Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: अमेरिका-भारत व्यापार करारामुळे बाजारात तेजी; निफ्टी पहिल्यांदाच 1,220 अंकांनी वाढला, बाजारात चौफेर खरेदी

Stock Market LIVE Updates: भारत-अमेरिका व्यापार कराराच्या घोषणेमुळे भारतीय शेअर बाजारात आज ऐतिहासिक तेजी पाहायला मिळाली. निफ्टीने 1,220 अंकांनी वाढला, तर सेन्सेक्स 3,657 अंकांनी वाढला.

Rahul Shelke

Stock Market LIVE Updates: भारत-अमेरिका व्यापार कराराच्या मोठ्या घोषणेमुळे आज भारतीय शेअर बाजारात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी करण्याची घोषणा केल्यानंतर देशांतर्गत आणि जागतिक बाजारांचे चित्रच बदलले. या सकारात्मक बातमीचा परिणाम म्हणून शेअर बाजाराने इतिहासातील सर्वात मजबूत ओपनिंग केली आहे.

सकाळी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 3,657 अंकांनी वाढत 85,323 या पातळीवर उघडला. निफ्टीही पहिल्यांदाच 1,220 अंकांनी वाढत 26,308 वर उघडला. बँक निफ्टीतही तेजी दिसून आली आणि तो 2,792 अंकांनी वाढत 61,411 वर पोहोचला. रुपयाही डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला असून तो 108 पैशांनी सुधारत 90.44 प्रति डॉलरवर उघडला.

या जोरदार तेजीचे संकेत देणारा GIFT निफ्टी सकाळीच 1,100 अंकांच्या वाढीसह 26,160 च्या पुढे गेला होता. आशियाई बाजारांमध्येही सकारात्मक वातावरण दिसले. जपानचा निक्केई निर्देशांक सुमारे 1,500 अंकांनी वधारला, तर अमेरिकेतील डाओ फ्युचर्स स्थिर राहिले.

आज बाजारात सर्वच क्षेत्रांमध्ये चौफेर खरेदी दिसून आली. रियल्टी क्षेत्रात सर्वाधिक तेजी होती. ऑटो, फार्मा, एनबीएफसी, आयटी, मेटल, केमिकल्स, प्रायव्हेट बँका आणि पीएसयू बँकांमध्येही खरेदी झाली. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दरम्यान, कॉर्पोरेट निकालांकडेही बाजाराचे लक्ष आहे. इंडस टॉवर्सचे निकाल संमिश्र स्वरूपाचे होते. आज अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि बजाज फायनान्स यांचे निकाल जाहीर होणार असून एफ अँड ओ सेगमेंटमध्ये अनेक शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर आहे.

कमोडिटी बाजारात मात्र काहीशी अस्थिरता कायम आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती सुमारे 3,800 रुपयांनी घसरून 1,44,00 रुपयांच्या खाली बंद झाल्या, तर चांदीतही मोठी घसरण झाली. मात्र जागतिक बाजारात सोन्या-चांदीत पुन्हा 4 ते 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 1.5 टक्क्यांनी घसरून 66 डॉलरच्या आसपास आहेत.

या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी भारत-अमेरिका व्यापार करार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कराराची अधिकृत घोषणा केली आहे. या करारानुसार भारतावर लावण्यात आलेला अमेरिकेचा टॅरिफ 50 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, जो आशियाई देशांमध्ये सर्वात कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी भारत अमेरिकन उत्पादनांवरील टॅरिफ शून्यावर आणणार आहे.

या करारामुळे भारत-अमेरिका व्यापार, उत्पादन क्षेत्र आणि सप्लाय चेनला मोठे पाठबळ मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फोनवर झालेल्या चर्चेनंतर या कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे खुलेपणाने कौतुकही केले आहे. या ऐतिहासिक करारामुळे बाजारात निर्माण झालेला उत्साह पुढील काही दिवस टिकून राहतो का, याकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT