Share Market Update :
भारतीय शेअर मार्केट गेल्या पाच दिवसांपासून रेड झोनमध्येच अडकलं आहे. आज शुक्रवारी दुपारीपर्यंत शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली. सेन्सेक्स जवळपास ८०० अंकांनी खाली आला. सेन्सेक्स ८० हजार ३५९ तर निफ्टी २४ हजार ७०० अंकांच्या खाली आला. सेन्सेक्स पाठापोठा निफ्टीमध्ये देखील मोठी घसरण झाली आहे.
भारतीय शेअर मार्केटमध्ये फार्मा आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स जोरदार आपटले आहेत. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनानं H-1B व्हिसाच्या फीमध्ये वाढ केल्यामुळं आयटी कंपन्यांचे शेअर खराब कामगिरी करत आहेत. त्यांचे स्टॉक्स सतत पडत आहेत. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS शेअर्स जवळपास २९०० च्या खाली आले होते. तर इन्फोसिसचा शेअर १४५० पर्यंत खाली आला होता.
त्यातच गुरूवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फार्मा सेक्टरला मोठा धक्का दिला. त्यांनी विदेशी फार्मा कंपन्यांवर शंभर टक्के टॅरिफ लावण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळं भारतातील फार्मा कंपन्यांना चांगलाच फटका बसला आहे. आज शेअर बाजार उघडल्यावर त्याचे पडसाद मार्केटवर दिसले. सन फार्माचे शेअर्स जवळपास ३ टक्क्यांनी खाली आले. तर डॉक्टर रेड्डीचे शेअर्स जवळपास २ टक्क्यांनी खाली आले. भारतीय शेअर मार्केट लालेलाल दिसण्यामागं प्रमुख कारण हे अमेरिकेचे गेल्या काही दिवसांमधील निर्णय आहेत.
याचबरोबर २५ सप्टेंबर रोजी विदेशी गुंतवणूकदारकांनी भारतीय शेअर बाजारातून जवळपास ४ हजार ९९५ कोटी रूपये काढून घेतले. या महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास २४ हजार ४५४ कोटी रूपये काढून घेतले आहेत. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयानंतर फक्त भारतीय शेअर मार्केट नाही तर आशियातील अनेक शेअर मार्केट देखील पडझड झाली. जपान, चीन हाँगकाँग, हे देखील बाजार घसरणीसह बंद झालेत. अमेरिकेचं मार्केट देखील घसरणीसहच बंद झालं. याचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर मार्केटवर देखील झाल्याचं दिसून येत आहे.