Stock Market Updates
अमेरिकेसोबतच्या संभाव्य द्विपक्षीय व्यापार कराराकडून वाढती अपेक्षा आणि कंपन्यांच्या जून तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (दि. १० जुलै) दिवसभर अस्थिरता राहिली. सेन्सेक्स ३४५ अंकांनी घसरून ८३,१९० वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १२० अंकांनी घसरून २५,३५५ पर्यंत खाली आला.
सेन्सेक्सवर भारती एअरटेलचा शेअर्स २.६ टक्के घसरला. त्याचबरोबर एशियन पेंट्स, इन्फोसिस, भारती इलेक्ट्रॉनिक्स, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, इर्टनल, एचसीएल टेक, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स ०.५ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर दुसरीकडे मारुती, टाटा स्टील हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के वाढले. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट, टाटा मोटर्स हे शेअर्सही वाढून बंद झाले.
आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून आली. निफ्टी आयटी ०.८ टक्के घसरला. फार्मा शेअर्समध्येही विक्रीचा दबाव राहिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फार्मास्युटिकल उत्पादनांवर २०० टॅरिफ लागू करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे फार्मा शेअर्स घसरले आहेत. निफ्टी फार्मा ०.६ टक्के घसरला. बीएसई मिडकॅप ०.२ टक्के घसरला. तर स्मॉलकॅप ०.१ टक्के वाढला.
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय करारापूर्वी गुंतवणूकदार सावध राहिले आहेत. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने अद्याप भारताचा नवीन टॅरिफ यादीत समावेश केलेला नाही. पण भविष्यातील संभाव्य टॅरिफची चिंता बाजारातील भावनांवर परिणाम करणारी ठरली.
जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांचाही बाजारावर परिणाम झाला आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार दिसून आला. जपानचा निक्केई निर्देशांक घसरणीसह बंद झाला.