Stock Market Updates
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे (Operation Sindoor) पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर मध्यरात्री एअर स्ट्राईक केला. याचा काही प्रमाणात दबाव भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि. ७ मे) दिसून आला.
प्री-ओपन सत्रात सेन्सेक्स- निफ्टीत मोठी घसरण दिसून आली होती. पण बाजार खुला होताच दोन्ही निर्देशांक सपाट पातळीवर आले. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १५० हून अधिक अंकांनी वाढून ८०,८४० वर आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ६५ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,४४० वर व्यवहार करत आहे. आज विशेषत: संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स फोकसमधील राहतील, असे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, आयटीसी, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स घसरले आहेत. तर टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, कोचिन शिपयार्ड हे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत. डाटा पॅटर्न्स हा शेअर्सही तेजीत खुला झाला आहे.
भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांशी संबंधित नऊ ठिकाणांवर मध्यरात्री हल्ला केला. त्यात बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट या प्रमुख ठिकाणांचा समावेश होता.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बँकिंग आणि पेट्रोलियम शेअर्समध्ये नफा बुकिंग आणि गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने मंगळवारी (दि. ६ मे) शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. सेन्सेक्स १५६ अंकांनी, तर निफ्टी ८२ अंकांनी घसरला होता. आजही बाजारात दबाव दिसून येत आहे.