Stock Market Today
ट्रम्प टॅरिफचा (Trump tariff on India) काही प्रमाणात दबाव गुरुवारी (दि. ७ ऑगस्ट) भारतीय शेअर बाजारात दिसून आला. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह ८०,३०० पर्यंत खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ६२ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,५०० वर व्यवहार करत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लागू केले आहे. हे टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू होईल. आता भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लागू होईल. रशियाकडून केल्या जात असलेल्या तेल खरेदीमुळे हे टॅरिफ लागू केले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी भविष्यात आणखी निर्बंध लागू करण्याचा इशारा दिला आहे. यावर भारताने प्रतिक्रिया दिली आहे. हा एक तर्कहीन निर्णय आहे. ट्रम्प टॅरिफमुळे भारतीय बाजारासाठी कमकुवत संकेत आहेत.
अमेरिकेने भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का बसला आहे. यामुळे गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी ५० लाल रंगात खुले झाले.
सेन्सेक्सवर कोटक बँक, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, रिलायन्स, बजाज फायनान्स, इटरनल हे शेअर्स ०.५ ते १.५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर दुसरीकडे टेक महिंद्रा, ट्रेंट, आयटीसी, टायटन हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.
सेक्टरल फ्रंटवर निफ्टी ऑटो निर्देशांक घसरला आहे. निफ्टी ऑटोवर भारत फोर्ज, टाटा मोटर्स, Motherson हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले आहेत. मेटल, ऑईल अँड गॅस निर्देशांकही घसरणीसह खुले झाले आहेत.