पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला (Tesla) या वर्षी भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी एप्रिल महिन्यापासून इलेक्ट्रिक वाहनांची विक्री सुरू करू शकते. याबाबतचे वृत्त CNBC-TV18 ने दिले आहे. या वृत्तानुसार, टेस्लाने या वर्षी एप्रिलपासून पहिल्या टप्प्यात बर्लिन प्लांटमधून आयात केलेल्या वाहनांची विक्री भारतात करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे टेस्ला सुमारे २५ हजार अमेरिकन डॉलर्स (सुमारे २१ लाख रुपये) किमतीचे स्वस्त ईव्ही मॉडेल्स भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
टेस्लाची पहिल्या टप्प्यात भारतात ईव्ही विक्री सुरू करण्याची योजना आहे. सूत्रांचा हवाल्याने दिलेल्या वृत्तात पुढे असा दावा केला आहे की टेस्लाने भारतात ईव्ही विक्री सुरू करण्यासाठी मुंबईतील बीकेसी तसेच एरोसिटीची संभाव्य ठिकाणे म्हणून निवड केली आहे.
याआधी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात दावा केला होता की या EV निर्माता कंपनीने शोरूमसाठी नवी दिल्ली आणि मुंबई अशा दोन ठिकाणांची निवड केली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टेस्लाने नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एरोसिटी परिसरात भाडेतत्त्वावरील जागेची शोरूमसाठी निवड केली आहे. तर त्यांनी मुंबईत विमानतळाजवळील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जागेची व्यवसाय आणि रिटेल हबसाठी निवड केली आहे.
टेस्लाने भारतात भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यांनी १३ पदांसाठी जाहिरात दिली आहे. त्यात ग्राहकांशी संबंधित आणि बॅक-एंड भूमिकांचा समावेश आहे. कंपनीच्या लिंक्डइन पेजवर सोमवारी या जॉब पोस्टिंग पोस्ट दिसून आल्या होत्या. टेस्ला कंपनीचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क (Elon Musk) यांची नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमेरिकेत भेट झाली होती. या भेटीनंतर आता टेस्लाने भारतात एंट्री करण्याची तयारी केली आहे.