Paytm Payments Bank licence cancelled Pudhari
अर्थभान

Paytm Bank: रिझर्व्ह बँकेने Paytm पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रद्द का केला? जाणून घ्या A to Z माहिती

Paytm Payments Bank licence cancelled: भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमभंग आणि KYC त्रुटींमुळे Paytm पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. RBI ने बँकेचे कामकाज धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Paytm Payments Bank licence cancelled: भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेत Paytm पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या नियमभंग, KYC प्रक्रियेतील त्रुटी आणि नियमांचे पालन न केल्याच्या आरोपांनंतर अखेर रिझर्व्ह बँकेने ही कठोर कारवाई केली. या निर्णयामुळे भारतातील डिजिटल बँकिंग आणि फिनटेक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

RBI ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, Paytm Payments Bank चे कामकाज हे ग्राहक आणि ठेवीदारांच्या हिताला बाधा पोहोचवणारे होते. बँकेच्या व्यवस्थापनाची कार्यपद्धती सार्वजनिक हिताच्या विरोधात होती. त्यामुळे या बँकेला पुढे काम करण्याची परवानगी देण्यात कोणताही सार्वजनिक फायदा नसल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

ही कारवाई अचानक झालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून RBI सातत्याने Paytm Payments Bank वर लक्ष ठेवून होती. मार्च 2022 मध्येच RBI ने या बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली होती. त्यावेळी KYC प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचे सांगण्यात आले होते.

यानंतर मार्च 2024 मध्ये RBI ने आणखी कठोर निर्बंध लागू केले. बँकेला नवीन ठेवी स्वीकारणे, ग्राहक खात्यांमध्ये पैसे जमा करणे, वॉलेट टॉप-अप, FASTag आणि NCMC कार्ड व्यवहारांवर बंदी घालण्यात आली होती.

आता परवाना रद्द झाल्यानंतर या बँकेची ‘वाइंडिंग अप’ प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजेच बँक टप्प्याटप्प्याने बंद करण्याची प्रक्रिया न्यायालयाच्या माध्यमातून केली जाईल. RBI लवकरच उच्च न्यायालयात यासंदर्भात अर्ज दाखल करणार आहे.

विजय शेखर शर्मा यांनी 2017 मध्ये Paytm Payments Bank ची सुरुवात केली होती. One97 Communications या कंपनीकडे 49 टक्के हिस्सा होता, तर विजय शेखर शर्मा यांच्याकडे 51 टक्के हिस्सा होता.

Paytm Payments Bank कडे लाखो ग्राहक होते. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, या बँकेकडे सुमारे 3 कोटी बँक खाती, 10 कोटींपेक्षा जास्त KYC पूर्ण केलेले ग्राहक आणि 30 कोटींहून अधिक वॉलेट ग्राहक होते. FASTag जारी करणाऱ्या सर्वात मोठ्या संस्थांपैकी ही एक होती.

दरम्यान, Paytm ने स्पष्ट केले आहे की या निर्णयाचा त्यांच्या मुख्य व्यवसायावर थेट आर्थिक परिणाम होणार नाही. मात्र या घडामोडीमुळे कंपनीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय भारतातील पेमेंट बँक मॉडेलसाठी मोठा धक्का मानला जात आहे. UPI सारख्या डिजिटल पेमेंट प्रणाली लोकप्रिय झाल्यानंतर पेमेंट बँकांची गरज कमी होत गेली. त्यातच वाढती तपासणी आणि खर्चामुळे या क्षेत्रातील कंपन्यांवर दबाव वाढत गेला.

आता बाजाराचे लक्ष One97 Communications च्या शेअर्सकडे लागले आहे. या निर्णयाचा गुंतवणूकदारांच्या विश्वासावर काय परिणाम होतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT