

* सातत्याने तीन सप्ताहांत मोठी पडझड दर्शवल्यानंतर गतसप्ताहात अखेर निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांकाला पुन्हा उभारी. मागील सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 427.80 अंक व 1134.48 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 22552.5 अंक तसेच 74332.58 अंकांच्या पातळीवर बंद झाले. सप्ताहभरात निफ्टीमध्ये 1.93 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 1.55 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. सर्वाधिक वाढ होणार्या समभागांमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स (12.5 टक्के), टाटा स्टील (10.5 टक्के), भारत पेट्रोलियम (10.1 टक्के), हिंडाल्को इंडस्ट्रीज (9 टक्के), अदानी एन्टप्राईझ (7.2 टक्के) यांचा समावेश झाला. सर्वाधिक घट होणार्या समभागांमध्ये इंडसिंड बँक (-5.4 टक्के), बजाज ऑटो (4.2 टक्के), एचडीएफसी बँक (-2.5 टक्के), मारुती सुझुकी इंडिया (-2.4 टक्के), बजाज फायनान्स (-1.5 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. आठवड्याच्या अखेरच्या तीन दिवसांत प्रामुख्याने निर्देशांकामध्ये वाढ बघण्यास मिळाली.
* या सप्ताहात रुपया डॉलरच्या तुलनेत बर्यापैकी सावरला. शुक्रवारच्या सत्रात रुपया प्रतिडॉलर 86.88 रुपये पातळीवर बंद झाला. एका संपूर्ण सप्ताहाचा विचार करता डॉलरच्या तुलनेत 0.7 टक्के मजबूत झाला आणि शुक्रवारच्या सत्रात सुमारे 0.3 टक्के म्हणजे सुमारे 20 पैसे मजबुतीसह बंद झाला. फेब्रुवारी 2023 नंतरचे मागील दोन वर्षांतील हे रुपया चलनाचे सर्वोत्तम प्रदर्शन असल्याचे म्हटले जाते. याचा सकारात्मक परिणाम दोन्ही निर्देशांकांवर झाला. दोन्ही निर्देशांकांमध्ये मागील तीन महिन्यांत एकाच सप्ताहात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. यामध्येदेखील मिडकॅप निर्देशांकाने 3.36 टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांकाने 5.86 टक्क्यांची वाढ दर्शवली. आठवडाभरात बीएसई (मार्केट कॅप) भांडवल बाजारमूल्य 14.3 लाख कोटींनी वाढले.
* महाराष्ट्र राज्यावर कर्जाचा बोजा वाढला. मार्च 2025 अखेर राज्याच्या कर्जभारामध्ये सुमारे 10.1 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. या आर्थिक वर्षांत कर्जाचा बोजा 7 लाख 82 हजार 991 कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी राज्यावरील कर्जाचा बोजा 7 लाख 11 हजार 278 कोटी होता. यावर्षी कर्जबोजामध्ये सुमारे 70 हजार कोटींची भर पडणार असल्याचे समजते. आतापर्यंत काढलेल्या कर्जाचे व्याज फेडण्यासाठी मागील वर्षी 48 हजार कोटी भरावे लागले, तर यावर्षी व्याजापोटी तब्बल 56,727 कोटींपर्यंत भरावे लागण्याची शक्यता आहे. आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार राज्याचा महसुली खर्च यावर्षी 5 लाख 19 हजार 514 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
* टाटा समूहाचे ‘टाटा प्ले’ डीटीएच उद्योग आणि एअरटेल यांचे एकत्रीकरण होण्याची शक्यता. सध्या डीटीएच (म्हणजेच डायरेक्ट टू होम) क्षेत्रात टाटा प्ले एक प्रमुख कंपनी आहे. ब्रॉडबँड आणि मनोरंजन क्षेत्रातील सेवा या कंपनीमार्फत पुरवल्या जातात. मागील महिन्यात एकत्रीकरणासंबंंधी माहिती एअरटेलने स्टॉक एक्सचेंजला कळवली. यापूर्वी एअरटेलने 2019 मध्ये टाटांचा दूरसंचार व्यवसाय (टेलिकॉम बिझनेस) डोकोमो खरेदी केला होता. सप्टेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार टाटांचे सध्या 59.91 दशलक्ष ग्राहक आहेत. एकत्रीकरण झाल्यास हे सर्व ग्राहक एअरटेलकडे हस्तांतरित होतील.
