Stock Market  (File Photo)
अर्थभान

Indian Economy | "अर्थवार्ता" जाणून घ्या गत सप्ताहातील आर्थिक क्षेत्रातील घडामोडी..

Weekly Market Analysis | गतसप्ताहातील बाजारातील चढ-उतारांचा सविस्तर आढावा

पुढारी वृत्तसेवा
प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

Weekly Market Analysis

गतसप्ताहात शुक्रवारच्या सत्रात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण अनुक्रमे 243.45 अंक व 769.09 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 24853.15 व 81721.08 अंकांच्या पातळीवर बंद झाले. शुक्रवारी निफ्टीमध्ये 0.99 टक्के व सेन्सेक्समध्ये 0.95 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. एकूण गतसप्ताहाचा विचार करता निफ्टीमध्ये 166.65 अंक म्हणजेच 0.67 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 609.51 अंक म्हणजेच 0.74 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. सप्ताहभरात सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स (5.5 टक्के), एचडीएफसी लाईफ (4 टक्के), टाटा स्टील (3.4 टक्के), बजाज ऑटो (3.1 टक्के), जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस (1.7 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. तसेच सर्वाधिक घट होणार्‍या समभागांमध्ये ग्रासीम इंडस्ट्रीज (-5.2 टक्के), मारुती सुझुकी इंडिया (-4.2 टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (-3.9 टक्के), इटर्नल लिमिटेड (-3.3 टक्के), सनफार्मा (-3.0 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला.

आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा 2,68,590 कोटींचा लाभांश जाहीर केला. मागील वर्षीच्या तुलनेत लाभांशामध्ये तब्बल 27 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा ही रक्कम सुमारे 40 ते 50 हजार कोटींनी अधिक आहे. केंद्र सरकारच्या करमुक्त उत्पन्नापैकी या लाभांश उत्पन्नाचा वाटा आता 46.1 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या 5.29 टक्के हिस्सा हा जाहीर केलेला लाभांश आहे. रिझर्व्ह बँकेच्या या लाभांशामुळे चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारला सुमारे 70 हजार कोटींचा अधिकचा करमुक्त महसूल प्राप्त होण्याचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेप्रमाणेच इतर सरकारी कंपन्या, बँकादेखील दरवर्षी केंद्र सरकारला लाभांश देतात. परंतु, यावर्षी एकट्या रिझर्व्ह बँकेने अंदाजित रकमेपेक्षा 50 हजार कोटींचा अधिकचा लाभांश दिल्याने एकूण लाभांश रक्कम अंदाजापेक्षा 70 हजार कोटींपेक्षा अधिकची असण्याची शक्यता आहे.

गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत खासगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक इंडसिंड बँकेला 2,236 कोटींचा तोटा सहन करावा लागला. या तिमाहीत 2,522 कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. पूर्वी ताळेबंदांमध्ये केलेल्या चुकीच्या नोंदीमुळे तसेच डेरीव्हेटिव्हस् आणि मायक्रोफायनान्स क्षेत्रामध्ये वाढीव नफा दाखवण्यासाठी केलेल्या फेरफारीमुळे या तिमाहीत तरतुदी (प्रोव्हिजन्स) करण्याची वेळ बँकेवर आली. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने 2,347 कोटींचा निव्वळ नफा जाहीर केला होता. तब्बल 19 वर्षांत पहिल्यांदाच या तिमाहीत तोटा जाहीर करण्याची नामुष्की यावेळी बँकेवर आली. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (नेट इंटरेस्ट इन्कम) मागील वर्षी असणार्‍या 5,376 कोटींच्या तुलनेत 43 टक्के घटून 3,048 कोटी झाले. तसेच 31 डिसेंबर 2024 रोजी असलेले 0.68 टक्क्यांचे निव्वळ अनुत्पादित कर्जाचे (नेट एनपीए) प्रमाण 0.95 टक्क्यांवर पोहोचले.

सरकारी कंपनी ओएनजीसीचे गत आर्थिक वर्षाचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर. मागील वर्षीच्या तिमाहीत असणारा 11096.03 कोटींचा निव्वळ नफा 20 टक्के घटून 8856.33 कोटींवर खाली आला. कंपनीचा महसूल 1.72 लाख कोटींवरून 1.70 लाख कोटींवर आला. तसेच कंपनीचे एकूण उत्पन्न 1.75 लाख कोटींवरून 1.73 लाख कोटींवर खाली आले. संपूर्ण आर्थिक वर्ष 2025 चा विचार करता एकूण निव्वळ नफा मागील वर्षी असणार्‍या 55273.15 कोटींवरून 30.6 टक्के घसरून 38328.59 कोटी झाला.

