Stock Market Updates
आशियाई बाजारातून कमकुवत संकेत, अमेरिकेसोबत व्यापार वाटाघाटी, आयटी क्षेत्रातील नवीन नोकरकपात, विदेशी गुंतवणूकदारांकडून सततची विक्री आदी घटकांचा भारतीय शेअर बाजारावर सोमवारी (दि. २८ जुलै) दबाव दिसून आला. आजच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स त्याच्या इंट्राडे उच्चांकावरुन ७२६ अंकांनी खाली आला. तर एनएसई निफ्टी २४,७०० अंकांच्या खाली घसरला. त्यानंतर सेन्सेक्स ५७२ अंकांच्या घसरणीसह ८०,८९१ वर बंद झाला. तर निफ्टी १५६ अंकांनी घसरून २४,६८० वर स्थिरावला. रियल्टी आणि बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा जोर अधिक राहिली.
सेन्सेक्सवर कोटक बँकेचा शेअर्स ७.५ टक्के घसरून टॉप लूजर ठरला. त्याचबरोबर बजाज फायनान्स, भारती एअरटेल, टायटन, टीसीएस, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एम अँड एम, एसबीआय, इटरनल हे शेअर्स १ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले. तर दुसरीकडे हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक हे शेअर्स तेजीत राहिले.
आयटी शेअर्सवरही आज दबाव दिसून आला. निफ्टी आयटीवर विप्रो, टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा हे शेअर्स सर्वाधिक घसरले. टीसीएसच्या २ टक्के नोकरकपातीच्या घोषणेमुळेही आयटी क्षेत्रातील वाढीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
बाजारातील भयसूचकांक इंडिया VIX जवळपास ७ टक्क्यांनी वाढला. जो गुंतवणूकदारांमधील वाढती चिंता दर्शवितो.
दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरुच आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) शुक्रवारी १,९७९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. याचा देशांतर्गत बाजारावर परिणाम दिसून आला आहे.