पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन सत्रांतील दमदार तेजीनंतर भारतीय शेअर बाजारात (Stock Market Updates) आज मंगळवारी (दि. २६) काही प्रमाणात विक्रीचा दबाव राहिला. सेन्सेक्स (Sensex) १०५ अंकांनी घसरून ८०,००४ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) २७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,१९४ वर स्थिरावला. आज विशेषतः आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी आयटी १ टक्के वाढून बंद झाला. तर ऑटो आणि फार्मा शेअर्समध्ये विक्री झाली.
निफ्टीवरील १६ क्षेत्रीय निर्देशांकातील ८ निर्देशांक लाल रंगात बंद झाले. त्यात ऑटो, पॉवर, फार्मा, ऑईल आणि गॅस निर्देशांक १ ते १.५ टक्क्यांनी घसरले. तर एफएमसीजी, आयटी, मेटल ०.५ ते १ टक्के वाढले. बीएसई मिडकॅप ०.१ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.६ टक्के वाढला.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील अतिरिक्त शुल्कासह कॅनडा आणि मेक्सिकोमधून सर्व आयात वस्तूंवर शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचा जागतिक बाजारातील भावनांवर प्रभाव दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर इन्फोसिस, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, टेक महिंद्रा, रिलायन्स, टाटा स्टील हे शेअर्स तेजीत राहिले. तर अदानी पोर्ट्सचा शेअर्स ३ टक्क्यांनी घसरला. अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, एम अँड एम, एनटीपीसी, टाटा मोटर्स, एलटी, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले.
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासह सात जणांवर अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टात लाचखोर (US bribery charges) आणि फसवणुकीचा आरोप ठेवला आहे. यानंतर मंगळवारी अमेरिकेची रेटिंग एजन्सी 'मूडीज'ने अदानी समुहातील ७ कंपन्यांचे रेटिंग घटवले. यात अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स आणि अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांचा समावेश असून त्यांचे रेटिंग निगेटिव्ह केले आहे. "आम्ही सातही कंपन्यांचा आउटलूक 'स्टेबल'वरून निगेटिव्ह असा बदलला आहे," असे मूडीजने म्हटले आहे. यामुळे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला. याचा फटका सर्वाधिक अदानी एंटरप्रायजेसला (Adani Enterprises Share) बसला. एनएसई निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स ४.६ टक्के घसरून टॉप लूजर ठरला.
निफ्टीवर बजाज ऑटो, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा हे शेअर्सही २ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर दुसरीकडे श्रीराम फायनान्स, ब्रिटानिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एशियन पेंट्स, इन्फोसिस हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी वाढले.