Stock Markets Updates Sensex and Nifty 50 Today
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय निर्यातीवर दुपटीने टॅरिफ लागू करण्याचा धक्कादायक निर्णय आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या सतच्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी (दि. ८ ऑगस्ट) मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स ७६५ अंकांनी घसरून ७९,८५७ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २३२ अंकांच्या घसरणीसह २४,३६३ पर्यंत खाली आला. बीएसईवरील सर्व सेक्टरवर दबाव राहिला. मुख्यतः आयटी, बँकिंग शेअर्समध्ये विक्री झाली.
सेन्सेक्सवरील ३० पैकी २५ शेअर्स घसरले. तर केवळ ५ शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्सवर भारती एअरटेलचा शेअर्स ३.४ टक्के घसरून टॉप लूजर ठरला. टाटा मोटर्स, कोटक बँक आणि एम अँड एम हे शेअर्स प्रत्येकी २ टक्के घसरले. त्याचबरोबर ॲक्सिस बँक, रिलायन्स, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, टाटा स्टील आदी शेअर्समध्ये १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. तर दुसरीकडे एनटीपीसी, टायटन, बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट हे शेअर्स तेजीत राहिले.
सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. ऑटो, मेटल, आयटी आणि फार्मा निर्देशांकात सर्वाधिक घसरण दिसून आली. निफ्टी मेटल १.७ टक्के, ऑटो १.४ टक्के आणि आयटी निर्देशांक ०.९ टक्के घसरला. PSU बँक आणि मीडिया निर्देशांकही किरकोळ घसरणीसह बंद झाले. निफ्टी बँक ०.७ टक्के घसरला.
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर दुपटीने टॅरिफ वाढवले आहे. यामुळे द्विपक्षीय व्यापार चर्चेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत झाल्या आहेत.
तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्री सुरुच आहे. त्यांनी गुरुवारी एका दिवसात ४,९९७ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत त्यांनी १५,९५० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. याचा दबाव बाजारावर राहिला आहे.