Israel Attack Iran file photo
अर्थभान

Israel Attack Iran: संपूर्ण मध्य पूर्व धोकादायक वळणावर! सोने-चांदीच्या गुंतवणूकदारांनी काय करावे?

अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ला केल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. याचे थेट परिणाम भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहेत.

मोहन कारंडे

Israel Attack Iran:

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ला केल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. इराणनेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत इस्रायलमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे, ज्या देशांमध्ये अमेरिकन लष्करी तळ आहेत, अशा काही देशांवरही इराणने निशाणा साधला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या १२ दिवसांच्या युद्धापेक्षाही हे युद्ध अधिक भीषण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, याचे थेट परिणाम भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहेत.

इस्रायलची इराणला अस्तित्त्व मिटवण्याची धमकी

२८ फेब्रुवारी रोजी इस्रायलने इराणवर हल्ला चढवला, त्यानंतर इराणने तात्काळ पलटवार केला. या परिस्थितीमुळे संपूर्ण मध्यपूर्व क्षेत्र युद्धाच्या ज्वाळांमध्ये वेढले गेले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणचे अस्तित्व संपवून टाकण्याची आक्रमक धमकी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या मदतीने इस्रायल अनेक दिवसांपासून या हल्ल्याची तयारी करत होता. सुरुवातीला अणुकरारासाठी इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्याचे अमेरिकेचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर, आता लष्करी कारवाईच्या माध्यमातून इराणला झुकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होणार?

इराणने कतार, कुवेत, युएई आणि बहरीन यांसारख्या अमेरिकन लष्करी तळ असलेल्या देशांनाही लक्ष्य केल्यामुळे वित्तीय बाजारावर याचे गंभीर परिणाम होतील, असा अंदाज तज्ञांचा आहे. जगातील ४०% कच्च्या तेलाचा पुरवठा मध्यपूर्वेतून होतो. युद्ध लांबल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होऊन कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार जाऊ शकतात. सध्या हा दर ८० डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

सोने आणि चांदीच्या दरात ऐतिहासिक उसळी?

युद्धामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे वळत आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात ५,४०० डॉलर प्रति औंसपर्यंत मजल मारू शकते. तर चांदीचा भाव आधी १०० डॉलर आणि त्यानंतर ११०-११५ डॉलर प्रति औंस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

भारत आपल्या गरजेच्या ८०% कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाचे वाढते दर यामुळे भारतीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढू शकतात.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

तज्ज्ञांच्या मते, सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक केलेल्यांसाठी ही एक संधी असू शकते. विशेषतः जे गुंतवणूकदार आधीच्या घसरणीमुळे अडकले होते, त्यांना आता बाहेर पडण्याची संधी मिळेल. मात्र, युद्ध दीर्घकाळ चालल्यास किमती आणखी किती वाढतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्यातील आपली गुंतवणूक कायम ठेवल्याने, अल्प कालावधीत सोन्याला मोठी मागणी राहण्याचे संकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT