Stock Market Updates
मुंबई : महागाईत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने बुधवारी (दि.१४) तेजीत सुरुवात केली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढून ८१,६०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक १७५ अंकांनी वाढून २४,७५० वर व्यवहार करत आहे. बाजारातील तेजीत फायनान्सियल आणि आयटी शेअर्स आघाडीवर आहेत.
देशातील किरकोळ महागाईचा दर एप्रिलमध्ये सहा वर्षांच्या निचांकी पातळीवर आला. एप्रिलमध्ये महागाई दर ३.१६ टक्क्यांपर्यंत खाली आला. तो मार्चमध्ये ३.३४ टक्के होता. महागाई कमी झाल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून संभाव्य दर कपातीची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत.
टाटा स्टीलचा शेअर्स सर्वाधिक ४.७ टक्के वाढला आहे. त्याचसोबत इर्टनल, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, इन्फोसिस. एम अँड एम, एलटी हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दुसरीकडे एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा मोटर्स हे शेअर्स घसरले आहेत.
सर्व क्षेत्रीय निर्देशांकही हिरव्या रंगात खुले झाले आहेत. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस, आयटी, मेटल, पीएसयू बँक, रियल्टी, ऑईल अँड गॅस हे निर्देशांक वाढले आहेत.
दरम्यान, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Domestic institutional investors) सलग तिसऱ्या दिवशी खरेदी कायम ठेवली. त्यांनी १३ मे रोजी ४,२७३ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर याच दिवशी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४७६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.