मेक अमेरिका ग्रेट अगेनच्या धर्तीवर अमेरिकेत स्मार्टफोन उत्पादनासाठी अ‍ॅपल नंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सॅमसंग कंपनीला इशारा. अ‍ॅपल किंवा सॅमसंगसारख्या कंपन्यांनी अमेरिकेबाहेर फोन उत्पादन करून अमेरिकेत विक्रीसाठी आणल्यास त्यावर 25 टक्के कर लावण्याची तयारी ट्रम्प यांनी केली आहे. परंतु, अमेरिकेत फोन निर्मिती करणे परवडणारे नसल्याचे अ‍ॅपल कंपनीचे म्हणणे आहे. असे झाल्यास 1200 डॉलर्सच्या जवळपास मिळणारा सध्याचा आयफोन 1500 ते 3500 डॉलर्स किमतीवर जाण्याची शक्यता आहे. परंतु, अ‍ॅपलने ट्रम्प यांच्या दबावासमोर झुकण्यास नकार दिल्याचे समजते. फॉक्सकॉन या कंपनीद्वारे अ‍ॅपल भारतात 1.5 अब्ज डॉलर्सचा स्मार्टफोन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे.

प्राप्तिकर विभागाने आयटीआर-यू नावाचे नवीन प्राप्तिकर विवरण पत्र अर्ज आणले. मुदत उलटून गेलेले मागील चार वर्षांपूर्वीपर्यंतचे विवरण पत्र अद्ययावत (अपडेटेड रिटर्न्स) भरण्याची सवलत याद्वारे करदात्यांना मिळणार आहे. वित्त कायदा 2025 नुसार मुदत संपलेल्या दिवसापासून 12 महिने आणि 24 महिन्यांच्या आत अपडेटेड रिटर्न भरल्यास अनुक्रमे 25 टक्के व 50 टक्के अतिरिक्त कर भरावा लागेल, तर 36 महिने व 48 महिन्यांच्या आत दाखल केलेल्या अपडेटेड रिटर्नसाठी अनुक्रमे 60 टक्के व 70 टक्के अतिरिक्त कर भरावा लागेल. मागच्या तीन वर्षांत अशा प्रकारची 90 लाख विवरण पत्रे दाखल झाल्याने केंद्र सरकारला 8500 कोटींचा अतिरिक्त महसूल प्राप्त झाला.

शुक्रवारच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत तब्बल 74 पैसे मजबूत झाला. नोव्हेंबर 2022 नंतरची एकाच दिवसात झालेली रुपया चलनातील ही सर्वात मोठी वाढ आहे. रुपया एकाच दिवसात सुमारे 0.9 टक्के वाढून 85.2125 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाला. सध्या अमेरिकेने जवळपास सर्व देशांविरुद्ध व्यापारयुद्ध आरंभले असल्याने बर्‍याच देशांमध्ये याबाबत नाराजी आहे. अमेरिकेकडून एकतर्फी अटी-शर्ती लादण्याचे प्रकार वाढत असल्याने मित्र देश तर दुखावलेच; परंतु याचा अनिष्ट परिणाम अमेरिकेच्या स्वतःच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा दोलनमय धोरणामुळे अमेरिकेचा डॉलर इतर चलनांच्या तुलनेत घसरल्याचे पाहायला मिळते.

आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसचा स्पार्टन या एल्बिट सिस्टीमच्या कंपनीसोबत करार. भारतीय नौदलासाठी अँटी सबमरिन वॉरफेअरसाठी प्रणाली बनवण्याचे निश्चित. भारतात स्वदेशी उत्पादन करण्याच्या द़ृष्टीने नौदलासाठी प्रणाली उपलब्ध करून देणारी अदानी डिफेन्स देशातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे.

सुझुकी मोटारसायकल इंडियाची हरियाणा खारखोडा या ठिकाणी 1200 कोटींच्या दुचाकी प्रकल्प उभारणीची घोषणा. 100 एकरांवरील या प्रकल्पातून दरवर्षी 13 लाख दुचाकींची निर्मिती केली जाईल. 2027 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता असून, पहिल्या टप्प्यात 7.5 लाख दुचाकींचे उत्पादन घेण्याची क्षमता असेल. सध्या सुझुकी मोटारसायकलच्या गुरुग्राम येथील प्रकल्पातून पहिल्या ई स्कूटरचे (ई अ‍ॅक्सेस) उत्पादन सुरू झाले आहे. यामुळे सध्या बाजारात असलेल्या बजाज चेतक टीव्हीएस आयट्युब, ईथर रिक्झा, ओला एस 1 या वाहनांना स्पर्धा निर्माण झाली आहे.

16 मे अखेर संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 4.888 अब्ज डॉलर्सनी घटून 685.729 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT