SIP Drop Trend: मागील काही वर्षांत गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड SIP (Systematic Investment Plan) हा सर्वात सोपा आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा मार्ग ठरत होता. दरमहा थोडी थोडी रक्कम गुंतवून मोठं भांडवल तयार करण्याच्या या संकल्पनेने लाखो लोकांना आकर्षित केलं होतं. मात्र, आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. अलीकडच्या आकडेवारीनुसार, मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी आपली SIP थांबवली आहे. प्रश्न असा आहे की, लोक SIP का थांबवत आहेत?
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये तब्बल 44.03 लाख SIP बंद करण्यात आल्या. ऑगस्टमध्ये ही संख्या 41.15 लाख होती. मागील वर्षी याच महिन्यात सुमारे 40 लाख SIP बंद झाल्या होत्या.
हा ट्रेंडवरुन लक्षात येतं की अनेक गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूक धोरणांवर पुन्हा विचार करत आहेत. काहीजण बाजारातील अस्थिरतेने घाबरले आहेत, तर काहींनी आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर SIP थांबवली आहे. काही जणांना मात्र फंडच्या कामगिरीबद्दल निराशा वाटत आहे.
AMFIच्या आकडेवारीनुसार, SIP बंद होण्याचा वेग मागील काही महिन्यांपासून सतत बदलत आहे.
जूनमध्ये 48 लाख SIP बंद झाल्या,
जुलैमध्ये ही संख्या 43 लाखांवर आली,
ऑगस्टमध्ये 41 लाखांपर्यंत कमी झाली,
आणि सप्टेंबरमध्ये पुन्हा वाढून 44 लाखांवर पोहोचली.
यावरुन असं दिसत की, गुंतवणूकदारांना अजूनही आपल्या पोर्टफोलिओबद्दल शंका आहेत आणि ते त्यांची स्ट्रॅटेजी सतत बदलत आहे.
1. पोर्टफोलिओ बदलण्याची स्ट्रॅटेजी:
काही गुंतवणूकदार एकाच SIP ऐवजी अनेक छोट्या SIPमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे रिस्क कमी होते आणि परतावा चांगला मिळतो. त्यामुळे जुन्या SIP बंद करून नवी SIP सुरू केली जाते.
2. चुकीचा फंड निवडला जाणं:
कधी कधी गुंतवणुकीनंतर लक्षात येतं की निवडलेला फंड आपल्या उद्दिष्टांशी किंवा जोखीम क्षमतेशी जुळत नाही. अशावेळी SIP थांबवून Systematic Transfer Plan (STP) द्वारे पैसे अधिक योग्य फंडमध्ये हलवणे शहाणपणाचं ठरतं.
3. सेक्टर फंडची कामगिरी:
काही सेक्टर-आधारित फंड दीर्घकाळ कमी परतावा देत असतील, तर त्यात SIP सुरू ठेवणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार ब्रॉड मार्केट किंवा लार्ज कॅप फंडकडे वळत आहेत.
4. आर्थिक ताण किंवा आपत्कालीन गरज:
नोकरी जाणं, वैद्यकीय खर्च किंवा कुटुंबातील आकस्मिक आर्थिक अडचणी अशा प्रसंगी SIP थांबवली जाते. अशावेळी SIP सुरु ठेवणं शक्य होत नाही.
बर्याच वेळा सांगितलं जातं की SIP कधीही थांबवू नये. परंतु अनेक तज्ज्ञांची यावर वेगवेगळी मत आहेत. काहींच मत असं आहे की SIP थांबवणं हा नेहमीच चुकीचा निर्णय नसतो. बाजारातील बदलत्या वास्तवाला ओळखून नव्याने स्ट्रॅटेजी आखणं हाच शहाणपणाचा मार्ग आहे.