

जगदीश काळे
सध्या यंत्रणांकडून निवृत्तीनंतर कोणतेही गॅरंटेड इन्कम मिळण्याची शक्यता नसते. अशावेळी, आयुष्य सुसह्य कसे बनवावे, हा प्रश्न फक्त आर्थिक नव्हे, तर मानसिक द़ृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यासंदर्भात काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
भारतात अनेक लोक अशा टप्प्यावर येतात, जिथे वयाच्या पन्नाशीच्या आसपास पोहोचल्यावर ना निश्चित नोकरी उरते, ना पुरेसे संचित, ना पेन्शनचा आधार. स्वतःचा कर्जमुक्त फ्लॅट हाच एकमेव मोठा आधार अशा लोकांसाठी असतो. अशा परिस्थितीत पुढील आयुष्याची तजवीज करण्यासाठी हाती राहते ते फक्त चार-पाच वर्षांचे काम करण्याचे वय.
प्रथम सुसह्य जीवन या संकल्पनेचा नव्याने विचार करायला हवा. कारण, हाताशी काही संचित नसल्याने वैभवशाली जीवनशैली शक्य नाही; पण स्वाभिमानाने तणावमुक्त व सुरक्षित आयुष्य शक्य आहे. आपल्या गरजांचे प्रमाण कमी करणे, आरोग्यावर भर देणे आणि मानसिक शांततेकडे वाटचाल करणे हे तत्त्व गरजेचे ठरते.
हाताशी असणारी रक्कम मर्यादित असते तेव्हा जोखीम घेणे ही चूक ठरू शकते. मोठ्या परताव्याच्या लालसेपायी मुख्य रक्कम गमावण्याचा धोका असतो. म्हणूनच संपूर्ण रक्कम शेअर बाजारात लावणे किंवा अविचाराने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे टाळले पाहिजे. याऐवजी, गुंतवणुकीचे धोरण पुढीलप्रमाणे असावे: 70 ते 80 टक्के रक्कम निश्चित उत्पन्न योजनांमध्ये (एफडी, पोस्ट ऑफिस योजना, पीपीएफ, गिल्ट फंडस्) 10 ते 15 टक्के रक्कम सावधगिरीच्या हायब्रीड फंडात गुंतवणे, उर्वरित 10 टक्के रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून लिक्विड फंडात किंवा बचत खात्यात गुंतवणे.
याखेरीज उतारवयाचा विचार करता आरोग्य विमा जीवनरक्षक भूमिका बजावतो. आजारी पडल्यावर हॉस्पिटलायझेशनचा खर्च लाखोंमध्ये होतो आणि असा खर्च संचितावर घाला घालू शकतो. सबब किमान 10 लाख रुपयांचा वैयक्तिक आरोग्य विमा असावा. त्यावर 50-100 लाख रुपयांचा सुपर टॉप-अप घेतल्यास जास्त सुरक्षितता लाभते. यासाठी वार्षिक खर्च सुमारे 20-25 हजार रुपये येतो. विमा घेतल्यानंतर दरवर्षी मास्टर हेल्थ चेकअप करणे गरजेचे ठरते.
शेवटचा मुद्दा म्हणजे तुमच्या निवृत्तीसाठी 4-5 वर्षे बाकी असतील, तर हा काळ बचत वाढवण्याचा शेवटचा टप्पा आहे. तथापि, याद़ृष्टीने बाजारात जोखीम घेऊन मोठा परतावा मिळवण्याचा प्रयत्न टाळावा. यापेक्षा महिन्याला शक्य असेल तेवढी रक्कम नियमित बचतीसाठी वापरावी. जर तुम्ही महिन्याला 10 हजार रुपये गुंतवले, तर 4 वर्षांत 4.8 लाख रुपये संचित वाढवता येऊ शकते (5-6% व्याज गृहित धरून). याशिवाय, एकदाच गुंतवता येईल, अशी योजना म्हणजे वार्षिक पेन्शन योजना. उदा. एलआयसी जीवन अक्षय, एचडीएफसी लाईफ इमिडिएट अॅन्युइटी इत्यादी. यात एकदाच मोठी रक्कम भरून आयुष्यभर महिन्याला काही हजार रुपये मिळवता येतात.