Stock Market Closing Updates
देशातील महागाईत घट झाल्याने आरबीआयकडून व्याजदर कपातीची आशा निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या असल्याने भारतीय शेअर बाजाराने बुधवारी (दि.१४) तेजीत व्यवहार केला. आजच्या सत्रातील तेजीत आयटी आणि कमोडिटीज शेअर्स आघाडीवर राहिले. सेन्सेक्स १८२ अंकांनी वाढून ८१,३३० वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ८८ अंकांनी वाढून २४,६६६ वर स्थिरावला.
आयटी आणि मेटल शेअर्समधील मोठ्या वाढीचा बाजाराला आधार मिळाला. पण बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्समधील घसरणीमुळे बाजारातील तेजी मर्यादित राहिली. सेक्टर्समधील १३ पैकी १० निर्देशांक तेजीत राहिले. आयटी, ऑईल अँड गँस आणि मेटल निर्देशांक सर्वाधिक वाढले. अमेरिकेतील महागाईत घट झाल्यामुळे आयटी शेअर्स वधारले. यामुळे निफ्टी आयटी निर्देशांक १.३ टक्के वाढला. बीएसई मिडकॅप (BSE MidCap) निर्देशांक १.१९ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक (BSE SmallCap) १.६३ टक्क्यांनी वाढून बंद झाला.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १४ मे रोजी ४३४.९८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. १३ मे रोजी ते ४३१.१० लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.८८ लाख कोटींची वाढ झाली.
मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. या घसरणीतून शेअर बाजाराने बुधवारी रिकव्हरी केली. देशातील किरकोळ महागाईचा दर एप्रिलमध्ये सहा वर्षांच्या निचांकी पातळीवर आला. एप्रिलमध्ये महागाई दर ३.१६ टक्क्यांपर्यंत खाली आला. तो मार्चमध्ये ३.३४ टक्के होता. महागाई कमी झाल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून संभाव्य दर कपातीची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात तेजीचे वातावरण राहिले.
बीएसई सेन्सेक्सवर टाटा स्टीलचा शेअर्स सुमारे ४ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. इर्टनल, टेक महिंद्रा, एम अँड एम, मारुती, इन्फोसिस, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, टीसीएस हे शेअर्सही १ ते २ टक्के वाढले. तर दुसरीकडे एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, कोटक बँक हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले.
निफ्टीवर इन्फोसिसह रिलायन्स, टाटा स्टील, भारती एअरटेल, टीसीएस हे शेअर्स टॉप गेनर्स होते.