रासाठी गंभीर बाब मानली जात आहे. ही नोकरकपात त्यांच्या जागतिक स्तरावरील मनुष्यबळाच्या दोन टक्के आहे. या नोकरकपातीचा मध्यम आणि वरिष्ठ व्यवस्थापन पदांवरील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे.

TCS का करत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरकपात?

३० जून २०२५ पर्यंत टीसीएसमधील कर्मचाऱ्यांची संख्या ६,१३,०६९ इतकी होती. विशेष म्हणजे एप्रिल-जूनदरम्यानच्या तिमाहीत कंपनीत नवीन ५ हजार कर्मचाऱ्यांची वाढ झाली. टीसीएस कंपनीने रविवारी स्पष्ट केले होते की, ही पुनर्रचना भविष्यासाठी सज्ज राहण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे. टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक, AI ची अंमलबजावणी, बाजारातील वाढ आणि मनुष्यबळ पुनर्रचना यावर भर दिला जात आहे.

"टीसीएस भविष्याच्या दृष्टीकोनातून काय आवश्यक आहे?, हे जाणून घेऊन सज्ज राहण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. याl नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक, नव्या मार्केट्समध्ये एन्ट्री करणे, आमच्या ग्राहकांसाठी आणि स्वतःसाठी मोठ्या प्रमाणात AI चा वापर करणे, नेक्स्ट जनरेशन पायाभूत सुविधांची निर्मिती करणे आणि वर्कफोर्स मॉडेलमध्ये एकसंधता आणणे यासह अनेक धोरणात्मक उपाययोजनांचा यात समावेश आहे," असे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

भारतात AI मुळे नोकऱ्या जातील का?

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतात AI शी संबंधित नोकरीची चिंता अधिक आहे. मायक्रोसॉफ्टच्या वर्क ट्रेंड इंडेक्स २०२३ नुसार, ७४ टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना भीती आहे की एआयमुळे त्यांच्या नोकऱ्या जातील. हीच चिंता भारताच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२४-२५ मध्येही व्यक्त करण्यात आली.

टेक कंपन्यांना एआय-प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. केवळ १५ ते २० टक्के कर्मचाऱ्यांकडे AI हाताळण्याचे कौशल्य आहे. यामुळे संपूर्ण टेक उद्योगात भरती करण्याच्या पद्धतींत मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे.

भारतात २०२७ पर्यंत एआय क्षेत्रात किती नोकऱ्यांची संधी?

बेन अँड कंपनीच्या अलिकडील अहवालानुसार, २०१९ पासून AI जॉब पोस्टिंगमध्ये दरवर्षी २१ टक्के वाढ होत आहे. तर अशा नोकऱ्यांमध्ये पगार ११ टक्के वाढला आहे. पण, कुशल मनुष्यबळ वाढ आणि मागणी याचा ताळमेळ बसत नाही. २०२७ पर्यंत, भारतातील एआय क्षेत्रात २३ लाख नोकऱ्यांची संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. पण केवळ १२ लाख कर्मचारी उपलब्ध असतील. ही परिस्थिती पाहता कौशल्य वाढवणे आणि प्रशिक्षणाद्वारे ही तफावत भरून काढावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT