पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश दिलीप सांघवी यांची मुलगी विधि सांघवी ह्या सध्या चर्चेत आल्या आहेत. विधि ह्या त्यांचा भाऊ आलोक सांघवी यांच्यासह त्यांच्या वडिलांच्या ४.३५ लाख कोटींच्या सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजच्या उत्तराधिकारी आहेत. विशेष म्हणजे ही कंपनी जगातील चौथी सर्वात मोठी जेनेरिक फार्मास्युटिकल कंपनी आहे. सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजच्या उपाध्यक्षा म्हणून विधि ह्या त्यांच्या वडिलांच्या फार्मास्युटिकल उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
सांघवी ह्या कन्झ्युमर हेल्थकेअर, न्यूट्रिशन आणि इंडिया डिस्ट्रिब्युशनच्या प्रमुखदेखील आहेत. गेली एका दशके त्या कंपनीच्या व्यापक धोरणाला आकार देत आहेत. दिलीप सांघवी यांना आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून ओळखले जाते. द इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, फोर्ब्सच्या माहितीनुसार दिलीप सांघवी हे १५ डिसेंबर २०२४ पर्यंत सुमारे २९.२ अब्ज संपत्तीसह भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत.
विधि सांघवी यांनी पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या प्रतिष्ठित व्हार्टन स्कूलमधून अर्थशास्त्राची पदवी शिक्षण घेतले आहे. त्या सन फार्माने स्थापना केलेल्या क्लिनिकल-स्टेज बायोफार्मास्युटिकल कंपनी सन फार्मा ॲडव्हान्स्ड रिसर्च कंपनी (SPARC) मध्ये नॉन-एक्झ्युक्युटिव्ह संचालक म्हणून काम करत आहेत. विधी यांनी यापूर्वी सन फार्मा इंडियाच्या मार्केटिंगमध्येदेखील काम केले होते.
रिपोर्टनुसार, विधि यांचे लग्न गोव्यातील उद्योद्यक शिव आणि रंजना साळगावकर यांचा मुलगा विवेक साळगावकर यांच्याशी झाले आहे. साळगावकरांचे अंबानी कुटुंबीयांशी जवळचे नाते आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि अनिल अंबानी यांची बहिणी दीप्ती यांचे लग्न दत्तराज साळगावकर यांच्याशी झाले आहे. दत्तराज साळगावकर हे शिव साळगावकर भाऊ आहेत.
सन फार्मा कंपनी व्यतिरिक्त विधि ह्या मानसिक आरोग्य सेवेसाठीही काम करतात. त्यांनी एका एनजीओची स्थापना केली असून ज्याचा उद्देश लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित सल्ला देण्याचा आहे, असे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
अधिकृत वेबसाइटनुसार, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज ही ५.४ अब्ज डॉलर्स जागतिक उत्पन्न असलेली जगातील चौथी सर्वात मोठी जेनेरिक फार्मास्युटिकल कंपनी आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीच्या ४३ उत्पादन सुविधा आहेत. ही कंपनी जगभरातील १०० हून अधिक देशांना आरोग्यसेवा व्यावसायिक आणि रुग्णांद्वारे विश्वासार्ह अशी उच्चदर्जाची, परवडणाऱ्या औषधांचा पुरवठा करते.