Yash Patil AI Startup Pudhari
अर्थभान

Yash Patil AI Startup: वय फक्त 23 वर्षे! AI कंपनी विकून कमावले 40 हजार कोटी; यश पाटीलची जगभर चर्चा

Yash Patil AI Startup: यशने OpenAI मधील नोकरी सोडल्यानंतर दोन माजी सहकाऱ्यांसोबत मे 2025 मध्ये कंपनी सुरू केली होती.

Rahul Shelke

Yash Patil AI Startup: अवघ्या 23 व्या वर्षी स्वतःची AI कंपनी उभारून ती तब्बल 40 हजार कोटी रुपयांना विकण्याची कामगिरी एका भारतीय वंशाच्या तरुणाने केली आहे. यश पाटील असे या तरुण उद्योजकाचे नाव आहे. त्याने स्थापन केलेली Applied Compute ही कंपनी आता जगातील आघाडीच्या सायबर सुरक्षा कंपन्यांपैकी एक असलेल्या Palo Alto Networks कडून खरेदी केली जाणार आहे. हा व्यवहार 4.5 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 40 हजार कोटी रुपयांचा आहे. या मोठ्या व्यवहारामुळे यश पाटील सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

विशेष म्हणजे, यशने अवघ्या दीड वर्षांत शून्यातून ही कंपनी उभी केली. त्याआधी त्याने OpenAI या आघाडीच्या AI कंपनीमध्ये काम केले होते. आता त्याच कंपनीच्या यशामुळे त्याला जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या Palo Alto Networks मध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे.

कोण आहे यश पाटील? शिक्षण कुठे झाले?

यश पाटीलचा AI क्षेत्रातील प्रवास Applied Compute कंपनी सुरू होण्याच्या आधीच सुरू झाला होता. एप्रिल 2023 मध्ये त्याने OpenAI मध्ये Technical Staff Resident म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर 2023 मध्ये त्याला कंपनीत पूर्णवेळ तांत्रिक पदावर काम करण्याची संधी मिळाली. मे 2025 पर्यंत तो OpenAI मध्ये कार्यरत होता. त्यानंतर स्वतःची कंपनी सुरू करण्यासाठी त्याने OpenAI सोडले.

यशने अमेरिकेतील प्रसिद्ध Stanford University मधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण घेत असतानाच त्याने स्टार्टअप क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. त्याच्या आधीच्या प्रकल्पांमध्ये Armadillo Labs या कंपनीचा समावेश होता. या कंपनीत ई-कॉमर्स वेबसाइटसाठी मशीन लर्निंगशी संबंधित टूल विकसित करण्यावर भर होता.

अवघ्या 18 महिन्यांत उभी केली हजारो कोटींची कंपनी

मे 2025 मध्ये यश पाटीलने Rhythm आणि Linden या OpenAI मधील दोन माजी सहकाऱ्यांसोबत Applied Compute कंपनीची स्थापना केली. कंपन्यांना स्वतःचे AI मॉडेल तयार करता यावेत आणि त्यांचा वापर करता यावा, ही या कंपनीमागची मुख्य कल्पना होती.

सध्या अनेक कंपन्या AI सेवांसाठी बाहेरील तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. मात्र Applied Compute कंपन्यांना स्वतःच्या डेटाचा वापर करून गरजेनुसार AI मॉडेल तयार करण्याची सुविधा देते. तसेच या मॉडेल्सचा वापर दैनंदिन व्यावसायिक कामांसाठी करता येतो.

कंपनीने अत्यंत कमी कालावधीत मोठी आर्थिक प्रगती केली आहे. यशने दिलेल्या माहितीनुसार, Applied Compute ने शून्यापासून सुरुवात करून अवघ्या 18 महिन्यांत मोठी कामगिरी केली आहे. Applied Compute च्या ग्राहकांमध्ये Microsoft, Shopify, DoorDash, Harvey, Cognition, Clay आणि Decagon यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश आहे.

Palo Alto Networks यशची कंपनी का खरेदी करत आहे?

Palo Alto Networks ही सायबर सुरक्षा क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी आहे. कंपन्यांना ऑनलाइन हल्ले, डेटा चोरी आणि इतर डिजिटल धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही कंपनी तंत्रज्ञान पुरवते.

सध्या जगभरातील कंपन्यांमध्ये AI चा वापर वेगाने वाढत आहे. त्यामुळे AI प्रणाली सुरक्षित ठेवण्याची गरजही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर Palo Alto Networks ने Applied Compute खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Applied Compute कंपन्यांना स्वतःचे AI मॉडेल तयार करण्यासाठी आणि चालवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान पुरवते. तर Palo Alto Networks कडे सायबर सुरक्षेचे कौशल्य आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र आल्यास ग्राहकांना AI तंत्रज्ञानासोबतच अधिक सुरक्षित सुविधाही उपलब्ध करून देता येतील.

Applied Compute चे वैशिष्ट्य म्हणजे कंपनी ओपन-वेट मॉडेल्सवर काम करते. या प्रकारातील AI मॉडेल्स कंपन्या डाउनलोड करू शकतात. त्यानंतर आपल्या गरजेनुसार त्यात बदल करून त्यांचा वापर करू शकतात.

Palo Alto Networks चे मुख्य कार्यकारी अधिकारी Nikesh Arora यांनी The Wall Street Journal ला दिलेल्या मुलाखतीत या व्यवहारामागील भूमिका स्पष्ट केली. AI क्षेत्रातील अर्थव्यवस्थेत कंपनीला महत्त्वाचे स्थान मिळवायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

यश पाटीलला मिळणार मोठी जबाबदारी

या व्यवहारानंतर यश पाटीलला Palo Alto Networks मध्ये Co-Chief AI Officer हे महत्त्वाचे पद मिळणार आहे. कंपनीच्या AI क्षेत्रातील पुढील वाटचालीत त्याची महत्त्वाची भूमिका असेल.

यशच्या मते, या व्यवहारामुळे Applied Compute ला अधिक वेगाने विस्तार करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर ग्राहकांना त्यांच्या AI मॉडेल्सवर आणि डेटावर नियंत्रण ठेवता येईल.

4.5 अब्ज डॉलरचा हा व्यवहार पूर्णपणे शेअर्सच्या माध्यमातून होणार आहे. हा व्यवहार पुढील वर्षी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या व्यवहारातून यश पाटीलला वैयक्तिकरीत्या किती पैसे मिळणार, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT