Stock Market Today: अमेरिका-इराण तणाव कमी होण्याच्या आशेने गुरुवारी जागतिक शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला आणि सेन्सेक्स-निफ्टीने जोरदार सुरुवात केली. निफ्टी 24,300 च्या वर पोहोचला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची चर्चा योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगितले. इराणने अमेरिकेच्या अटी मान्य केल्यास ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ थांबवले जाऊ शकते आणि होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा सर्वांसाठी खुली केली जाईल, असे संकेत त्यांनी दिले. मात्र, करार न झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
दुसरीकडे, इराणनेही अमेरिकेकडून आलेल्या प्रस्तावाचा आढावा घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असून बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
या घडामोडींचा सर्वात मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या दरांवर झाला. ब्रेंट क्रूडमध्ये जवळपास 8 टक्क्यांची घसरण होऊन भाव 101 डॉलरपर्यंत खाली आले. गुरुवारी सकाळी काहीशी सुधारणा होत भाव 102 डॉलरच्या आसपास होते. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
अमेरिका-इराण कराराच्या आशेने अमेरिकन शेअर बाजारांमध्ये जोरदार तेजी दिसली. नॅस्डॅक तब्बल 500 अंकांनी वाढून नव्या उच्चांकावर बंद झाला. S&P 500 नेही विक्रमी स्तर गाठला, तर डाओ जोन्स सुमारे 600 अंकांनी वाढून तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.
सुट्टीनंतर सुरू झालेल्या जपानच्या बाजारातही मोठी तेजी दिसून आली. जपानी निर्देशांक सुमारे 5 टक्क्यांनी वाढून नव्या उच्चांकावर पोहोचला. GIFT Nifty देखील 24,450 च्या आसपास स्थिर दिसत होता.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) बुधवारी 5,834 कोटी रुपयांची विक्री केली. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) 6,836 कोटी रुपयांची मोठी खरेदी करत बाजाराला आधार दिला.
Bajaj Auto ने मजबूत तिमाही निकालांसोबत 5,633 कोटी रुपयांच्या बायबॅकची घोषणा केली आहे. कंपनी 12,000 रुपये प्रति शेअर दराने बायबॅक करणार आहे. त्यामुळे ऑटो शेअर्सकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष लागले आहे.
Paytm, PB Fintech आणि Blue Star यांचे निकाल मिश्र स्वरूपाचे राहिले, तर Godrej Consumer Products चे प्रदर्शन अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिले. आज BSE, Biocon, Britannia, Dabur आणि Lupin यांसारख्या कंपन्यांच्या निकालांवर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.