Noel Tata to Step Down  Pudhari
अर्थभान

Noel Tata: टाटा समूहात मोठी घडामोड! नोएल टाटा ६ कंपन्यांमधून बाहेर पडणार; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

Noel Tata to Step Down from 6 Tata Group Companies: नोएल टाटा वयाची ७० वर्षे पूर्ण झाल्यानंतर टाटा समूहातील काही कंपन्यांच्या संचालक मंडळातून बाहेर पडणार आहेत.

Rahul Shelke

Noel Tata to Step Down from 6 Tata Group Companies: टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा लवकरच समूहातील सहा कंपन्यांच्या संचालक मंडळातून बाहेर पडणार आहेत. येत्या १२ नोव्हेंबरला वयाची ७० वर्षे पूर्ण होत असल्याने ते हा निर्णय घेणार आहेत. टाटा समूहाच्या बिगर-कार्यकारी संचालकांसाठी असलेल्या निवृत्तीच्या नियमांनुसार त्यांना या पदांवरून पायउतार व्हावे लागणार आहे. मात्र, ते टाटा समूहाची मुख्य होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळावर टाटा ट्रस्ट्सचे प्रतिनिधी म्हणून कायम राहतील.

कोणत्या कंपन्यांमधून नोएल टाटा बाहेर पडणार?

नोएल टाटा हे टाटा समूहातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यामध्ये ट्रेंट, व्होल्टास, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा इंटरनॅशनल आणि दुबईतील टाटा इंटरनॅशनल वेस्ट एशिया डीएमसीसी या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमध्ये ते बिगर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. खालील कंपन्यांमधून नोएल टाटा बाहेर पडणार आहेत.

1. ट्रेंट लिमिटेड (Trent Limited) – फॅशन आणि किरकोळ विक्री व्यवसाय.

2. व्होल्टास (Voltas) – एअर कंडिशनर आणि घरगुती उपकरणांचा व्यवसाय.

3. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (Tata Investment Corporation) – गुंतवणुकीशी संबंधित कंपनी.

4. टाटा इंटरनॅशनल (Tata International) – आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवसाय.

5. टाटा इंटरनॅशनल वेस्ट एशिया डीएमसीसी (Tata International West Asia DMCC) – दुबईस्थित कंपनी.

6. ट्रेंट हायपरमार्केट प्रायव्हेट लिमिटेड (Trent Hypermarket Private Limited) — टाटा ग्रुप आणि ब्रिटनची प्रसिद्ध किरकोळ विक्रेता कंपनी टेस्को पीएलसी (Tesco Plc UK) यांची भागीदारी असलेली एक संयुक्त कंपनी आहे.

कोणत्या कंपन्यांमध्ये ते कायम राहणार आहेत?

  • टाटा सन्स (Tata Sons) – टाटा ट्रस्ट्सचे प्रतिनिधी संचालक म्हणून.

  • टायटन कंपनी (Titan Company) – बिगर-कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून.

  • टाटा स्टील (Tata Steel) – बिगर-कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून.

  • इंडिटेक्स ट्रेंट रिटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड – संचालक म्हणून.

चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवरून मतभेद

नोएल टाटा यांच्या पदांमधील या बदलाच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहात महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतभेदही समोर आले आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना आणखी पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला नोएल टाटा यांनी विरोध केला आहे.

१७ सप्टेंबर रोजी टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र, नोएल टाटा यांनी कंपनीचे सचिव सुप्रकाश मुखोपाध्याय यांना पत्र लिहून या निर्णयाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीचा विषय बैठकीत नव्हता. त्यामुळे या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला आहे.

टाटा सन्सच्या शेअर बाजारातील नोंदणीला विरोध

टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करण्याच्या मुद्द्यावरही नोएल टाटा यांची वेगळी भूमिका आहे. टाटा सन्सला खासगी कंपनी म्हणून कायम ठेवण्यासाठी त्यांनी पुनर्रचनेचा पर्याय सुचवला आहे. या योजनेनुसार समूहातील दोन कंपन्यांचे टाटा सन्समध्ये विलीनीकरण करण्याचा विचार आहे.

रिझर्व्ह बँकेने २०२२ मध्ये टाटा सन्सला बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या यादीत समाविष्ट केले होते. या वर्गीकरणामुळे कंपनीच्या शेअर बाजारातील नोंदणीचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. या वर्गातून बाहेर पडण्याची टाटा सन्सची विनंती रिझर्व्ह बँकेने सप्टेंबरमध्ये फेटाळली.

त्यामुळे एका बाजूला वयाच्या नियमामुळे नोएल टाटा काही महत्त्वाच्या पदांवरून दूर होत असताना, दुसऱ्या बाजूला टाटा समूहाच्या भविष्यातील नेतृत्व आणि आर्थिक रचनेबाबतचे प्रश्नही चर्चेत आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT