पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीने सलग ११ वेळा रेपो दर ६.५ टक्के इतका स्थिर ठेवला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात RBIने रेपो दरात वाढ न करता, ते स्थीर ठेवण्याची भूमिका घेतली. त्या आधी सलग सहा वेळा रेपो दरात वाढ झाली होती. २०२४ आणि २०२५च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये भारताचा विकासदर ५.४ टक्के इतका खाली आला होता. त्यामुळे RBI रेपो दर कमी करून विकासदर वाढीला प्रोत्साहन देईल, अशी अपेक्षा होती.
पण या सगळ्या अपेक्षांवर पाणी ओतण्याचे काम टोमॅटो आणि बटाटा या दोन भाज्यांनी केले आहे. या दोन भाज्यांचा आणि महागाईचा नेमका काय संबंध आहे, ते आपण या बातमीतून समजून घेऊ.
देशाचा विकासदर किंवा जीडीपी २०२४-२०२५च्या दुसऱ्या तिमाहीत ५.४ टक्के इतका खाली आला. आधीच्या तिमाहीत हा दर ६.७ टक्के होता. तर गेल्या आर्थिक वर्षांत दुसऱ्या तिमाहीत हा विकासदर ८.१ टक्के इतका राहिला होता, असे इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीत म्हटले आहे.
विकासदरातील घट हा जसा महत्त्वाच मुद्दा आहे, त्यापेक्षाही RBIसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे महागाईचा. काही महिन्यांपूर्वी महागाई नियंत्रणात येत आहे, असे चित्र होते. त्यामुळे RBIने भूमिका बदलत Neutralही केलेली होती.
पण ऑक्टोबरमध्ये महागाईच्या निर्देशंकाने सगळेच गणित बिघडवले. ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर ६.२१ इतका होता, हा दर १४ महिन्यातील सर्वाधिक होता. इनपूट आणि आऊटपूट अशा दोन्ही किमती वाढल्याने चितेंच ढग जमा झाले.
या महागाईमुळे घरी बनवलेल्या शाकाहारी थाळीची किंमत गेल्या वर्षाशी तुलना करता ७.२ टक्केंनी वाढली तर मांसाहारी थाळीची किंमत १.८ टक्के इतकी वाढली. शाकाहारी थाळीची किंमत वाढण्यामागे सर्वाधिक जबाबदार घटक ठरले ते टोमॅटो आणि बटाटा. समजा घरी बनत असलेल्या एका व्यक्तीच्या शाकाहारी थाळीची किंमत १०० रुपये गृहित धरली तर यातील २६ रुपये टोमॅटो आणि बटाट्यांवर खर्च झालेले असतात, अशी माहिती CRISIL या संस्थेने दिलेली आहे. नोव्हेंबर महिन्यात टोमॅटोचे दर ३५ टक्केंनी तर बटाट्याचे दर ५० टक्केंनी वाढवले आहेत.
म्हणजेच काय टोमॅटो आणि बटाट्या वाढच्या किमतीमुळे महागाईत भर पडत आहे, आणि त्यातूनच शेवटी RBIला रेपो दरात कपात करणे शक्य होत नाही.