* टाटा समूहाची वित्तसंबंधी सेवा पुरवणारी कंपनी टाटा कॅपिटल लवकरच ‘आयपीओ’द्वारे भांडवल बाजारात येणार. या आयपीओद्वारे सुमारे 2 अब्ज डॉलर्स (सुमारे 16 ते 17 हजार कोटी) उभारणीचे टाटा कॅपिटलचे लक्ष्य आहे. या कंपनीचे बाजारमूल्य जवळपास 11 अब्ज डॉलर्स असण्याचा अर्थविश्लेषकांचा अंदाज. टाटा कॅपिटलच्या सध्या देशभरात 900 शाखा आहेत. टाटा कॅपिटलसोबतच एलजी इंडियाचा 1.5 अब्ज डॉलर्सचा आयपीओ आणि आयसीआयसीआय प्रुडेंशियलचा सुमारे 1 अब्ज डॉलर्सचा आयपीओ यावर्षी भांडवल बाजारात येण्याची शक्यता आहे.
* ‘सेबी’ या बाजारनियामक संस्थेच्या माजी प्रमुख माधवी पुरी बूच यांना उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा. माधवी पुरी बूच यांच्यासह मुंबई शेअर बाजाराच्या इतर वरिष्ठ अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याचे सत्र न्यायालयाने आदेश दिले होते. हा आदेश रद्दबातल करण्याच्या द़ृष्टीने माधवी पुरी बूच व इतरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आता सर्वांचा युक्तिवाद ऐकून माननीय उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याच्या आदेशास चार आठवड्यांची अंतरिम स्थगिती दिली. सेबीचे नियम तोडून नियमबाह्य पद्धतीने स्टॉक एक्सचेंजवर लिस्टींग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 1994 सालच्या लिस्टींग संबंधीचे हे प्रकरण आहे.
* साल 2024 मध्ये भारतातील अब्जपतींची संख्या 191 पर्यंत गेली. या वर्षात 26 नवे अब्जपती भारतात तयार झाले. मागील वर्षीच्या तुलनेत अब्जपतींच्या संख्येत 26 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार भारतात सध्या 85,698 अतिश्रीमंत व्यक्ती राहतात. सर्वाधिक अतिश्रीमंत (हायनेटवर्थ इंडिव्हिज्युअल) व्यक्तींच्या संख्येच्या यादीत भारत सध्या जगात चौथ्या स्थानी आहे. अमेरिकेत सर्वाधिक 9 लाख, त्यानंतर चीनमध्ये सुमारे 4.71 लाख, जपानमध्ये 1.22 लाख व्यक्ती अतिश्रीमंत या प्रकारात मोडतात.
* आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतींनी मागील चार वर्षांचा तळ गाठला. गतसप्ताहात अमेरिकेचे नायमॅक्स कू्रड सुमारे 4 टक्के कोसळून 65.53 डॉलर प्रतिबॅरल किमतीपर्यंत खाली गेले होते. ब्रेंट क्रूडने देखील 70 डॉलर प्रतिबॅरलची पातळी तोडली होती. खनिज तेल उत्पादक संघटना ओपेक प्लसने एप्रिलमध्ये दरदिवशी 1.38 लाख बॅरल अधिक खनिज तेल उत्पादनाचा निर्णय घेतला. आता उत्पादन वाढण्याच्या शक्यतेने तेलाच्या किमती कोसळल्या. यापूर्वी 2022 मध्ये खनिज तेलाच्या किमती वाढत्या ठेवण्याच्या द़ृष्टीने ओपेक प्लसने दरदिवशी 5.85 दशलक्ष बॅरल उत्पादन कपातीचा निर्णय घेतला होता. परंतु, ट्रम्प आल्यानंतर अमेरिका आणि सौदी अरेबिया यांनी एकत्रित येऊन खनिज तेलाच्या किमती खाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले. भारतासाठी किमती खाली येणे दिलासादायक आहे. कारण, भारत आपल्या वापरासाठी लागणारे 85 टक्के खनिज तेल परदेशातून आयात करतो.
* फेब्रुवारीमध्ये वाहन विक्रीत 7 टक्क्यांची घसरण. गेल्या महिन्यात भारतीय बाजारपेठेत एकूण 18.99 लाख वाहनांची विक्री झाली. याच महिन्यात मागील वर्षी 20.46 लाख वाहने विकली गेली होती, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन या संघटनेने दिली.
* डालमिया इंडिया या सिमेंट उत्पादक कंपनीची महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये 3,520 कोटींची गुंतवणूक. यामध्ये पुण्यात कंपनी 3 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचे ग्राईंडिंग युनिट उभारणार. तसेच बेळगाव या ठिकाणी 3.6 दशलक्ष टनचे क्लिंकर युनिट व 3 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचे ग्राईंडिंग युनिट उभारणार. यामुळे एकूण 6 दशलक्ष टन सिमेंट उत्पादन क्षमता वाढणार आहे. 2028 सालापर्यंत एकूण 75 दशलक्ष टन प्रतिवर्ष सिमेंट उत्पादन क्षमता तयार करण्याचे या ककंपनीचे उद्दिष्ट आहे.
* 28 फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 1.8 अब्ज डॉलर्सनी वधारून 638.7 अब्ज डॉलर्सवर गेली.