Top Government Banks in India Pudhari
अर्थभान

Top Banks in India: देशातील सर्वाधिक खाती कोणत्या बँकेत? टॉप 5 बँकांची यादी आली समोर; पहिल्या क्रमांकावर कोण?

Top Government Banks in India: देशातील 12 सरकारी बँकांमध्ये आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एकूण 160.16 कोटी खातेदार असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.

Rahul Shelke

Top Government Banks in India: देशात बँक खाते उघडण्यासाठी सरकारी आणि खासगी अशा अनेक बँकांचे पर्याय उपलब्ध आहेत. काही ग्राहक सरकारी बँकांवर विश्वास ठेवतात, तर काही जण खासगी बँकांच्या सुविधा पाहून खाते उघडतात. मात्र, देशातील सरकारी बँकांचा विचार केला तर सर्वाधिक ग्राहक कोणत्या बँकेत खाते उघडतात, याची तुम्हाला माहिती आहे का?

अर्थ मंत्रालयाने 20 जुलै 2026 रोजी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये देशातील 12 सरकारी बँकांमध्ये एकूण 160.16 कोटी खातेदार होते. या आकडेवारीत भारतीय स्टेट बँकेने (SBI) अव्वल स्थान कायम राखले आहे. चला तर जाणून घेऊया, सर्वाधिक खातेदार असलेल्या टॉप 5 सरकारी बँका कोणत्या आहेत.

सर्वाधिक खातेदारांच्या यादीत SBI अव्वल

देशातील सरकारी बँकांमध्ये भारतीय स्टेट बँकेचा (SBI) दबदबा कायम आहे. 31 मार्च 2026 पर्यंत SBI मध्ये तब्बल 53.03 कोटी खातेदार होते. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ही संख्या 46.77 कोटी होती. म्हणजेच अवघ्या चार वर्षांत SBI च्या खातेदारांमध्ये सुमारे 6.26 कोटींची वाढ झाली आहे.

SBI नंतर बँक ऑफ बडोदा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या बँकेत 18.93 कोटी खातेदार आहेत. तर पंजाब नॅशनल बँक (PNB) 18.53 कोटी खातेदारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील बँकांच्या खातेदारांच्या संख्येत फारसा फरक नाही.

टॉप 5 सरकारी बँका कोणत्या?

सर्वाधिक खातेदार असलेल्या बँकांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर युनियन बँक ऑफ इंडिया आहे. या बँकेत 16.40 कोटी खातेदार आहेत. तर कॅनरा बँक 11.03 कोटी खातेदारांसह पाचव्या स्थानावर आहे.

या आकडेवारीनुसार, सरकारी बँकांमध्ये SBI इतर बँकांच्या तुलनेत खूपच पुढे आहे. एकट्या SBI मधील खातेदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावरील बँक ऑफ बडोदाच्या खातेदारांच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे.

इतर बँकांची स्थिती काय?

टॉप 5 व्यतिरिक्त इतर सरकारी बँकांमध्येही मोठ्या प्रमाणात खातेदार आहेत. इंडियन बँकेत 9.49 कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 8.25 कोटी, इंडियन ओव्हरसीज बँकेत 4.45 कोटी आणि UCO बँकेत 4.55 कोटी खातेदार आहेत. याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 3.06 कोटी, तर पंजाब अँड सिंध बँकेत 1.75 कोटी खातेदार आहेत.

सरकारी बँकांवरील ग्राहकांचा विश्वास कायम असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. विशेषतः SBI ने खातेदारांच्या संख्येत इतर सरकारी बँकांच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT